सन १८३७ हे भारत खंडातील विस्मयजनक वर्ष होते. त्या वर्षी प्राचीन अवशेष, नाणी, शिलालेख यांच्या वरील लिपीचा उलगडा झाला. सत्य इतिहासाचे व प्राचीन भाषाशास्त्राचे दालन उघडले गेले. धौली आणि गिरनारचे शिलालेख भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर असून सुद्धा जवळजवळ सारखाच संदेश देत होते हे स्पष्ट झाले. त्याच साली जुलै महिन्यात प्रिन्सेपने सांचीच्या लेखाचे आणि फिरोजशहा स्तंभाच्या लेखाचे भाषांतर जगापुढे आणले. त्याच सुमारास श्रीलंकेत टर्नोरने महावंस ग्रंथाचे भाषांतर करून सम्राट अशोकाचा उल्लेख प्रियदर्शि राजा आहे हे जाहीर केले. यातूनच सम्राट अशोक यांची ओळख पक्की होत गेली. ज्या सम्राटाला इतिहासातून पुसून टाकण्यात आले होते तो पुन्हा शिलालेखातून, स्तंभातून प्रगट झाला. त्याचे एकेकाळचे अवाढव्य साम्राज्य पाहून अनेकांचे डोळे पांढरे झाले. भारताच्या हरवलेल्या इतिहासाचा एक मैलाचा दगड प्रकाशात आला.
सम्राट अशोकाने जिंकलेल्या सर्व प्रदेशात वैद्यकीय सोयी उपलब्ध असल्या बाबतचा उल्लेख शिलालेखात आहे. तसेच कलिंगच्या युद्धाचा उल्लेख गिरनारच्या २ ऱ्या आणि १३ व्या शिलालेखामध्ये आहे. हा पुराव्यांचा मोठा तपशील प्रिन्सेपने जगजाहीर केला. स्तंभलेखावरून असे ध्यानात येते की सम्राट अशोक खूप आध्यात्मिक झाला होता. शील-सदाचरण, करुणा व गरीबांना मदत करण्याच्या भावनेने ओथंबला होता. सम्राट अशोकाचे धार्मिक सहिष्णुतेचे आवाहन आणि प्राणी हत्येवरील बंदी हे क्रांतिकारी आवाहन होते. याच मुळे ब्राह्मण पुरोहितांच्या वर्चस्वाला धक्का बसला. त्यांचे रक्तरंजित हिंसक यज्ञ बंद पडले. म्हणूनच सम्राट अशोक यांच्या निधनानंतर त्यांनी कपटनिती अवलंबिली. राज्यकर्त्यांवर आपली पकड मजबूत केली. आणि वर अशोकावदान हा निंदनीय व असत्यावर आधारित असलेला संस्कृत ग्रंथ लिहिला. त्याला प्रमाण मानून काही अती हुशार संशोधक सम्राट अशोक यांच्या बद्दल एकांगी व बिनबुडाचे लेख आजही लिहितात. तरी वाचकांनी त्यांना केराची टोपली दाखवावी.
भाषांतर होत असलेली हुएनत्संगची ६ व्या शतकातील प्रवासवर्णने ब्रिटिश संशोधकांना खूपच माहितीप्रद ठरली. हुएनत्संग भारतात आला तेंव्हा सम्राट अशोकास जाऊन सातशे वर्षे झाली होती. तो म्हणतो वुयूवानची म्हणजेच सम्राट अशोकांची अनेक विहारे, स्तूप ओसाड झाली आहेत. पाखंडी लोकांचे वर्चस्व वाढले आहे. त्याने सम्राट अशोककाळचा कुक्कुटाराम हा जीर्ण झालेला विहार पहिला. सन १७९७ मध्ये मॅकेन्झी आणि १८०९ मध्ये बुकनॉन यांनी केलेल्या सर्वेक्षणातून असंख्य प्राचीन अवशेष उघडकीस आले. त्याकाळी कॅमेराचा शोध लागला नव्हता. चित्रकारांची तुकडी घेवून सर्वेक्षण होत असे. त्यांनी केलेल्या रेखाटनातून बुद्ध व अशोककालीन अवशेषांची माहिती जगाला झाली. या काळात अनेक अवशेषांची भयानक नासधूस झाली. कोरीव काम असलेल्या शीला तळ्यांच्या पायऱ्यासाठी, मंदिराच्या आणि मशिदीच्या बांधकामासाठी वापरल्या गेल्या. ब्रिटिश संशोधकांनी ढिगाऱ्यातून डोकावणारी व दुर्लक्षित पडलेली अनेक शिल्पे बोटीतून इंग्लंडला मुझियमसाठी धाडली.
चार्ल्स एलन यांच्या पुस्तकामुळे ब्रिटिशांनी भारतातून विस्मरणात गेलेला बुद्ध आणि सम्राट अशोक यांचा शोध कसा घेतला याची इत्यंभूत माहिती मिळते. १७ मे २०२२ च्या हिमालयन टाइम्समध्ये “Buddhism in India: Its rise, fall and rise again” हा सुंदर लेख नुकताच वाचला. त्यात शेवटी म्हटले आहे – Buddhism will last forever when other religions will fade away in course of time. The arrival of the British in India was a blessing in disguise for Buddha and Buddhism.Thus credit goes to the British East India Company and its members for the revival of Buddhism in India and the world.
-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)