बुद्ध तत्वज्ञान

अहिंसेच्या बौद्ध सिद्धान्ताविषयीच्या या गोष्टी प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक

अहिंसेच्या सिद्धान्तावर टीकाकारांचे म्हणणे असे असते की, अहिंसेचे पालन करणे म्हणजे अन्याय व अत्याचाराला शरण जाणे होय. पण तथागतांनी शिकविलेल्या अहिंसा तत्त्वाचा हा पूर्णतः विपर्यास होता. सिंह सेनापतीला उपदेश देताना तथागतांनी स्पष्ट केले होते की, जो दंडनीय आहे, त्याला दंड मिळायलाच पाहिजे. जो आपल्या अपराधाचा दंड भरतो, त्याला तो स्वतःच जबाबदार असतो. आपल्या अकुशल कर्माच्या परिणामामुळे तो दंड भोगतो व न्यायधीश आपले केवळ कर्तव्य म्हणून दंडाची शिक्षा फर्मावितो. जेव्हा दंडनीय व्यक्तीला समजेल की, त्याचा दंड त्याच्या कर्माचेच फळ आहे, तेव्हा त्याला दंड भोगतांना दुःख न होता पश्चात्ताप होईल. तथागतांच्या उपदेशात अहिंसेला मुख्य स्थान आहे, परंतु ती निरपेक्ष नाही.

त्यांनी शिकविले आहे की, पापाला पुण्याने जिंकावे. परंतु जर चांगल्या गोष्टीचा पापामुळे नाश होणार असेल तर अशा पापाला नष्ट करण्यासाठी हिंसेचाही आश्रय घ्यावा लागल्यास ते त्यांना अमान्य नव्हते. भगवंतांनी श्रेणीय बिंबिसाराला असे स्पष्टपणेच उत्तर दिले की, अहिंसेच्या नावाखाली सैनिकांनी आपल्या देशाप्रती त्यांचे जे कर्तव्य आहे, त्यापासून विन्मुख होऊ नये. त्यांनी संघासमोर अशी घोषणा केली की, राज्याच्या कोणत्याही सैनिकास प्रव्रज्या देण्यात येऊ नये.

अहिंसेबद्दल असलेले चुकीचे समज :

अहिंसा किंवा जीवहिंसा न करणे, हे भगवंतांच्य धम्माचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. अहिंसेचा करुणा व मैत्रीशी अत्यंत जवळचा संबंध आहे. परंतु प्रश्न असा आहे की, ते केवळ ‘शील’ होते की तो एक नियम होता? अहिंसेला निरपेक्ष असे बंधन मानल्यास, अहिंसेमुळे वाईटासाठी चांगुलपणाचे बलीदान करावे लागेल, किंवा दुर्गुणासाठी सद्गुणांचे.

श्रीलंकेमधील बौद्ध भिक्खू विदेशी आक्रमणकर्त्यांवर तुटून पडले व त्यांनी लोकांनाही लढावयास उद्यत केले. दुसरीकडे ब्रह्मदेशातील भिक्खूनी तसे करावयास मनाई केली व तो देश परतंत्र झाला होता. ब्रह्मदेशातील लोक अंडी खातात, परंतु मासोळी खात नाहीत. काही दिवसांपूर्वी जर्मनीमधील बौद्ध समितीने असा प्रस्ताव केला की, पंचशीलांपैकी ते प्रथम शील सोडून केवळ चार शिलांचेच पालन करतील. परंतु भगवंतांनी अहिंसेला शील (Principle) म्हणून ग्रहण केले , नियम (Rule) म्हणून नाही. त्यांनी अहिंसेला जीवनाचा एक मार्ग मानले. म्हणून जेथे सद्गुणांचा बचाव करावयाचा असेल व हिंसेशिवाय ते शक्य नसेल, तेथेच नाइलाज म्हणून हिंसा करावी लागेल, असा उपदेश करतांना भगवंतांनी प्रज्ञासंगत फारच उत्तम शिकवण दिलेली आहे .

संदर्भ : बौद्धधम्म जिज्ञासा