बातम्या

चार भिक्खुंना ‘अग्रमहापंडित’ पुरस्कार जाहीर; “अग्रमहापंडित” ही उपाधी म्हणजे सर्वोच्च ज्ञानी पुरुष

म्यानमार या बौद्ध देशाचा स्वातंत्र्य दिन ४ जानेवारी रोजी असतो. यावर्षी ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अध्यक्ष यु विन मिंट यांनी श्रीलंकेच्या ४ भिख्खूंना ‘अग्रमहापंडित’ हा पुरस्कार जाहीर केला. तसेच इतर सन्माननीय पुरस्कार देखील पॅगोडातील, विहारातील भिक्खुंना देण्यात आले असून श्रीलंकेच्या एका सामान्य बौद्ध उपासकास देखील पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ‘अग्रमहापंडित’ पुरस्कार प्राप्त झालेले भिक्खू खालील प्रमाणे आहेत

१) आदरणीय. मिहिरपेने सोबिता थेर
२) आद.डॉ. कोलूपिटीये महिंद्रा सन्हा रख्खीथा महाथेर
३) आदरणीय. तिरीकुनामुले आनंदा महानायक थेर
४) आदरणीय. दोदाम्पहला चंद्रसिरी महानायक थेर.

त्याचप्रमाणे बुद्धिस्ट आणि पालि विद्यापीठाचे उपकुलगुरू आर सुमनसिरी आणि सिरीजयवर्धनेपुरा विद्यापीठातील, पाली आणि बुद्धीष्ट स्टडी विभागाचे प्राध्यापक डॉ. मेदगामपिटीए विज्जताधम्मा यांना देखील ‘अग्रमहाधम्मा ज्योतिका ध्वजा’ या भूषणाने सन्मानित करण्यात आले. “अग्रमहापंडित” ही एक सर्वोच्च उपाधी असून यात पंडित शब्द आल्याने दचकण्याचे कारण नाही. गेल्या दोन हजार वर्षांच्या काळात अनेक शब्दांचे मूळ अर्थ आणि भावार्थ भारतात बदललेले असून त्याचा योग्य अर्थ समजून घ्यायचा असेल तर म्यानमार किंवा सिरीलंका देशातील संस्कृतीत डोकावून पाहिले पाहिजे.

“अग्रमहापंडित” ही उपाधी म्हणजे सर्वोच्च ज्ञानी पुरुष होय. पालि त्रिपिटकातील प्रत्येक शब्द आणि ओळ ज्यास माहिती असून तीचे जो योग्य विवरण करून सामान्यजनांना सुलभरीत्या धम्म शिकवितो अशा बौद्ध भिक्खूंनाच हा पुरस्कार दिला जातो. यासाठी म्यानमार देशाची राज्य संघ महानायक कमिटी ही योग्य, अभ्यासू, धम्मपालन करणाऱ्या ज्ञानी भिक्खुंचा शोध घेते. पुरस्कारासाठी निवडलेल्या सर्व भिक्खुंची नकळतपणे परीक्षा घेतली जाते. आणि त्यातूनच पुरस्कारास योग्य असलेल्या ज्ञानी भिक्खुंची निवड करतात.

गेल्या दोन हजार तीनशे वर्षांपासून म्यानमार आणि सिरिलंकेत धम्म बहरलेला असून कट्टर बौद्ध असलेल्या म्यानमार देशाने ‘अग्रमहापंडित’ पुरस्कार सिरिलंकेच्या भिक्खुंना प्रदान करावा ही खरोखरच आनंददायी गोष्ट आहे. बुद्धशासनाचे पावित्र्य कायम राखणाऱ्या या देशांना मी नमन करतो.

भारतात देखील अशा ज्ञानी भिक्खुंची संख्या हळूहळू वाढत आहे. बुद्धिस्ट सेमिनरीज स्थापन होत आहेत. थोडा वेळ लागेल, पण भविष्यात धम्माचे सुवर्णयुग पुन्हा अवतरेल असा आशावाद निर्माण होत आहे. अभ्यासू आणि ज्ञानी भिक्खुंची साखळी विद्यालयातून सतत बाहेर पडल्यास सामान्यजनात बौद्ध धम्माची नक्कीच आवड निर्माण होईल. म्हणूनच बुद्धांच्या उपदेशाचे आकलन या भारत भूमीत सर्वांना होवो, अशी मी प्रार्थना करतो.

संजय सावंत, नवी मुंबई ( लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)