इतिहास

१९५७ साली प्रेमाचा संदेश देणारा चित्रपट ‘गौतम द बुद्धा’ नेहरूंच्या प्रोत्साहनाने भारतीयांसमोर आला

तथागत बुद्धांचा २५०० वा जयंतीसोहळा भारत सरकारने मोठ्या उत्साहाने साजरा केला. ‘गौतम द बुद्धा’ या चित्रपटाच्या माध्यमातून बुद्धाचे कलात्मक सादरीकरण समस्त भारतीयांना घडविले. ‘गौतम द बुद्धा’ या चित्रपटावर ओझरते दर्शन…

नागपूरच्या ऐतिहासिक १४ ऑक्टोबर १९५६ च्या धम्मदीक्षाविधीनंतर अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत महाकारुणिक बुद्धाच्या जीवन दर्शनावर आधारित कलात्मक ‘गौतम द बुद्धा’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात पाच लाख अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे बुद्धाच्या जीवनाविषयी व शिकवणुकीविषयी उत्सुकता अगोदरच जागृत झाली होती. ‘गौतम बुद्धा’ या चित्रपटाचे निर्माते बिमल रॉय व दिग्दर्शक राजहंस खन्ना यांच्या मनभावन कल्पकतेतून साकार झाला असून हा माहितीपट इंग्रजी भाषेत आहे. भारत सरकार आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या प्रेरणेने, प्रोत्साहनाने भारतीयांसमोर आला.

या चित्रपटात बुद्धाचा जीवनपट निकटवर्ती महाप्रजापती गोतमी, पहिला शिष्य कौंडिण्य, यशोधरा उर्फ भद्रा कात्यायना व परम शिष्य आनंद यांच्या सुसंवादातून उलगडला आहे. त्यावर भाष्य लिहिताना राजहंस खन्ना यांनी बुद्धांचे स्वतःचे शब्द तंतोतंत वापरल्यामुळे आपण जणू बुद्धांच्या चरणासमोर बसून अमृतवाणीची प्रत्यक्ष अनुभूती घेत असल्याचा साधकाला आभास निर्माण होतो. ‘गौतम द बुद्धा’ या चित्रपटातील अनेक प्रसंग हृदयाला स्पर्श करणारे आहेत.

मानव समाजाला कर्मयोगाचा पाठ देऊन दैवावर विसंबून न राहण्याची शिकवण देताना बुद्ध म्हणतात,’ कित्येक लोक इंद्र, वरुण आणि प्रजापती यांची सारखी आराधना करीत असतात. एखाद्याला जर नदी पार जावयाचे असेल, आणि जर तो एका किनाऱ्यावर उभा राहून दुसऱ्या किनाऱ्याची प्रार्थना करीत राहिला तर तो दुसरा किनारा त्याच्याजवळ येईल, असे तुम्हाला वाटते का? किंवा हातपाय गुंडाळून त्याने स्वस्थ झोप घेतली तर त्याचे काम होईल का? नाही. कदापिही नाही. ‘हा शास्त्रीय विचार करण्याचा तथागताचा आदेश पहा, ‘एखादी गोष्ट कोणी अधिकार वाणीने सांगितली म्हणून तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका किंवा एखादी गोष्ट रुढीजन्य आहे म्हणून करू नका किंवा एखादे विधान पुस्तकात आहे, म्हणून सत्य मानू नका किंवा ते शिक्षकांनी शिकविले म्हणून स्वीकारू नका.

कुठलीही गोष्ट तुमच्या अनुभवाच्या आणि बुद्धीच्या निकषावर पारखून घ्या. कारण बुद्धजन फक्त मार्ग दाखवितात. पण त्याकरिता प्रत्येकाने स्वतःच झिजले पाहिजे. चमत्कार, जादू वगैरेकडे अंगुलिनिर्देश करताना तथागत म्हणतात, ‘मला चमत्कार आणि जादू व तथाकथित अद्भुत गोष्टीत धोका दिसतो. मी त्यांचा तिरस्कार करतो. द्वेष करतो. मला त्याबद्दल लाज वाटते. मनुष्याचे स्वतःचे निश्चय, खडतर प्रयत्न, भव्य शिखरे पादाक्रांत करण्याची दुर्दम्य इच्छा त्याच खऱ्या असाधारण आहेत.

‘माणसा – माणसात भेद नाही. मानव एक आहेत. जातीभेद कोठे आहे? याचा खुलासा करताना बुद्ध वशिष्ट नावाच्या ब्राह्मणास म्हणतात. वशिष्ट तुला अनुक्रमे यथार्थ सांगतो, ‘वनामध्ये वृक्षांचे निराळे प्रकार असतात. मी समजू शकतो. पक्षी आणि प्राणी, मासे आणि साप यांच्यात भेद आहेत हेही मी समजू शकतो. पण माणसा माणसामध्ये भेद करणाऱ्या कुठल्या गोष्टी तुम्ही पाहता? त्यांना सारखेच केस, सारखेच डोळे, सारखेच नाक, सारखेच हात, सारखेच हृदय आणि सारखाच मेंदू आहे. नाही! वशिष्ट! मनुष्याच्या अवयवावरून त्यांच्यात मी भेद करू शकत नाही. त्यांच्या कृतीवरून त्यांच्यात भेद होऊ शकतो.”

नागार्जुन कोंडा, मथुरा, महाबलीपुरम, कांचीपुरम, अजंठा, एलोरा इत्यादी दूरदूरच्या ठिकाणांना भेटी देऊन त्यांनी उपलब्ध असलेली माहिती श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया, कंबोडिया, थायलंड, चीन, जपान, मंगोलिया, व्हिएतनाम, तिबेट व इतर देशातून मिळविलेल्या साधनसामुग्रीतून एक प्रभावी बुद्धकथा साकारली. कृष्णधवल मनमोहक चित्रे, नैसर्गिक वातावरणात या चित्रपटाचे शूटिंग झाले. सोबतच प्राचीन अजिंठ्याच्या गुंफांना सजीव करून प्राण ओतला आहे.

गौतम बुद्धांचा जीवनपट मानवी जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून सुखशांती , समाधान देणारा आहे. चित्रपट निर्मात्यांनी अथक परिश्रम व बुद्ध जीवनावरील माहिती संकलित करून त्याचे हृदयस्पर्शी प्रकटीकरण केले आहे. या चित्रपटाचा पहिला प्रीमियर शो १९५७ साली कान्स फिल्म समारोहात झाला. भारतात राष्ट्रपतीचे सुवर्णपदक पटकावले. भारताच्या उज्ज्वल संस्कृतीचा वारसा लाभलेल्या बुद्ध तत्त्वज्ञानावर प्रगाढ विश्वास असलेल्या अनुयायांनी हा चित्रपट एकदा तरी बघावाच.

मिलिंद मानकर, नागपूर