श्रीलंकेत नवीन अध्यक्ष म्हणून गोटबाया राजपक्षे हे बहुमताने नुकतेच निवडून आले. त्यांचे वडीलबंधु महिंद राजपक्षे २००५ मध्ये अध्यक्ष असताना ते संरक्षण खात्याचे सचिव होते. त्यांच्या निवडीमुळे सर्व बौद्ध सिंहली नागरिकांना आनंद झाला आहे. कारण श्रीलंकेत छुप्यामार्गाने दहशतवाद पसरविणाऱ्यास चांगला धडा शिकविणारा कुणीतरी प्रमुख पाहिजे असे साऱ्यांना वाटत होते.
भारत जसा आजही पाकिस्तानी दहशतवादाचा सामना करीत आहे तशीच अवस्था श्रीलंकेमध्ये १० वर्षांपूर्वी होती. कारण ८०च्या दशकापासून तामिळ वाघ संघटनेने श्रीलंकेत अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यांनी अनेक बॉम्बस्फोट घडवून श्रीलंकन मंत्रीमंडळातील मंत्र्यांचा, निरपराध नागरिकांचा बळी घेतला होता. दक्षिण भारतातील अनेकांच्या पार्ठिंब्यामुळे तामिळी वाघ संघटनेचा प्रमुख प्रभाकरन फारच उंडारला होता. त्याला तामिळनाडूमधून कडव्या तामिळीकडून पूर्ण मदत मिळत होती.
भारताने शांतीसेना पाठविली म्हणून राजीव गांधी यांची सुद्धा प्रभाकरने आत्मघातकी स्फोटाद्वारे हत्या केली. शेवटी त्यावेळचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी २००७ मध्ये त्याच्या विरुद्ध मोठी कारवाई करण्याचे ठरविले. आणि प्रमुख दहशतवादी प्रभाकरन यालाच लष्करी कारवाई करून ठार मारले आणि त्याच्या तामिळ वाघ संघटनेचा खातमा केला.
तेव्हापासून श्रीलंका शांत झाला असून पर्यटन व्यवसाय तेथे परत बहरला आहे. मध्यंतरी कडव्या तामिळी लोकांनी प्रभाकरन व त्याच्या मुलाला श्रीलंकन सैन्याने हाल करून कसे ठार मारले याची अतिरंजित कहाणी जागतिक मानव अधिकार आयोगापुढे मांडली. पण श्रीलंका ठाम राहिली. त्यांनी ठणकावून सांगितले की दहशतवादास या देशात थारा नाही. हा बौद्ध परंपरेचा देश आहे.
आता महिंदा राजपक्षे यांचे धाकटे बंधू अध्यक्ष होत असल्याने जाफन्यातील तामीळ समाजात चिंतेचे वातावरण आहे. पण ही त्यांची चिंता अनाठायी आहे. श्रीलंकेत सलोख्याने व प्रेमाने राहण्यास कोणाचीच हरकत नाही. परंतु बळेच कुरापत काढून सिंहली बौद्ध जनतेस त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ती कशी स्वस्थ बसेल? बुद्धाने जरी युद्ध नको सांगितले असले तरी खाटीका समोर मान झुकून बसण्यास ही सांगितलेले नाही. जगायचे असेल तर शांततेची बीजे रुजवावी लागतात आणि दहशतवादी तृण उपटून फेकावेच लागते. म्हणूनच हे काम करणारा योग्य माणूस निवडून आलेला आहे. आणि त्यांचे भारताने अभिनंदन केले असून त्यांना २९ नोव्हेंबर रोजी भारतात येण्याचे आमंत्रण दिले आहे. थेरवादी बौद्ध परंपरेचा निसर्गरम्य देश अशी ओळख असलेल्या श्रीलंकेत कायमस्वरूपी शांतता नांदेल आणि पर्यटन व्यवसाय बहरलेला राहील अशी आता आशा करूया.
-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)