बाबासाहेब फक्त पुस्तक प्रेमी नव्हते तर त्यांना फुलझाडांचा व बागेचा सुद्धा छंद होता. त्यांच्या या छंदाबद्दल आपण जाणून घेऊ.
बाबासाहेबांच्या बगिच्याविषयी बळवंतराव वराळे लिहितात, “ बाबासाहेब सायंकाळी ऑफिसमधून घरी आल्यानंतर आपल्या बंगल्यापुढील बागेत फिरत असत. माळ्याला हाक मारीत असत. अमक्या ठिकाणी अमके झाड लाव, अशा प्रकारच्या सूचना देत असत. बाबासाहेबांना फुलझाडांचा व बागेचा छंद लहानपणापासून होता. आपली बाग दिल्लीतील कुठल्याही मंत्र्याच्या बागेपेक्षा सरस असावी असे त्यांना वाटत होते. बागेसाठी वाटेल तो खर्च करण्याची त्यांची तयारी होती.
त्या वेळी दिल्लीतील बाबासाहेबांची बाग म्हणजे एक प्रेक्षणीय स्थळ असे इतरांना वाटत होते. बागेची मांडणी बाबासाहेब स्वत: आपल्या इच्छेप्रमाणे व मनासारखी करून घेत असत. बंगल्यापासून कम्पाऊंडपर्यंत सुमारे १०० यार्डचे अंतर होते. या विस्तीर्ण आवारात बाबासाहेबांची बाग उभी होती. ही बाग पाहून रस्त्याने जाणा-या -येणा-यांना मोह होत होता. रस्त्याने जाणारी-येणारी माणसे बागेकडे टक लावून पाहात. काही जण काही वेळ थांबून जात. बंगल्याच्या दरवाजाच्या आत काही जण डोकावून जात. बागेकडे काही जण अंगुलिनिर्देशही करीत. कोणालाही मोह वाटावा अशीच बाबासाहेबांची बाग विलोभनीय होती.
करणसिंगांकडून मी ऐकले की दिल्लीत व्हाईसरॉयच्या बागेचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर दुसरा क्रमांक बाबासाहेबांच्या बागेचा लागतो. बागेत नानाविध रंगांची, आकाराची असंख्य फुले होती, झाडे होती, वेली होत्या, नाना रंगाच्या आकाराची विलोभनीय रूपे पाहात असता मन मोहित होत असे. मनाला एक प्रकारची तृप्ती वाटत असे. परदेशातून येणारे किती तरी प्रवासी बाबासाहेबांच्या बागेचा फोटो घेत असत. दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाले होते. त्यामुळे ब्रिटिश सैनिक व अमेरिकन टॉमीज नव्या दिल्लीत इकडे-तिकडे फिरत असत. त्यांच्यापैकीही काही जण बाबासाहेबांच्या बागेचा फोटो घेत असत. फुलझाडांच्या बागेची जशी बाबासाहेबांना आवड होती त्याप्रमाणे भाजीपाला वगैरे पिकवण्याचीही आवड होती. बंगल्याच्या मागील बाजूस उत्तम प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड त्यांनी करवली होती. आपल्या बागेतील ताजी भाजी दररोज जेवणासाठी ते उपयोगात आणत असत.
बाबासाहेबांना लहानपणापासून बागकामाचे फार आकर्षण वाटत होते . याबाबत आपल्या बालपणातील एक गमतीशीर आठवण सांगताना बाबासाहेब म्हणतात, मिलिटरी विभागात राहणा-या साहेब लोकांच्या बंगल्याच्या आजूबाजूला लहान मोठ्या बागा होत्या. त्या बागांमध्ये माळी काम करत असताना मी सतत पाहत असे. त्यामुळेच बागेबद्दलचे आकर्षण माझ्या मनात निर्माण झाले होते. माळ्यांनी बागेतून उपटून टाकलेली निरुपयोगी रोपटी व कापून टाकलेल्या निरुपयोगी अशा फांद्या मी घराकडे आणत असे व घराशेजारी ती रोपटी व फांद्या मी लावत असे. पाणी देण्याचा पाट करण्यासाठी म्हणून शेजा-यांच्या घरावरची मिळतील तितकी कौले काढून आणत असे. ती कौले एकमेकांना जोडून फुल-झाडांना पाणी देण्यासाठी मी पाट तयार करीत असे. आपल्या घरावरची कौले नाहीशी झालेली पाहून शेजारी मला शिव्याशाप देत असत. हे शिव्याशाप जर कधी माझ्या ऐकण्यात आले तर मी मुद्दाम पुन्हा त्यांची नजर चुकवून जास्तच कोले काढून आणत असे व त्यांच्या घरादारात धूळ उडावी म्हणून उकिरड्यातील राखेत एकसारख्या उड्या मारीत असे.
म.भि.चिटणीस यांनी एके ठिकाणी लिहिले आहे की, “ बाबासाहेबांना बगिच्याची आवड फार, मुंबईत राजगृहाच्या भोवतालच्या अपु-या जागेत ती भागवता आली नाही. ती त्यांनी पृथ्वीराज मार्गावरील आपल्या घराभोवतालच्या बागेची सुधारणा करून आणि स्वत:च्या खर्चाने उत्तम निगा राखून भागविली . औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयासमोरच्या उद्यानाची आखणीही त्यांनीच केली होती. दिल्लीच्या त्यांच्या बागेला‘ घरासमोरील उत्तम बगीचा ‘ म्हणून बक्षीसही मिळाल्याचे ते अभिमानाने सांगत.
सूचना : वरील बाबासाहेबांचे छायाचित्र औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाच्या वास्तुचे बांधकाम सुरु असताना काढलेले आहे.