इतिहास

बौद्ध साहित्यात पर्यावरण आणि संस्कृती यांचा अतूट बंध आढळतो

बौद्ध धम्मा मध्ये पर्यावरण आणि संस्कृती यांचा अतूट बंध आढळतो. वृक्ष, वनराई, फुलझाडे, फळझाडे, बाग-बगीचे, आमराई, पुष्पवाटिका व उद्याने यांचे वर्णन बौद्ध साहित्यात विपूल आढळते. मानवी जीवन सुसह्य करण्यात यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. वृक्षराजी यांची काळजी घेतल्यास तसेच त्यांचे संवर्धन केल्यास ते आपल्यावर सुखाचा वर्षाव करतात. कारण त्यांना नैसर्गिकरीत्या सुप्तशक्ती प्राप्त असते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. वृक्षारोपण केल्याने सुख, शांती, प्रकृती व संपत्ती टिकुन राहते. त्यात चांगली वाढ होते.

छायाचित्रात लेखक संजय सावंत बोधीवृक्षाचे रोपण करताना.

भगवान बुद्धांच्या काळातही अनेक वृक्ष त्यांच्याशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या निगडित होते. विहार व स्तूपाच्या आजूबाजूस अनेक लता-वेलींनी भरलेली उद्याने असत. नालंदा व तक्षशिला येथील उद्यानाचे दाखले बौद्ध साहित्यात मिळतात तसेच बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण हे वृक्षाखाली झाल्याचे संदर्भ साहित्यातून व शिल्पांमधून आढळतात. त्रिपिटक, अठ्ठकथा व जातककथा यामध्ये जवळजवळ ६१ वनराईची माहिती असल्याचे दिसून येते. तसेच निबिड अरण्य, मृगवन, पुष्करणी, नैसर्गिक व मनुष्यनिर्मित जंगल यांचे उल्लेख आढळतात. विशेष करून पाली त्रिपिटक व अठ्ठकथेत खालील वनांचे उल्लेख आढळतात.

१) श्रावस्तीचे जेतवन Jetwan of Shravasti २) साकेतचे अंजनी वन आणि कंटकी वन Anjani Vana & Kantaki Vana of Saket ३) नालाकप्पणचे केतकी वन Ketaki Vana of Nalakappan ४) कपिलवस्तु आणि वैशालीचे महावन Mahavana of Kapilvastu & Vaishali ५) शाक्यांचे लुंबिनीवन Lumbini Vana of Sakya ६) कुशीनगर मल्लांचे सालवन Salvana of Mallas of Kusinagar ७) वज्जा लोकांचे वेशाकल वन Veshakal Vana of Vajja ८) छेदी यांचे परिलेक वन Perilekyavana of Chedi ९) काशी यांचे आंबटक वन Ambataka Vana of Kasi १०) अलबी आणि कौशूम्बी यांचे सिसापवन Sisap Vana of Alabi & Kausambi ११) राजगृह आणि किम्बीला येथील वेळूवन Veluvana of Rajgriha & Kimbila १२) मोरया यांचे पिप्पाली वन Pipphalivana of Moriya १३) वज्जीया यांचे नागवन Nagvana of Vajjiya

भगवान बुद्ध यांच्याशी थेट संबंध असलेली वने खालील प्रमाणे आहेत.
१)जेतवन (श्रावस्ती) २) नीग्रोधवन (कपिलवस्तु) ३) महावन (वैशाली, उरूवेला व कपिलवस्तु) ४) लुंबिनीवन (कपिलवस्तू व देवदाह) ५) वेळूवन (राजगृह) ६) आम्रवन (राजगृह) ७) आम्रपाली वन (वैशाली)

अशी ही बौद्ध साहित्यातील विविध वनांची माहिती आहे. वने, अरण्ये राखली तरच मनुष्य प्राणी या पृथ्वीवर टिकणार आहे. निसर्गचक्र सुरळीत चालणार आहे. अन्यथा काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी अतिवृष्टी होत जाईल. म्हणून मुलाबाळांना घेऊन दर महिन्याला किंवा पौर्णिमेला या बुद्धभूमीत एका तरी वृक्षाचे रोपण करण्याचा निश्चय केला पाहिजे. तरच पुढच्या पिढीचा भविष्यकाळ सुसह्य असेल.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

One Reply to “बौद्ध साहित्यात पर्यावरण आणि संस्कृती यांचा अतूट बंध आढळतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *