इतिहास

इतिहास अभ्यासतांना…या गोष्टींचा विचार कधी करणार?

“आठव्या शतकाच्या उत्तरार्धात शंकराचार्याने’ प्रछन्न बौद्ध’ (छद्मी बौद्ध) बनूनच बौद्धांचा भारतातून नायनाट केला. तरीही संपूर्ण भारतातून बौद्धांचे समूळ उच्चाटन करणे हे त्यालाही शक्य झाले नाही. कारण, बंगालमध्ये ‘पाल’ हे बौद्ध राजघराणे सुमारे बाराव्या शतकापर्यंत राज्य करत होते. त्यांच्याच काळात बख्तियार खिल्जीने ११९१ मध्ये ‘नालंदा’ बौद्ध विश्वविद्यापीठाचा विध्वंस केला. ‘ऑक्सफर्ड’ हे विद्यापीठ नालंदाच्या विध्वंसानंतर कितीतरी शतकांनंतर अस्तित्वात आले.

शेवटचा महान बौद्ध सम्राट हर्षवर्धन याच्या कार्यकाळानंतर जवळजवळ तब्बल सव्वाशे वर्षांनी, शंकराचार्याने सुरु केलेल्या बौद्धांच्या निर्मूलनानंतर पराभूत बौद्धांनाच ‘अस्पृश्य’ ठरविले गेले, व तेव्हापासूनच वर्णव्यवस्थेऐवजी जातीव्यवस्था निर्माण झालीव तीच पुढे जाणीवपूर्वक रूढ केली गेली.तत्पूर्वी, ‘वर्णव्यवस्था’ ही एखाद्या व्यक्तीच्या जन्मानुसार न ठरता, ती त्या व्यक्तीच्या कर्मानुसार ठरत होती, इतकी ती लवचिक होती.शंकराचार्यापूर्वी पुष्यमित्र शृंगाच्या बौद्धांविरुद्धच्या प्रतिक्रांतीने वर्णव्यवस्था कायम करून पराभूत बौद्धांनाच त्याने मनुस्मृती च्या माध्यमातून शूद्र ठरविले, व शूद्रांचा चौथा वर्ण अस्तित्वात आणला. त्यालाच पुढे हिनतेने वागवून दास्यत्व देऊन , स्वाभिमानशून्य असे गुलामीचे जिणे जगणे भाग पाडले.

पाच हजार वर्षांपासून शिक्षणाची दारे आपल्याला खुली केली गेली नाहीत, असे जे दलित लेखक व बामसेफी वक्ते सतत रडगाणे गातात, तर त्यांनाच काय, परंतु भारतातील, अथवा जगातील एकाही इतिहास संशोधकाला हडप्पा व मोहेन्जोदडो नंतरचा बुद्धपूर्व काळापर्यंतचा दीड- दोन हजार वर्षांचा सुसंगत असा क्रमवार, व एक सलग इतिहास मांडता येत नाही. त्यामुळे या काळात नेमके काय घडले असावे, यावर खरे तर संशोधन होणे गरजेचे व आवश्यक आहे. ते जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत आम्हांला शिक्षणाची दारे खुली केली गेली नाहीत, असे म्हणणे हे चुकीचेच ठरेल.

कारण हेच लेखक व वक्ते त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून आपल्याला सांगत असतात, की आपण राज्यकर्ते होतो. मोहेन्जोदडो, हडप्पा सारखी विकसित नागरी संस्कृती आपणच निर्माण केली. आपल्या पूर्वजांच्या साक्षरतेचे प्रमाण म्हणजे तेथील पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या मुद्रांवरील चित्रलिपीमधील लेख. म्हणजेच त्यावेळी आपण साक्षर होतो. आपल्याला लिहिता-वाचता येत होते. तर मग, नंतरच्या काळात अशी नेमकी कोणती गोष्ट घडली की हे सारे आपण विसरलो….?

शिवाय इ. स. पूर्व तिसऱ्या शतकापासून ते इ. स. च्या बाराव्या शतकापर्यंत सुमारे दीड हजार वर्षांच्या एकसलग कालखंडात भारतात व महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी आपल्या बौद्ध पूर्वजांनी. डोंगर-पहाडात विविध शिल्पकृतींनी नटलेली, अप्रतिम अशी भव्य-दिव्य , वैभवशाली लेण्यांची निर्मिती करून दानपारमितेने पूर्ण असे शिलालेख त्या लेण्यांमधून कोरून ठेवले. गेली अनेक शतके उन, वारा, पाऊस अशा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींशी सामना करीत , कार्ला, भाजा , कान्हेरी, औरंगाबाद-वेरूळ सारखी भव्य लेणी, व अजिंठ्यासारखी आजही जगप्रसिद्ध असलेली सुंदर चित्रे , सांची- सारनाथ सारखे भव्य स्तूपांचे निर्माण, गांधार, मथुरा, अमरावती सारखी अप्रतिम मूर्तीशैली आजही मोठ्या दिमाखाने आपल्या पूर्वजांच्या कार्याचा वारसा सांगत आहेत, ते काय त्यांना शिक्षणाची दारे बंद होती, हे सांगण्यासाठी…?

जर खरेच अशी शिक्षणाची दारे जर त्यांच्यासाठी बंद झाली असती, तर अशी अप्रतिम निर्मिती त्यांचे हातून झाली असती का…? माझ्या मते तरी शिक्षणाची दारे खरी तर आठव्या शतकानंतरच आपल्याला बंद झाली. त्यापूर्वीचा काळ हा आपला भरभराटीस आलेला, गौरवशाली असा सुवर्णकाळच होता……”

लेखक – अशोक नगरे
(मोडी लिपी तज्ज्ञ, धम्मलिपी ब्राह्मी, बौद्ध लेणी, बौद्ध शिल्पकला-चित्रकला, बौद्ध स्थापत्य, बौद्ध पुरातत्व व बौद्ध इतिहास अभ्यासक)

One Reply to “इतिहास अभ्यासतांना…या गोष्टींचा विचार कधी करणार?

  1. सर आपण लेख छान लिहिला आहे पण तत्कालीन कालखंडात होऊन गेलेल्या एखाद्या मोठ्या विद्वानांचा संदर्भ द्यायला हवा होता. तुम्ही ज्या वास्तूंचा संदर्भ दिला त्या सर्व राजे महाराजे वा व्यापाऱ्यांनी तयार करून घेतलेल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *