जगभरातील बुद्ध धम्म

कोलंबिया विद्यापीठात गेल्या दोनशे वर्षात प्राप्त झालेल्या बौद्ध कलाकृतींचे प्रदर्शन

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी १९१५ साली कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून MA ची पदवी घेतली. त्यानंतर १९१७ साली कोलंबिया विद्यापीठातून PhD प्राप्त केली. त्यानंतर १९५२ मध्ये त्यांना Doctor of Laws (LLD) ही डॉक्टरेट पदवी कोलंबिया युनिव्हर्सिटी तर्फे देण्यात आली. अशा या कोलंबिया विद्यापीठात सहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१५ मध्ये जगातील नंबर एकचे स्कॉलर म्हणून त्यांना गौरवीण्यात आले. त्यांचा अर्धपुतळा तेथील दालनात उभारण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावशाली शैक्षणिक कारकिर्दीने प्रभावित झालेल्या या कोलंबिया विद्यापीठात आता नुकतेच बौद्ध संस्कृतीच्या कलाकृतींचे प्रदर्शन ४ डिसेंम्बर २१ ते १२ मार्च २२ पर्यंत भरविण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली केलेला बुद्धिझमचा स्वीकार आणि कोलंबिया विद्यापीठाच्या प्रांगणात भरलेले बौद्ध कलाकृतींचे प्रदर्शन हा मोठा विलक्षण योगायोग वाटतो.

काही कलाकृती वस्तूसंग्रहालयात जरी बघावयास मिळाल्या तरी त्याचा इतिहास समोर येत नाही. त्या कलाकृतीं बद्दलची सर्व माहिती वस्तुसंग्रहालये उघड करतातच असे नाही. पण आता कोलंबियात भरलेले हे प्रदर्शन अशा कलाकृतींच्या पाठीमागील दडलेला इतिहास सांगते, त्याची संपूर्ण माहिती देते. न्यूयॉर्क टाइम्सने देखील याची दखल घेतली असून ‘What Museums Don’t Reveal about Religious Art’ हा लेख देखील लिहिला आहे. तसेच या पुरातन बौद्ध कलाकृतीतून काय बोध घ्यावा, याबद्दल कोलंबिया विद्यापीठाने लिहिले असून ३ आणि १० फेब्रुवारीला दोन चर्चासत्रे देखील आयोजित केली गेली.

गेल्या दोनशे वर्षात प्राप्त झालेल्या अनेक बौद्ध कलाकृती या प्रदर्शनात मांडल्या आहेत. या कलाकृती या प्रदर्शनाच्या निमित्ताने जगापुढे प्रथमच आल्या आहेत. यामध्ये तिबेटी बुद्धमूर्ती, आकाशी रंगाचा जपमाळेचा बॉक्स, कोरीव काम असलेले छोटे लाकडी स्तूप, विविध सूत्रांची हस्तलिखिते, तांब्याच्या बुद्धमूर्ती आहेत. मुख्य म्हणजे प्रदर्शनासाठी या कलाकृती माजी विद्यार्थी तसेच अध्यापक मंडळी यांनी पुरविलेल्या आहेत. याचाच अर्थ पाश्चात्त्य देशांत बुद्धिझम बाबतची आस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

-संजय सावंत,नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)