आंबेडकर Live

बाबासाहेबांना ‘बायबल’ विषयी असलेले ज्ञान पाहून ख्रिश्चन धर्मगुरूला घाम फुटला…

१९३५ ला येवला येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मी हिंदू म्हणून कदापि मरणार नाही.’ अशी घोर प्रतिज्ञा केली होती. त्यांनतर बाबासाहेबांच्या मागे सर्व धर्माचे धर्मगुरू आपला धर्म किती श्रेष्ठ आहे, असे सांगून आपल्या धर्माचा स्वीकार करावा अशी विनंती करू लागले. यामध्ये ख्रिस्ती धर्मोपदेशक सुद्धा बाबासाहेबांना आपल्या धर्मात घेण्यासाठी प्रयत्न करू लागले होते. याबद्दल हा किस्सा वाचा…

एक पाद्री त्यांची जणू परीक्षा घ्यायला एकदा ‘राजगृह’ या निवासस्थानी आला होता. त्यावेळी, ग्रंथपाल शां. शं. रेगे हे बाबासाहेबांना संदर्भग्रंथ देण्यासाठी राजगृहावर आले होते. त्या ख्रिस्ती धर्मगुरूला गुरख्याने बाबासाहेबांच्या अभ्यासिकेत आणून सोडले व तो निघून गेला. बाबासाहेबांनी धर्मगुरूंचं स्वागत केलं आणि येण्याचं प्रयोजन विचारलं. त्यांनी धर्मांतराचा विषय काढून आपला ख्रिस्ती धर्म किती श्रेष्ठ आहे आणि त्याचा स्वीकार केल्यास मागासजातीचे कसे हित होईल, याबद्दल प्रचारकी भाषण सुरू केले.

बाबासाहेब गंभीर मुद्रेने ऐकत होते. जातिभेदाबद्दल बोलताना ख्रिस्ती धर्मगुरू म्हणाला, ‘आमच्या धर्मात समानता आहे. जातिभेदाचा लवलेश नाही.’ तेव्हा बाबासाहेब रेगे यांच्याकडे वळून म्हणाले, ‘काय रे! आपल्याकडे ते ख्रिश्चन प्रोफेसर आहेत. तो सलढाणा त्यांच्याविषय़ी आपल्याला काय सांगत होता?’

रेगे म्हणाले, ‘तो म्हणत होता, मी ब्राह्मण-ख्रिश्चन. डिसोझा मूळचा प्रभू म्हणजे तो सारस्वत ख्रिश्चन आणि रॉड्रिग्ज खालच्या जातीचा आहे. आणि आमच्यात आपापसात बेटी व्यवहार होत नाहीत.’

या दोघांचं हे बोलणं इंग्रजीतून चाललं होतं आणि ते धर्मगुरूला समजत होतं. धर्मगुरूकडे पाहिलं तर तो किंचित् अस्वस्थ झाल्यासारखा वाटत होता. नंतर बाबासाहेबांनी विषय बदलला व त्यांच्या हातातील बायबलची आवृत्ती कोणाची? असे विचारले. ‘कोणती म्हणजे? हे होली बायबल!’ हातातील बायबल दाखवित तो धर्मगुरू म्हणाला आणि ‘काय हा खुळ्यासारखा प्रश्न?’ असा भाव धर्मगुरूच्या मुद्रेवर उमटला.

बाबासाहेब म्हणाले, ‘ते खरे हो! पण कोणती आवृत्ती? एलिझाबेथकालीन, किंग्ज व्हर्जन, मॉडर्न व्हर्जन की आणखी कोणती?’ रेगेंकडे पाहत बाबासाहेब म्हणाले, ‘अरे, ते सर्व बायबल्स घेऊन ये!’ रेगे यांनी लहानमोठ्या आकाराच्या बायबलच्या अठरा प्रती त्यांच्यासमोर ठेवल्या. बाबासाहेबांनी एकेक उघडून विवक्षित आवृत्त्या आणि त्यातील फरक फादरला विशद केला. हे पाहून फादरला घाम फुटला. तो उठण्यासाठी चुळबूळ करू लागताच बाबासाहेबांनी विचारले, ‘बायबलचे विवेचक ग्रंथ कोणते वाचले आहेत?’ त्याला उत्तर देता आले नाही.

बाबासाहेबांनी पुन्हा रेगे यांनाच ग्रंथ आणायला पाठवले. त्यातले कूक नावाच्या ग्रंथकाराचे ‘कमेंट्रीज ऑन दि बायबल’ हे पुस्तक दाखवून, ‘यात फार साक्षेपी समीक्षा आहे. तुम्ही तो ग्रंथ जरूर वाचा.’ तसेच ‘लाइफ ऑफ जिझस’, खलील जिब्रॉनचे ‘मॅन फ्रॉम लेबेनॉन’ ही चरित्रेही फार उत्तम असल्याचे फादरला सांगितले. फादर हळूच, निरोप न घेताच निघून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *