ब्लॉग

आनंदाची बातमी दक्षिण भारतातील पहिली बौद्ध युनिव्हर्सिटी ‘या’ राज्यात होणार

दक्षिण भारतातील पहिली बौद्ध युनिव्हर्सिटी हैदराबाद पासून १६५ कि.मी. अंतरावर असलेल्या नागार्जुनसागर येथे स्थापित होत आहे, ही खूपच आनंदाची बातमी आली आहे. तेलंगण राज्य सरकारने याबाबत बुद्धवनमच्या २७४ एकर जागेमधील ६० एकर जागा युनिव्हर्सिटी साठी राखून ठेवलेली आहे.

आचार्य नागार्जुन हे २-३ ऱ्या शतकातील महायान पंथाचे मोठे तत्त्वज्ञानी होते. त्यांचे मुलमाध्यमिककारिका, द्वादशमुखशास्त्र आणि महाप्रज्ञापारमिताशास्त्र हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ४ थ्या शतकात नालंदा विद्यापीठात त्यांच्या शून्यवादाचा ऊहापोह होत असताना गणितीय भाषेतील शून्याचा शोध लागला आणि तिथून मानवाची प्रगतीची घोडदौड सुरू झाली. आचार्य नागार्जुन यांचे सर्वाधिक वास्तव्य नागार्जुन सरोवर येथे झाले असल्याने येथे स्थापित होत असलेले बौद्ध विद्यापीठ त्यांना मोठी आदरांजली ठरेल.

हे बौद्ध विद्यापीठ स्थापन करण्यामागे आचार्य नागार्जुन यांच्या माध्यमिक संप्रदायाला मानणाऱ्या मलेशिया देशातील संघाने पुढाकार घेतला आहे. बुद्धवनमचे विशेष अधिकारी मल्लेपल्ली लक्ष्मीया यांनी सांगितले की येथे जवळजवळ ६८ विषय शिकवले जातील. ज्यामध्ये बौद्ध संस्कृती, वास्तूशास्त्र, बौध्द साहित्य आणि बुद्धांच्या काळातील औषधशास्त्र, चित्रकला, तत्वज्ञान, मार्शल आर्ट, तंत्रज्ञान, व्यवस्थापन इत्यादी विषय असतील. यामुळे मोठ्या प्रमाणावर देशातून-परदेशातून विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येतील.

बौद्ध विद्यापीठा शिवाय येथे बंगलोरची महाबोधी सोसायटी, तैवानची गोन्ग शान मॉनेस्ट्री आणि चायना महायान बुद्धीष्ट तर्फे मोठे संघाराम बांधण्यात येत आहेत. तसेच दलाई लामा यांच्या संस्थेतर्फे आरोग्यालय आणि दिल्ली येथील एक ग्रुप हॉटेल उभारीत आहे. थोडक्यात लवकरच तेलंगण राज्यात बौद्ध संस्कृतीची एक वेगळीच झलक पहावयास मिळेल.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)