जगभरातील बुद्ध धम्म

बुद्ध प्रतिमा असलेली हजारो वर्ष जुन्या एकात एक आठ संदुका निघाल्या आणि शेवटच्या संदुकमध्ये…

चीनच्या अधिपत्याखाली हियान प्रांतात ‘फुफेंग’ नावाचे राज्य आहे. तेथिल फामेन शहरात पुरातन बुद्ध विहार होते. चीन मधील हे सर्वात मोठे बुद्ध विहार संकुल असून एकेकाळी पाच हजार भिक्खुंचे वास्तव्य इथे होते. इ.स. पूर्व २०६ ते इ.स. २२० या काळात हॅन राजवटीत ते बांधले असल्याचा उल्लेख आहे. नंतरच्या सुई राजवटीत तेथे पुन्हा बांधकाम करण्यात आले. त्यागं राजवटीत (इ.स. ६१८ ते ९०७) तेथे पॅगोडा उभारला गेला. तेथे अशी वंदता होती की या बुद्ध विहाराच्या जमिनीखाली मोठा राजवाडा आहे. पण नूतनीकरण करताना कुठल्याच राजवटीत हा राजवाडा खोदून पाहिला गेला नाही.

पुढे मिंग राजवटीत भूकंपामुळे या विहारास क्षती पोहोचली. तेव्हा लाकूड व वीटा यांचा वापर करून १३ मजली पॅगोडा उभारण्यात आला. १६ व्या ते १८ व्या शतकापर्यंत अधून मधून त्याचे नूतनीकरण करण्यात आले. पुढे People Republic of China अस्तित्वात आल्यावर सांस्कृतिक क्रांतीमध्ये या विहाराची अतोनात हानी झाली. सन १९७९ मध्ये लोकमतांचा आदर करीत शान प्रांतातील सरकारने या विहाराचे नूतनीकरण करण्यासाठी अल्पसा निधी दिला.

फामेन म्युझियम

परंतु दुरुस्तीचे काम चालू असताना ऑगस्ट १९८१ रोजी मोठ्या वादळी पावसात याची भिंत पडली. काही वर्षांनीं ती दुरुस्त करताना ३ एप्रिल १९८७ रोजी जमिनीखाली काही पायर्‍या दिसून आल्या. ते समजताच सर्व पुरातत्त्व शास्त्रज्ञ तेथे धावले. १९ पायर्‍या उतरल्यावर तेथे अद्भुत कलाकुसर केलेला एक दगडी दरवाजा मिळाला. तो बाजूला केल्यावर पाठीमागे भुयार दिसले. तेथील फरशीवर जुन्या राजवटीतील नाणी पसरली होती. त्या भुयारातून गेल्यावर दुसरा एक दरवाजा सापडला. परंतु तो भूकंपामुळे तुटला होता. त्यातून जेव्हा पुरातत्ववेत्ते पलीकडे गेले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून ते चकित झाले.

बुद्ध अंगुली अस्थी

तेथे अनेक बुद्धमूर्ती हजारो वर्षांपासून अद्यापि उभ्या होत्या. सिल्क वस्त्रांचे मलूल झालेले ढीग तेथे पडले होते. सोन्याच्या बारीक तारेत विणलेल्या कापडांचे तुकडे शिल्पाजवळ होते. रत्ने-माणके यांचा खजिना तेथे भरलेला होता. त्याचबरोबर सम्राट अशोक यांच्या प्यागोड्याची छोटी प्रतिकृती तेथे होती. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एका सुरक्षित जागी बुद्ध प्रतिमा असलेली चांदीची संदुक तेथे आढळली. तिच्या सभोवताली सुवर्णफुलें विखुरली होती. व त्यावर चिनी भाषेत बुद्ध अंगुलधातू असल्याचा स्पष्ट उल्लेख होता.

1)दुरुस्ती नंतरचा फामेन पुरातन पॅगोडा, 2) नमस्ते दागोबा – फामेन बुद्ध विहार संकुलातील आधुनिक विहार.

पुरातत्ववेत्त्यांनी ही संदूक उघडली तेव्हा एकात एक आठ संदुका निघाल्या. आणि शेवटच्या संदुकमध्ये स्फटिकासारख्या अंगुलीअस्थी होत्या. या बुद्धधातूंची बातमी चहूकडे पसरली. तिथल्या सरकारने लगेच सत्यता पडताळून पहिली. आणि फामेन बुद्ध विहाराचे नूतनीकरण करण्यासाठी भरघोस निधी दिला. सन २००९ मध्ये या जागी मोठे बुद्ध संकुल व म्युझियम उभारण्याचे काम पूर्ण झाले. त्याचे नाव ‘नमस्ते दागोबा’ असे भारतीय भाषेत ठेवले. त्याचा आराखडा भगवान बुद्धांच्या अंजली मुद्रेवरून आर्किटेक्ट वाय. सी. ली यांनी तयार केला.

पुरातत्ववेत्त्यांनी सांगितले की सम्राट अशोकाने जेव्हा भारतातील सात स्तूपातील बुद्धधातू काढून पुन्हा त्यांच्या कुप्या बनवून जगभर धम्म प्रसारासाठी व स्तूप उभारण्यासाठी पाठविल्या तेव्हा अंगुली अस्थींचा भाग काही भिक्खुंनी चीनमधील सम्राटाकडे नेला असावा. स्फटिकांसारख्या दिसत असलेल्या या अंगुलअस्थी जगात फक्त चीनकडे असून आता त्या तेथे उभारलेल्या म्युझियममध्ये दर्शनार्थ ठेवल्या आहेत. ‘नमस्ते दागोबा’ हे आधुनिक बुद्धसंकुल त्याचेच प्रतीक आहे.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)