बुद्ध तत्वज्ञान

आपण धम्माचे पालन करून दुस-यावर नाही तर स्वत:वरच उपकार करतो

लोकांचे रहस्य व्यक्त करताना भगवन्ताने सांगितले आहे की,

‘’कम्मुना वत्तति लोको, कम्मुना वत्तति पजा।
कम्मनिबन्धना सत्ता, रथस्साणीव यायतो।।”

अर्थ : हा समग्र संसार (जग) कर्माने परिचालित आहे. ही समग्र प्रजा कर्माने परिचालित आहे. चालणा-या रथाचे चाक जसे आरीच्या आधाराने सतत फिरत राहते त्याचप्रमाणे सर्व प्राणिमात्र कर्मबंधनात अडकून राहून काम करणारे आहेत. याचा अर्थच हा आहे की, जर आपले कर्म अनैतिक असेल तर त्याचा परिणाम दु:खद राहणार आहे आणि आपले कर्म कुशल असेल तर त्याचा परिणाम सुखद राहणार आहे. म्हणून भगवन्तांनी उपदेश करताना ही गाथा सांगितलेली आहे:

‘’सब्ब पापस्स अकरणं , कुसलस्स उपसम्पदा।
सचित्त परियोदपनं एतं बुद्धान सासनं।”

म्हणजे कुठल्याही प्रकारचे पापकर्म न करणे, कुशल कर्म करणे आणि आपल्या चित्ताला शुद्ध करणे, हाच बुद्धांचा उपदेश आहे. आपण आपल्या सुखाच्या अपेक्षेने वेळ आणि परिस्थितीनसार चांगले वागत असतो, पण यामुळे आपण सुखी होत नाही, कारण कोणत्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दुःख उत्पन्न होते याचे आपणास ज्ञान नसते. ज्या माणसाला या कर्माने परिचालित या संसारात सुखी होण्याची अपेक्षा आहे त्याने खालील शीलांचा अवलंब करणे अनिवार्य आहे. ते अशाप्रकार

  • मी प्राणीहिंसा करणार नाही.
  • मी चोरी करणार नाही.
  • मी व्यभिचार करणार नाही.
  • मी खोटे बोलणार नाही.
  • मी चुगली – चहाडी करणार नाही.
  • मी कठोर बोलणार नाही.
  • मी वाचाळ बडबड करणार नाही.
  • मी लोभ करणार नाही.
  • मी द्वेष करणार नाही आणि
  • मी मिथ्या दृष्टीचा अवलंब करणार नाही.

जे लोक या शीलाचे काटेकोरपणे, समजूतदारपणे पालन करतात ते या लोकी सुखी होतात, पण जे लोक अज्ञानवश या शीलांचा भंग करतात त्यांना अडचणींना तोंड द्यावेच लागते.

भगवंताने ‘पाटलीगामीय सुत्तात याचा उल्लेख केला आहे. तो अशाप्रकारे
” गृहपतींनो ! शीलभ्रष्ट होऊन दु:शील बनण्याचे पाच दोष आहेत. कोणते पाच?
१ ) गृहपतींनो ! शीलभ्रष्ट होऊन दुःशील होणारांची संपत्ती अत्यंत प्रमाद केल्यामुळे कमी होऊ लागते. शीलभ्रष्ट होऊन दुःशील बनण्याचा हा पहिला दोष आहे.
२ ) नंतर त्याची बदनामी सर्वत्र पसरते, हा दुसरा दोष आहे.
३ ) मग तो ज्या ज्या परिषदेमध्ये जातो, ती परिषद क्षत्रियाची असो वा वा गृहपतींची असो वा श्रमणांची असो, तिथे तो अविशारद आणि मूक होऊन जातो. हा तिसरा दोष आहे.
४ ) मृत्युसमयी तो भयभीत होतो. हा चौथा दोष आहे.
५ ) मृत्यूनंतर नरकात पडून त्याला दुर्गती प्राप्त होते. हा पाचवा दोष आहे.

गृहपतींनो ! शीलभ्रष्ट होऊन दुःशील होण्यात हे पाच दोष आहेत ₹. ” ( उदानग्रंथपालि. )
वरील सुत्ताचा आशय लक्षात घेता, ज्याला सुखी होण्याची इच्छा आहे त्याने शीलवान बनणे अनिवार्य आहे. या जगात आज आपण पाहतो की, शीलाचा भंग केला जात असल्यामुळे या जगातील मानवी जीवन दु:ख, दैन्य आणि कलहाने व्यापत चालले आहे.

स्वतः सुखी होणे आणि इतरांना सुखी करणे हाच आपल्या जीवनाचा हेतू असल्यास स्वतः शीलवान होऊन इतरांना शीलपालनात मदत करणे हाच एकमेव मार्ग आहे, दुसरा नाही कारण भौतिक सुखाच्या लालसेने आपण प्रभावित होऊन आपले इच्छित ध्येय प्राप्त करू लागतो तेव्हा कळत – नकळत आपण ‘ शीलांचा घात करतो आणि परिणामस्वरूप दुःख आणि कलहच प्राप्त करतो. दुःख आणि कलह आपणास अप्रिय असल्यास सुख उत्पन्न करणाऱ्या दान-शील – भावना या बौद्धजीवनमार्गाचा अवलंब करणे अनिवार्य आहे. हा श्रेष्ठ मार्ग ज्या महाकारुणिक तथागतांनी शोधला त्यांच्याप्रति, त्यांच्या धम्माप्रति व या धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी झटणाऱ्या भिक्खुसंघाप्रति मनात आदर आणि विश्वास ( श्रद्धा ) असणे अनिवार्य आहे.

आपल्याला सुख पाहिजे असे म्हटल्याने किंवा तशी इच्छा केल्याने कोणी सुखी होत नाही. ज्याप्रमाणे रोगातून मुक्त होण्यासाठी संबंधित डॉक्टरांवर विश्वास असणे आणि त्यांनी दिलेले औषध प्रामाणिकपणे घेणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे ज्यांना सुखी व्हायचे आहे त्यांनी भगवंतांवर श्रद्धा ठेवून धम्माचे प्रामाणिकपणे पालन केलेच पाहिजे. धम्माचे पालन करून आपण दुस-या कोणावर उपकार करीत नाही, तर स्वत:वरच उपकार करीत असतो. कारण यामुळे आपण स्वत:च सुखी होतो, दुसरा नाही. व्यक्तिगत जीवनातील आत्मिक समाधान आणि समंजस नातेसंबंध यातूनच आपले संसारी जीवन सुखी होत असल्यामुळे अशा प्रकारचे संतुलित जीवन जगणे हाच आपल्या जीवनाचा खरा हेतू असावा. आपल्या मनातील भ्रामक कल्पना पूर्ण करण्यासाठी झटणारे लोक स्वत: ही दु:खी राहून इतरांनाही दु:ख देत असतात. म्हणून निसर्गाच्या नियमांचा विचार करून धम्माचा अवलंब केल्यास आपले सर्वांचेच जीवन सुखी होण्यास मदत होऊ शकते.

सर्व सत्त्वांना सुख लाभावे हीच भगवंतांची देसना आहे. ही देसना पूर्ण करण्यासाठी आपले सहकार्य अनिवार्य आहे. हे सहकार्य म्हणजे स्वत: धम्मानुसार जगून स्वतः सुखी होणे हेच होय. आपल्या या सहकार्याबद्दल धन्यवाद आणि या मोलाच्या कार्यात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांनाच सुख, आरोग्य आणि दु:खमुक्ती लाभावी, हीच मंगलकामना आहे. भवतु सब्ब मंगलं ।

संदर्भ : जीवनांचे प्रयोजन आणि मानवी प्रतिष्ठा.
डॉ. भदंत के.श्री.धम्मानंद.