बातम्या

जगातील सर्वात मोठा ऑनलाईन बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम; 8 देशातील बौद्ध भिक्खुंचा सहभाग

दरवर्षी बुद्धपौर्णिमा जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र जाणवत असल्याने भारतामध्ये डॉ.हर्षदीप कांबळे यांनी यावेळेची बुद्धपौर्णिमा ऑनलाईन पद्धतीने ५,६ आणि ७ मे ला साजरी करण्याचे ठरवलेलं आहे.

आपल्याला सर्वाना माहीतच आहे की नोव्हेंबर महिन्यात औरंगाबाद येथे जागतिक धम्म परिषद घेतली. त्या धम्मपरिषदेला १० देशातून बौद्ध भिक्खु आले होते. तसेच एक लाख उपासक हजर होते. ह्या वेळेस ऑनलाईन पद्धतीचा उपक्रम डॉ. हर्षदीप कांबळे यांनी हाती घेतला असून ५ ते ७ मे दरम्यान होणाऱ्या तीन दिवशीय कार्यक्रमाला सुद्धा ६ ते ७ देशाचे भिक्खुगण ऑनलाईन फेसबुक, यु ट्युबच्या माध्यमातून धम्मदेसना देणार आहेत.

तसेच या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. उद्या (०५ मे ) सकाळी ०७ वाजता, जगप्रसिद्ध पंडित विश्व मोहन भट ह्या श्रेष्ठ कलावंतांनी भीमांजली कार्यक्रमात बाबासाहेबांना दिलेली आदरांजलीचे प्रक्षेपण होणार आहेत.

८:३० वाजता आदरणीय विनयरखिता महाथेरो हे ध्यानसाधनेवर एक सत्र घेणार आहेत. यावर त्यांचा खूप अभ्यास आहे. त्यानंतर लोकूत्तरा भिक्खु ट्रेनींग सेंटरचे प्रमुख आदरणीय भदंत बोधिपालो महाथेरो हे तथागत बुद्धांच्या जीवनावर माहिती देणार आहेत. त्यानंतर सुरेख असं महानाट्य सादर होणार आहे. दुपारच्या सत्रात वेगवेगळ्या डॉक्युमेंट्री दाखवण्यात येणार आहेत. सायंकाळी सारनाथ येथील प्रसिद्ध भिक्खु आदरणीय चंदीमा भंते यांची सुंदर धम्मदेसना ऐकण्यास मिळणार आहे. रात्री ८ वाजता तरुण मुलांचा ‘बौध्दकारो’ ग्रुप अतिशय सुंदर चालीरीती मध्ये लाईव्ह बॅण्ड घेऊन येणार आहेत.

त्यासोबतच पुढील दोन दिवसात (६ ते ७ मे) जगभरातील नामवंत भिक्खूंची धम्मदेसना होणार आहे. बुधवारी सहा तारखेला मलेशियाचे महिंदा भिक्खु ऑस्ट्रेलियावरून लाईव्ह असणार आहेत. ते ध्यानसाधनेत मास्टर असून आपल्याशी धम्मदेसना आणि ध्यानसाधनेवर बोलणार आहेत. त्यांचे दुपारी सुद्धा धम्मदेसना ऑस्ट्रेलियावरून लाईव्ह प्रसारण होणार आहे. त्यानंतर श्रीलंकेचे भन्ते डॉ पीयरताना ह्यांची धम्मदेसना ४ वाजता होणार आहे. सायंकाळी बंगलोर महाबोधी सोसायटीचे आनंद भन्ते यांची धम्मदेसना आहे.

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी (०७) तारखेला भदंत सदानंद महास्थवीर, भन्ते अजहन जयसारो (थायलंड), भन्ते डॉ खम्माई धम्मासामी (म्यानमार), भन्ते डॉ. अनिल शाक्य (थायलंड), भन्ते संघसेना (लडाख) आपल्याला धम्मदेसना देणार असून ह्यासोबातच वेगवेगळ्या देशांचे भिक्खुनी दिलेले संदेश सुद्धा वाचून दाखवले जाणार आहेत.

महत्वाचे म्हणजे सात (०७) तारखेला सकाळी आणि संध्याकाळी बोधगया वरून बुद्ध वंदना लाईव्ह दाखवणार आहेत. तसेच लुम्बिनीवरून सुद्धा लाईव्ह दाखवणार आहोत. असा तीन दिवसाचा भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. आपण लॉकडाऊन काळात सर्वजण घरीच बसलेलो आहोत. त्यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून या कार्यक्रमाच्या माध्यमातून तथागताचे बुद्धाचे चांगले विचार, करुणेचे विचार, प्रेमाचे विचार, दुःख मुक्तीचे मार्ग असलेले विचार आपल्या कानावर पडावे म्हणून हा जगातील सर्वात मोठा ऑनलाईन बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम डॉ.हर्षदीप कांबळे सर करत आहेत.

हे सर्व कार्यक्रम फेसबुक. यु ट्यूब, आवाज इंडिया टीव्ही, धम्मचक्र वेबसाईटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. घरूनच आपण ह्या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा तसेच बुद्ध पौर्णिमेचा निमित्ताने गरजुंना अन्नदान करावे व कुशल कम्मात सहभागी व्हावे अशी विंनंती डॉ.हर्षदीप कांबळे सर यांनी केली आहे.