बुद्ध तत्वज्ञान

आर्य अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करा आणि दुःख मुक्त व्हा!

१ ) सम्मादिट्टी ( सम्यक दृष्टी )
२ ) सम्मा संकप्पो ( सम्यक संकल्प ) ३ ) सम्मावाचा ( सम्यक वाणी )
४ ) सम्मा कम्मांतो ( सम्यक कर्मात ) ५ ) सम्मा आजिवो ( सम्यक आजिवीका )
६ ) सम्मा वायामो ( सम्यक व्यायाम ) ७ ) सम्मा सती ( सम्यक स्मृती )
८ ) सम्मा समाधी ( सम्यक समाधी )

हा आठ अंग असलेला मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग होय. या मार्गाचे अनुसरण करणे व पंचशील तत्वांचे पालन करणे म्हणजेच दुःख मुक्त होणे होय, या अष्टांगिक मार्गाचे वर्गिकरण १) प्रज्ञा २) शील ३) समाधी या प्रकारे केले जाते.

अष्टांगिक मार्गाचे वर्णन :

(१) सम्मादिठ्ठी (सम्यक दृष्टीकोन) : – बुध्दाने प्रतिपादन केलेली प्रज्ञा ही केवळ सम्यक दृष्टीकोनातूनच (योग्य दृष्टीकोन) निर्माण होते. आपल्याला अविद्येतून मुक्त व्हायचे असेल, प्रज्ञावंत ( ज्ञानी ) व्हायचे तर आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा योग्य असला पाहिजे. सम्यक दृष्टिकोन असला पाहिज. सम्यक म्हणजे योग्य, जीवन व जिवनातील साऱ्याच प्रश्नांकडे बघण्याचा, अर्थपूर्ण दृष्टीकोन होय. जीवनात जे आहे, जशे आहे, जशे घडत आहे. त्याला तशेच तटस्थपणे, समतेत राहून पाहणे, विचलित न होता, न डगमगता पाहणे, सुख आले तरी फार आनंदून न जाणे, दु:ख आले तरी दुःखी न होणे, सुख आणि दुःख हे दोन्ही अनित्य आहेत. हे जीवनच अनित्य, क्षणभंगूर आहे. या जीवनावर शरीरावर आसक्त न होणे. ज्याला मी किंवा माझे म्हणतो ते मी नाही व माझे ही नाही. कारण मी नावाची स्थिर वस्तू ( शरीर ) नाहीच. ज्याला ‘ मी म्हणतो ते सतत परिवर्तनशील आहे. सतत बदलत आहे. यामुळे मी हा प्रकारच अस्तित्वात नाही हे समजणे, मी व माझे या कल्पनाच मुळात चुकीच्या आहेत, हे समजून घेणे यालाच सम्यक दृष्टी असे म्हणतात. प्रॉपर अंडरस्टॅडींग म्हणजे सम्यक दृष्टी होय. १) सर्व संस्कार अनित्य आहेत, बदलत आहेत. माझ्या बहुतेक सुखदुःखाला मीच जबाबदार आहे हे समजने. सत्यास सत्य व असत्यास असत्य मानने. २ ) दुःख व सुख हेही क्षणिक आहेत. ३ ) मी व माझे काहीच अस्तित्वात नाही. सारे शरीर कणाकणांनी बनले आहे व ते सतत बदलत आहे. रोज आपण मृत्यूच्या जवळ जात आहोत. एकदा नष्ट होणार आहोत. मी व माझे या प्रती आसक्त होणे म्हणजे दु:ख वाढवणे होय, हे सर्व जाणणे म्हणजे सम्यक दृष्टी होय.

(२) सम्मा संकप्पा (सम्यक संकल्प) : – आपण कोणत्या प्रकारचे संकल्प करतो यावरच आपले सुख दुःख अवलंबून आहेत. संकल्प करणे म्हणजेच ठरवणे, निर्धार करणे होय. प्रज्ञा विकसित करायची, ज्ञानी व्हायचे तर संकल्प हे योग्य असेच असले पाहिजे. जे विचार मनात येतात, जे चिंतन, मनन करतो ते योग्य असले पाहिजे. श्रेष्ठ दर्जाचे असले पाहिजे. मनातील विचार भयग्रस्त, लोभग्रस्त, व्देषग्रस्त इर्षाग्रस्त नसावेत. दूषित विचारांचा प्रभाव, पगडा नष्ट करणे, वाईट विचार, कृती न करणे, चांगले ते करण्याचा संकल्प करणे दृढ निश्चयाने करणे, कायावाचा मनाने शुध्दाचरनाचा निर्धार करणे. बुध्दाच्या कल्याणकारी मार्गावरुन विचलित न होण्याचा संकल्प करणे. घेतलेले काम शेवटास नेण्याचा निर्धार ( विचार ) संकल्प करणे, सत्याच्या म्हणजेच धम्माच्या प्रचारार्थ वाहून घेण्याचा निर्धार, अकुशल न करण्याचा व कुशल कर्मच करण्याचा दृढ निर्धार करणे, चुकीच्या अधर्माविरुध्द लोक जागृतीचा संकल्प करणे, लोकांना चुकीच्या मार्गाविरुन धम्म मार्गावर आणण्याच्या निर्धार करणे, स्वतः बरोबर इतर मानवाच्या, पशुपक्षी, कुमीकिटकांच्या भल्याचा संकल्प करणे. यालाच सम्यक संकल्प म्हणतात.

(३) सम्मावाचा (सम्यक वाचा, वाणी) : – आर्य अष्टांगिक मार्गातील हे तिसरे अंग होय. सम्यक वाणी म्हणजे शुध्द वाणी, सात्विक वाणी सम्यक संकल्प असे म्हणतात. मधूर वाणी, मंगलवाणी होय. वाणीची शुध्दता, बोलण्यातील मधुरता म्हणजे सम्मा वाचा होय. कटू वचन न बोलणे, योग्य तेवढेच, आवश्यक तेवढेच बोलणे, निरर्थक बडबड न करणे, निंदा, स्तुती टीका टिपन्नी न करणे यालाच सम्यक वाणी म्हणतात. आपण जी वाणी बोलतो ती कुणासही न बोचनारी, न दुःखावनारी असावी. इतरांना मानसिक वेदना होतील, दुःख होईल असे बोलू नये. वाणीनेच माणसे जुळतात. वाणीनेच ती तुटतात. सम्यक वाणी नसेल तर इतरांशी बंधूभाव व मैत्री असू शकत नाही. सम्यक वाणी नसेल तर परस्परात दुरावा, तेढ वितुष्ठ निर्माण होते. सम्यक वाणी म्हणजे एक प्रकारचे वाचीक कर्म होय, क्रोध, द्वेष, घृणा, अंहकाराने, ग्रस्त होऊन न बोलणे, नको त्या प्रसंगी. नको त्या लोकांपुढे नको त्या विषयावर न बोलणे. वाणी अशुध्द केव्हा होते ? १ ) खोटे बोलणे २ ) इतरांना फसवणे ३ ) कटू बोलणे ४ ) इतरांची निंदा करणे ५ ) चहाडी, चुगली करुन परस्परात द्वेष निर्माण करणे ६ ) सत्य लपवून ठेवणे ७ ) विचारपूर्वक न बोलणे, या प्रकारच्या कृती घडल्या की वाणी अशुध्द होते व अशा वाईट वाणीचे परिणाम वाईटच होतात, आपला दर्जा, प्रतिष्ठा व आपले इतरांशी संबंध, आपल्या बद्दल इतरांचे मत हे ब-याच प्रमाणात आपल्या वाणीवरच अवलंबून असते. म्हणून सम्यक वाणी योग्य भाषा, योग्य बोल ) अत्यंत आवश्यक आहेत.

(४) सम्मा कम्मन्तो (सम्यक कर्म , कृती) : – सम्यक कर्म । म्हणजे योग्य कर्म , कृती होय . कर्म म्हणजे विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काम करणे होय , कृती करतांना आपला हेतूच महत्वाचा असतो . जे करतो आहोत किंवा केले आहे किंवा जे पुढे करणार आहोत त्या मागची आपली भावना काय आहे, कशी आहे, आपला हेतू कसा आहे, त्यावरच कृतीचा परिणाम म्हणजेच कर्माचे फळ अवलंबून असते. वाईट मनोवृत्तीने केलेले कार्य चांगले असले तरी परिणाम चांगला असू शकत नाही. उलट चांगल्या मनाने केलेल्या वाईट कर्माचा परिणाम चांगला असू शकतो. यावरुन कर्म करतांना आपल्या मनातील हेतू शुध्द असला पाहिजे. चांगला असला पाहिजे. चांगल्या हेतूनेच, उद्देशानेच कर्म केले पाहिजे. वाईट हेतूने कर्म केले तर परिणाम वाईट होतोच हे लक्षात ठेवावे. म्हणूनच शुध्द मन, निर्मळ मन हेच अत्यंत महत्वाचे आहे. कुशल कर्माच्या आधारेच जीवन जगले पाहिजे. सम्यक कर्म हेच शीलाचे महत्वाचे अंग आहे. आपल्याला शीलवंत व्हायचे तर आपले कर्म व कर्मामागील हेतु शुध्द, निर्मळ, निस्वार्थ असला पाहिजे. सम्यक कर्म म्हणजेच – १) हिंसा न करणे २) चोरी न करणे ३) व्यभिचार न करणे ४) मद्यपान न करणे ५) खोटे न बोलणे या पंच शीलाचे पालन करणे होय. थोडक्यात पंचशीलाचे पालन करणे म्हणजेच सम्यक कर्म करणे होय. आपण सम्यक कर्मानुसार (चांगल्या हेतुने) जीवन जगण्याचा प्रयत्न केला नाही याचा अर्थ आपण चुकीच्या हेतुने कर्मे केलीत. शीलाचे पालन केले नाही तर परिणाम चांगला होणार नाही. अशुध्द हेतूने केलेल्या कर्माचे फळ, चांगले असूच शकत नाही. बरेचदा आपल्याला कोणत्या कर्माचे कोणते फळ आहे हे कळत नाही. बरेचदा कर्म केल्यानंतर दिर्घ काळानंतर फळ येते पण कर्म तशे फळ हे ठरलेले आहे. निवडुंगाचे झाड जो लावेल त्याला आंबे मिळणार नाहीत. आंबा लावणाऱ्याला निवडुंगाचे काटे मिळणार नाहीत. त्याला आंब्याची फळेच मिळतील. म्हणूनच पंचशीलांचे पालन आवश्यक आहे. त्यातच आपले कल्याण आहे. म्हणूनच बुध्द वंदना घेतांना आपण पंचशिल ग्रहण करतो व पंचशिलेचे पालन करण्याचा निर्धार करतो. केवळ पोपटपंछी करण्यासाठी पंचशील ग्रहण करत नाहीत.

(५) सम्मा आजीवो (सम्यम आजिविका) : – सम्यम आजिविका म्हणजे योग्य मार्गाने, योग्य साधनांव्दारे जीवन निर्वाह करणे, चरीतार्थ चालवने, उपजिविका करणे, उत्पन्न मिळवते, धनसंपत्ती मिळवने होय. उदा. १ ) दुस-यांला हानी न पोहचविता पोटभरणे, उदर निर्वाह करणे. २ ) कामात लबाडी न करणे ३ ) काम चुकारपना न करणे ४ ) हिंसात्मक मार्गाने पोट न भरणे. आपण सम्यक वाचा, सम्यक कर्मे व सम्यक आजिविकेव्दारेच शीलाचे पालन करु शकतो. जे चुकून या मार्गाच्या विरुध्द मार्गाने जात आहेत त्यांनी या तिन्ही या तिन्ही अष्टांगिक मार्गानुसारच जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निराश न होता, आळस न करता, दुःखी न होता, चुकीच्या मार्गापासून परावृत्त होऊन नैतिकतेने जीवन जगले पाहिजे.

(६) सम्माव्यायामो (सम्यक व्यायाम) : – सम्यक व्यायाम म्हणजे योग्य प्रयत्न होय. मनाला योग्य अशी सवय लावणे. योग्य मार्गाने मनाला वळवणे. योग्य मार्गानेच मन गेले पाहिजे असा सतत प्रयत्न करणे म्हणजेच सम्यक व्यायाम होय. सर्व मानवी दुःखाचे मूळ हे मनच आहे. या मनातच विविध विकार, संस्कार, संवेदना घर करुन असतात. मनच शरीराला सगळीकडे धावायला लावते. मनाला सर्व सुखद संवेदनांची सवय जडलेली असते मनोवृत्तीतच दु:खाची बिजे अंकूरतात. म्हणूनच प्रयत्नपूर्वक मनाला योग्य दिशेनी वळवण्याचा सदैव प्रयत्न करित राहीले पाहिजे. यालाच सम्यक व्यायाम असे म्हणतात. ( व्यायाम म्हणजे दंड बैठका घेणे नव्हे ) सम्यक व्यायाम म्हणजे १ ) मनातील वाईट विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करणे २ ) चांगले विचार मनात आणणे ३ ) चांगले विचार येऊ देणे ४ ) वाईट विचार मनात न आणणे, ५ ) वाईट विचार मनात येऊ न देणे ६ ) चांगले विचार मनात सतत कायम ठेवणे जे चांगले गुण आहेत ते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणे. मनाला योग्य व चांगला विचार करण्यास शिकवणे, सवय लावणे, मनाला सदैव जागृतपणे नियंत्रित करणे, मन भटकल्यास परत योग्य ठिकाणी आणणे यालाच सम्यक व्यायाम म्हणतात. चित्ताची निर्मलता एकाग्रता टिकवून ठेवण्यास सम्यक व्यायाम अत्यंत आवश्यक आहेत.

(७) सम्मा सती (सम्यक स्मृती) : – सम्यक स्मृती म्हणजे मन सदैच जागरुक असणे होय. स्मृती म्हणजे सचेत असणे, जागृत व जागरुक असणे होय. कोणतेही योग्य काम करतांना त्याचे पूर्ण भान ठेऊनच कार्य करणे म्हणजे सम्यक स्मृती होय, सचेत राहून कर्म करणे म्हणजे सम्यक स्मृती होय योग्य काय अयोग्य काय याचा सारासार विचार करुन, योग्यतेच करणे. शरिरात जे घडत आहे, ज्या संवेदना उठत आहेत, श्वास येतो व जातो आहे. या प्रती जागरुक राहाणे, तटस्थपणे अनुभवने यालाच सम्यक स्मृती म्हणतात, चंचलपणाने लहरीपनाने, अविचाराने काहीही न करणे म्हणजे सम्यक स्मृती होय, अविचाराने, गोंधळून काम न करणे, जे करत आहोत त्या प्रती सजग, जागरुक असणे म्हणजे सम्यक स्मृती होय, मानसिक संतुलन ठेऊन, उत्साहित होऊन काम करणे, म्हणजे सम्यक स्मृती होय. मानसिक संतुलन ठेऊन, उत्साहित होऊन काम करणे म्हणजे सम्यक स्मृती होय. आंधळेपणाने काहीही न करणे म्हणजे सम्यक स्मृती होय . शरीर एका कामात व्यस्त व मन दुसरीकडे असे न करणे म्हणजे सम्यक स्मृती होय. ज्या स्थितीत आपण कार्य करत आहोत त्या स्थितीबद्दल जागरुक राहणे म्हणजेच सम्यक स्मृती होय. मन आळशी, छंदीस्ट न ठेवणे म्हणजे सम्यक स्मृती होय. मनावर सतत पहारा ठेऊन त्याला योग्य तिथे केंद्रीत करणे होय. आपण जागृत नसतो म्हणूनच मनात द्वेश, क्रोध, गर्व, लोभ यांना प्रवेश करता येतो.

(८) सम्मा समाधी (सम्यक समाधी):– जे काही कर्म करत आहोत ते एकाग्रचित होऊन करणे म्हणजेच सम्यक समाधी होय, समाधीचा अर्थ केवळ तप करणे, समाधी लावून बसणे नव्हे. समाधी म्हणजे उत्तम कर्मावर एकाग्रचित्त होणे होय, चित्ताला अकुशल बाबीकडे भटकू न देणे, योग्य बाबीवरच चित्त, मन केंद्रित करणे, एकाग्र होऊन काम करणे म्हणजे सम्यक समाधी होय. विशिष्ट कार्य करतांना मनाला विचलित न होऊ देणे म्हणजे सम्यक समाधी होय. भटकणे हा मनाचा गुणधर्म आहे. बालवयापासूनच आपण मनाला वाटेल तिकडे भटकू देतो. गंमत म्हणून मित्रांच्या संगतीने लहान वयातच लागलेल्या चुकीच्या सवयी विनाशाला कारणीभूत ठरतात. हेच भटकू देणे पुढे सवयच बनते. चांगल्या सुखद संवेदनांच्या मागे मन धावते, ते सुखद संवेदनाच्या मागे लागल्याने चंचल बनलेले असते. कारण आपणच त्याला योग्य वयात लगाम लावलेली नसते . मन मोकळे बनलेले असते. त्याला एका जागेवर आणणे, भटकू न देणे, मनाला न ‘ भटकण्याची सवय लावणे, स्थिर व एकाग्र होण्याची सवय लावणे, यालाच सम्यक समाधी म्हणतात, विद्यार्थी हातात पुस्तक घेऊन बसला, परंतु चित्त सिनेमात, मित्र मैत्रीणीवर खिळले असेल तर मन एकाग्र होणार नाही व एकाग्र झाले नाही, म्हणजेच अभ्यास होणार नाही व नापास व्हावे लागेल. दोरावरुन दूर चालणारी डोंबान्याची पोरं, तिचे सारे ध्यान त्या दोरावर केंद्रित झाले असते तिची एकाग्रता भंगली तर अपघात अटळ ! डॉ. ऑपरेशन करतांना त्याचे सारे लक्ष ऑपरेशवरच असते. यालाच सम्यक समाधी असे म्हणतात. डॉ. आंबेडकरांनी सारे लक्ष दलीत – शोषितांच्या मुक्तीवर केंद्रीत केले. सुख-दुःखाची मानअवमानाची पर्वा केली नाही. म्हणून ते यशस्वी झाले. हीच समाधी होय ज्याने मनाला एकाग्र केले, भटकू दिले नाही तो, त्याने घेतलेल्या कार्यात यशस्वी होतोच ! मन अस्थिर व भटकले असेल तर एकाग्र होणार नाही म्हणूनच एका वेळेस एकच कार्य हाताशी धरुन तेच पूर्ण करावे. एक ना धड अशी ढगभर कामे हाती घेऊ नयेत. हाती घेतलेल्या चांगल्या कार्यात बुडून जा, तल्लीन व्हा, एकरुप व्हा, एकाग्र व्हा, यालाच सम्यक समाधी असे म्हणतात, ड्रायव्हरची एकाग्रता भंगली की अपघात अटळ ! डॉक्टर ची एकाग्रता नाही झाली की रोगी दगावणारच ! बुध्द धम्मात मनाची एकाग्रता साधण्यास विपस्सना आणि आनापान सती हे समाधीचे मार्ग आहेत. सम्यक समाधीनेच बुध्दाला दिव्य ज्ञान प्राप्त झाले. सम्बोधी प्राप्त झाली. निब्बान प्राप्त झाले. यावरील विवेचना वरुन आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की, जीवनात दुःख आहेत. त्याला कारण आपली अविद्या, अज्ञान हो . अज्ञानातून आसक्ती, व्देषवृत्ती व क्रोध जन्म घेतात. या प्रवृत्ती नष्ट करणे म्हणजेच दुःख मुक्त होणे होय. या कुप्रवृत्ती लोभ, व्देष, हेवा, मत्सर, घृणा, तिरस्कार आसक्ती गर्व मनातून नष्ट झाल्याशिवाय जीवनात सुख नाही, म्हणूनच बुध्दाच्या धम्म मार्गाने चालले की दु:ख मुक्त होता येते, त्यासाठी बुध्दाची तत्व प्रणाली जीवनात रुजवणे आवश्यक आहे, मन शुध्द, निर्मळ, विकाररहीत असणे दु:ख मुक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. युध्दाने आपल्या धम्माच्या तत्वज्ञानात मनाच्या शुध्दतेला सर्वाधिक महत्व दिले आहे. मनच सर्व समस्यांची जननी आहे. मनच कुशल व अकाल कसनी खाण आहे. चांगले कर्म करा, सुखी व्हा ! हिच बुध्दाची शिकवण आहे. दुःख मुक्तीचा हाच मध्यम मार्ग होय!

संदर्भ: बुद्धाचा दुःख मुक्तीचा मार्ग
प्रा.पी.आर.वेल्हे

2 Replies to “आर्य अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करा आणि दुःख मुक्त व्हा!

  1. अत्युत्तम स्पष्टीकरण,
    सहर्ष साधुवाद !

Comments are closed.