बातम्या

”जात का काढता, गुन्हा हा गुन्हाच असतो” असले भंपक युक्तिवाद करणाऱ्यांनी हा ग्राऊंड रिपोर्ट वाचावा

जाती कशाला उकरून काढता, गुन्हा हा गुन्हाच असतो आणि गुन्हेगार कोणत्याही जातीचा असला तरी गुन्हेगारच… असले भंपक युक्तिवाद करणाऱ्या, वरून सात्विकतेचं भजन आणि आतून जातवर्चस्वाचा दांभिक तमाशा करणाऱ्या प्रचारकांनी हा निव्वळ ग्राऊंड रिपोर्ट वाचावा!
आणि हो, पत्रकारिता कशी असते ते कथित स्टार पत्रकारांनीही समजून घ्यावे

(ग्राऊंड रिपोर्ट)
सफदरगंज हॉस्पिटल ते हाथरस…
पुनम कौशल

उच्चवर्णीय पुरुषी मानसिकतेमुळे दलित स्त्रीच्या शरीराचे लचके तोडण्याची वृत्ती कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे ढळढळीत वास्तव हाथरस येथील घटनेमुळे पुन्हा ठळकपणे सामोरे आले आहे. जातीच्या विखारातून कोवळ्या कळ्यांना चुरगळणारा वर्चस्ववाद या कुसंस्कृतीच्या कणाकणात भिनला आहे. पीडितेचा जबाब दाबण्याचा प्रकारही तसा जुनाच. जातीनिहाय आरोपींना मिळणारे संरक्षण तर परंपरेने चालत आले आहे. अत्याचार झालाच नाही, असा भ्रम पसरवण्यासाठी प्रशासनाला वापरणे, पोलिसांनी परस्पर पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करुन पुरावे संपवणे, पीडितेच्या कुटुंबाला नजरकैदेत ठेवणे आणि माध्यमांना त्यांच्यापर्यंत पोहचू न देणे आदी गोष्टी सरकारची नियत सिद्ध करतात. या सगळ्या घटनांचा ‘आँखो देखा हाल’ भास्कर समूहाच्या ‘दिव्य मराठी’ची पत्रकार पुनम कौशल यांनी थेट पीडितेच्या गावी जाऊन टिपला…
————–
मंगळवार, २९ सप्टेंबर २०२०…
“सामूहिक बलात्कार झालेल्या एका मुलीला दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये भरती केलयं” ही घटना कळल्या कळल्या मी तातडीने ऑफिसमधून बाहेर पडली आणि थेट हॉस्पिटल गाठलं… हॉस्पिटलच्या एका नव्या इमारतीच्या आजूबाजुला खूपच गर्दी होती, पण सगळी गर्दी ही पोलिस आणि हॉस्पिटलच्या प्रशासनाची होती. मुलीची अवस्था खूप गंभीर आहे, हे तिथं गेल्यावर लक्षात आलं… सगळचं वातावरण गंभीर होतं. मी पोलिसांना इतक्या गंभीर अवस्थेत पहिल्यांदाच बघितलं होतं. सुरुवातीला मी हॉस्पिटलच्या काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतू प्रत्येकजण टाळत होते. स्वत: तेच घाबरलेले दिसत होते. निदान मुलगी कोणत्या गावची आहे हे मला माहित करून घ्यायचं होतं परतंू पदरी निराशा येत होती. तिथून काही माहिती मिळेल ही अपेक्षाच मी सोडून दिली. हळूहळू अनेक माध्यमांचे प्रतिनिधी गोळा होऊ लाागले. पोलिस आम्हाला तिथं थांबूच देत नव्हते. काहीतरी विचित्र गोंधळ सुरु आहे, याचा अंदाज येत होता. मग मुलीचे नातेवाईक कुठे दिसतात का याचा शोध सुरू केला. शेवटी मला एका कोपऱ्यात माझी नजर एका ५५-६० वर्षाच्या वृद्धावर पडली. डोक्यावर हात ठेवून शून्यात बघणाऱ्या या माणसाच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. माझी शंका खरी ठरली. ते मुलीचे वडीलच होते. मुलगी बरी होईल या भरवशावर अजूनही ते होते.

१४ सप्टेंबर रोजी उत्तरप्रदेशाच्या हाथरस जिल्ह्यांत सामुहिक बलात्काराची शिकार झालेली त्यांची मुलगी दिल्लीच्या या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होती. जीभच कापल्याने तिला बोलताही येत नव्हतं. पाठीचा मणका मोडला होता, शरीरावर गंभीर जखमा होत्या, योनीमधून सतत रक्तस्त्राव होत होता. तिचा लहान भाऊ तिची काळजी घेत होता तर मुलीचे वडील भिंतीला टेकून उदास रडत बसले होते. मला त्यांच्याशी काहीतरी बोलता येईल असा विचार करत होते पण ते जराही भानावर नव्हते. मला जाणवलं की ते खूप मोठ्या धक्क्यात आहेत. मला काहीच कळेना… मी त्यांच्या जवळ जाऊन बसले. पत्रकार असले तरी अशा अवस्थेत आपली मुलगी असताना त्या बापाशी काय बोलायचं हेच मला कळतं नव्हत. माझं मन मी घट्ट केलं आणि काहीतरी बोलायचा प्रयत्न केला. तोपर्यंत मुलीचे नाव मला समजलं होतं. मी बोलायचं म्हणून तिचे नाव उच्चारलं तर ते जोरजोरात रडू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता पण त्यांच्या डोळ्यातल्या दु:खाचा अंदाजही कोणी लावू शकला नसता. ते खूप घाबरले आहेत, असंच जाणवतं होतं. त्यांच्याजवळ मी तशीच बसून होते. गर्दीतल्या लोकांना अजून अंदाज आला नव्हता की मुलीचा बाप असा कोपऱ्यात बसून रडतोय.

काही वेळात वडील बोलू लागले,”ये गाँव के ठाकूर हे, इन्होने मेरी बेटी के साथ दरिंदगी करने से पहले हमे कई बार डराया-धमकाया है, हम हमेशा बर्दाश्त करते थे और सोचते की चलो जाने दो. अब इन्होंने हमारी बेटी के साथ ऐसा अत्याचार किया है’. बोलता बोलता ते अचानक गप्प झाले, भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तोपर्यंत काही दलित संघटनेचे कार्यकर्ते त्यांच्याजवळ आले आणि आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, तुमच्या कुटुंबियांना काही होणार नाही, असा विश्वास देत होते. तोपर्यंत तिथे मुलीचा भाऊ रडत आला. दिवसभर हॉस्पिटलच्या फॉर्म्यालिटी पूर्ण करता करता तो पुरता वैतागलेला होता. रडतच तो बोलायला लागला की, मी १२ दिवसांपासून घरीच गेलेलो नाहीये. बहिणीची अवस्था बघवत नव्हती, तिला बोलता येत नव्हते. ती डोळ्यांनी इशारे करत होती. त्यामुळे तिला सोडून एक क्षणही मी बाजूला झालो नाही. इतक्या लहान वयात तिला हे का सहन करावं लागलं, तिचा इतकाच दोष होता ती एका दलितांच्या घरी जन्माला आली… १३ दिवस अलिगढ मुस्लिम यूनिव्हर्सिटीच्या मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते,त्यांनतर सोमवारी तिला दिल्ली सफदरजंगमध्ये आणण्यात आलयं. ती नेमकी किती गंभीर आहे, तिला काय काय दुखापत झालीय हे आम्हाला कोणीच सांगितले नाही.

कुटुंबीयांशी माझी भेट झाल्यानंतर अवघ्या चार-पाच तासातंच मुलीची मृत्युशी झुंज संपली होती.
……………………
या घटनेचा पिच्छा केल्याशिवाय माझी अस्वस्थता जाणार नव्हती. दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये पोलिस आणि प्रशासन यांची प्रत्येक हालचाल मला संशयास्पद वाटत होती. माध्यमांपर्यंत या घटनेचे डिटेल्स जाऊ नयेत याची तिथला प्रत्येकजण काळजी घेत होता. आणि मग माझा प्रवास सुरू झाला…

बुधवार, ३० सप्टेंबर २०२०

दिल्ली ते हाथरस… प्रवासा दरम्यान पिडीतेच्या भावाने हॉस्पिटलमध्ये सांगितलेली घटना माझ्या डोळ्यासमोरून हलत नव्हती.
आई गवत कापत होती, आईने दिदीला सांगितलं की, गवताची मोळी बांध. दिदी मोळी बांधू लागली. आई गवत कापण्यासाठी आणखी दूर गेली. मात्र जेव्हा दिदी आईच्या नजरेआड झाली तेव्हा आई तिला शोधू लागली. जवळपास तासभर आईने दिदीला शोधण्याचा प्रयत्न केला. घरी तर परत गेली नसेल ना या चिंतेत आईने सबंध शेताला तीन फेऱ्या मारल्या आणि शेवटी बाजरीच्या शेताजवळच्या बंधाऱ्यावर दिदी दिसली… शरीरावर एकही कपडा नाही…गळ्याभोवती ओढणी घट्ट आवळण्यात आलेली… जीभ कापलेली आणि मणक्याची हाडं तुटलेल्या अवस्थेत… जेव्हा तिला तिथून बाहेर काढलं तेव्हा ती पूर्णपणे बेशुद्ध झाली नव्हती. त्यावेळी तीने एकाचंच नाव घेतलं होतं. थोड्याच वेळात ती बेशुद्ध पडली. चार दिवसानंतर जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिने सगळा घटनाक्रम सांगून चार जणांनी बलात्कार केल्याचे सांगितले. घटनास्थळावरून अगोदर दिदीला चंदपा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पूर्ण रस्त्यात ती रक्ताची उलटी करत होती. तिची जीभ निळी पडत जात होती. “”माझा गळा आवळण्यात आला आहे त्यामुळे मला बोलता येत नाही” असे म्हणून ती बेशुद्ध झाली.
………………….
हाथरसच्या बूलगढी गावच्या वेशीवर पोहचले. हॉस्पिटलमध्येच ज्याप्रकारे पोलिसांचे वर्तन होते ते पाहता सहजासहजी मला गावात शिरू देणार नव्हतेच. म्हणूनच मी गावातल्या मुलींसारखा पेहराव केला होता. गावच्या वेशीपासून मी पायीच गावच्या दिशेने निघाले. पोलिसांचा प्रचंड फौजफाटा आजूबाजूला दिसत होता.

“”कहाँ जा रही हो? यहां अंदर जाना अलाऊड नही है” पोलिस तावातावाने बोलायला लागल्यावर “” इसी गाँ‌ की लडकी हूँ, अपने घर जा रही हूँ” असं अगोदरच ठरवलेलं उत्तर देऊन मी पहिला अडथळा पार केला. वाटेत असे अनेक अडथळे होते. काही अंतरावर पोलिसांचा मोठ्या गटाने मला अडवले आणि माझं उत्तर एकून पुरावा मागितला. मी त्यांना पुन्हा पटवून दिले की, मी पाहुण्यांकडे गेले होते आणि आता गावी परत येताना पुरावे कसे सोबत ठेवणार? त्यांना पटवून देईपर्यंत माझी दमछाक उडाली. पोलिस प्रशासनाला या गावात कुणाला का येऊ द्यायचं नाहीये हाच विचार करण्यासारखा प्रश्न होता. कशीबशी मी गावात पोहोचले तर गावातलं वातावरण अगदी भयंकर होते. इतका पोलिस बंदोबस्त मी आजवर पाहिला नसेल. मुलीच्या घराभोवती तर पोलिसांनी घेराव घातलेला होता. अशा परिस्थितीत त्या कुटुंबापर्यंत पोहोचणे अशक्य होते. कोणत्याही माध्यमातल्या प्रतिनिधींना मुलीच्या कुटुंबीयांना भेटू दिले जात नव्हते की त्या कुटुंबीयांना माध्यमांशी बोलायची परवानगी दिली जात नव्हती.
बराच प्रयत्न करून दोन दिवसानतंर पिडित मुलीच्या वहिनींशी मी संपर्क साधला… आणि वहिनीने सांगितलेली दुर्दैवी घटना अशी होती…

“”आप कैसे परिवार वाले हो? बेटीपर रेप हुआ है यह साबित करने पर तुले हो, कोरोना से मर जाती तो क्या करते”? एक पोलिस अफसर हम से कह रहा था. आमच्या आईने स्वत:च्या डोळ्यांनी तिची अवस्था पाहिली आहे. अंगावर कपडे नव्हते, शरीराच्या अनेक भागातून रक्त वाहत होतं. आमच्या जीवाची काय किंमत नाही काय? एखाद्या कुटुंबातल्या मुलीवर बलात्कार झालायं असं बोलणं ही काय साधी गोष्ट असेल काय? गेल्या तीनचार दिवसांपासून आमच्या घराला छावणीचं स्वरूप आलायं. वेळ काळ काहीच बघत नाहीत आणि धडाधड पोलिस घरात घुसतात. एक दोन नाही तर एकावेळी पंधरा वीस पोलिस धाड टाकतात. आम्ही तीन दिवसांपासून दार उघडलं नाहीये. आमच्याकडे बाहेर जाऊन पाणी भरावं लागतयं, शौचालयही बाहेर आहे. मला लहान मुली आहेत, आमच्या घरी आणखी काही महिला आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून आम्ही शौचालयालाही गेलो नाहीये. इतका पोलिस बंदोबस्त असताना बाहेर तर कसं पडणार? पोलिस येतात कधी माझ्या सासऱ्यांना घेऊन जातात तर कधी आमच्या दिरांना… पोलिस घेऊन गेले तर काय करतील या भितीने पोटात गोळा येतो.

त्यातच आता या गावात राहता येईल की नाही अशी अवस्था आहे, किंवा यानंतर आम्ही जिवंत राहू की नाही असचं वाटू लागलयं. बऱ्याच जणांनी आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत, टीव्हीवर बातम्या आल्या तर पोलिस धमकावतात की तुम्ही मीडियाला काय सांगितले?

खरं तर आमच्या मुलीचा जीव गेलायं, पण हे आजूबाजूचे वातावरण बघून असं वाटतयं की आम्हीच कुणाचा तरी जीव घेतलायं.आमच्याकडे कोणतेही हॉस्पिटलचे रिपोर्ट नाहीत, अनेकांचे म्हणणे होते की, आम्हाला लिहिता वाचता येणार नाही रिपोर्ट काय कळणार? आमच्याकडे काहीच नाहीये की आमच्या मुलीला काय झालं होतं? बेवारससारखं आमच्या मुलीला जाळून टाकलं, आम्हाला शेवटचं दर्शनही करू दिलं नाही. सगळं काही विचित्र सुरू आहे.एकतर आम्हाला या देशात न्याय मिळेल किंवा आमचा जीव घेऊन आम्हाला संपवलं जाईल… इतकचं इथं होऊ शकतं.

गुरुवार १ ऑक्टोबर २०२०

“”इथली लोकं एकवेळ मरणाला सामोरे जातील परंतू “बिरादरी’च्या बाहेरच्या लोकांमध्ये उठबस कदापि शक्य नाही…” बूलगढी गावातला एक तरूण मला “ग्यान’ देत होता. जातीने तो जरी ठाकूर असला तरी गावात घडलेल्या घटनेमुळे तो व्यथित झाल्याचे मला कळत होते. त्या दलित मुलीसोबत खुपच वाईट झालं,असं ते अनेकवेळा म्हणाला. दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात जेव्हा मी पिडीत तरुणीच्या वडिलांशी आणि भावाशी बोलले तेव्हा प्रत्येकवेळी ते जातीचा उल्लेख करत होते. शहरात वाढलेली मी त्यावेळी सतत मनाशी हेच विचारत होते की, अजूनही माझ्या या दुनियेत इतका जातीवााद ठासून भरलेला आहे…? गावात पोहचल्या पोहचल्या या प्रश्नाचे उत्तर मिळवायला मला फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. ज्या आरोपींना या प्रकरणात अटक झाली आहे त्यांचे कुटुंब मात्र अद्याप त्यांचा “तथाकथित’ उच्च जातीचा रुबाब सोडायला तयार नव्हते. “”आम्ही “त्यांच्या’सोबत उठणं-बसणंही टाळतो आमची मुलं काय त्या पोरींना शिवणार…?”

ठाकूर आणि ब्राम्हण जातींचा वर्चस्व असलेल्या या गावात दलितांची जरी मोजकीच घरे असली तरी गावाच्या बाहेर नसून गावातच आहेत. मात्र असे असूनही या दलितांच्या घरांची दुनियाच वेगळी आहे. जातीयवादाची कीड मात्र सबंध गावाला लागली आहे. साध्यासाध्या बोलण्यात ते जातीचा उल्लेख करतात. सवर्ण जातीचे गावकरी दलितांना मात्र सज्जन मानतात आणि त्याचे कारण सांगताना गावातली एक ठाकूर महिला म्हणते,””वयस्कर ठाकूर वाटेत दिसले की दलित कुटुंबातील मंडळी लगेच सायकलवरून उतरतात आणि पायी चालायला सुरूवात करतात. ठाकूरांना असं वाटू नये की बघा, ही लोकं आता आमची बरोबरी करू लागले.”

गावात जातीयता इतकी भीषण आहे की घटना घडून आज इतके दिवस झाले तरी गावातील ठाकूर आणि ब्राम्हण शेजारीच राहणाऱ्या पिडीत कुटुंबाचे सांत्वन करायला गेलेले नाहीत. घटनेचा निषेध करणे तर फारच लांबची गोष्ट राहिली. पिडीत तरुणीचा भाऊ म्हणतो, “”किसी ने हाल तक तो पूछा नहीं, साथ की बात दूर की है। यहां हमसे ही कौन बात करता है?’’
पिडीत तरुणीबद्दल गावातलं मत चांगल असल्याचं जाणवलं. ती एक अतिशय साधी पोरगी होती. घरातून बाहेर फारशी पडत नव्हती. कधीकधी आईसोबत गवत कापण्यासाठी आणि चारा आणण्यासाठी शेतावर कामाला जायची. तेव्हारी ती कुणाशी बोलत नसे. शाळा-कॉलेजात तर कधी गेलीच नाही त्यामुळे बाहेरच्या दुनियादारीची समज तिच्यात जराही नव्हती. मात्र तिच्या मृत्यूनंतर आता इथल्या दलित कुटुंबाच्या मुलींमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. त्यातील एकीशी बोलण्याचा मी प्रयत्न केला, तर अतिशय घाबरलेल्या स्वरात ती म्हणाली,””‘इतनी अच्छी दीदी के साथ इतना बुरा हुआ। अब कौन लड़की खेत की ओर जाने की हिम्मत करेगी। लेकिन जाना तो है ही। ढोर भूखे तो मरेंगे नहीं।’

गावामध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींचा वावर वाढला आहे आणि नेेमकी याचीच भिती पिडीत कुटुंबाला गावातली मंडळी घालत आहेत. एकदा का हे कॅमेरे इथून निघून गेले की तुमचा त्रास अधिकच वाढेल अशी सतत धमकी या कुटुंबाला दिली जातेय. इथल्या एकाही दलित कुटुंबाकडे स्वत:ची जमीन नाही, त्यामुळे पोटापाण्यासाठी त्यांना सवर्णांच्या शेतात काम करावं लागतं.

आरोपींचे घर आणि पिडीत कुटुंबाचे घर यात फारसे अंतर नाहीये. आपल्या मुलांचा बचाव करताना आरोपीचे कुटुंब सारे खापर पिडीत कुटुंबावर फोडतेय. “”इन छोटी जाति के लोगों से हमारे परिवार का कोई संबंध नहीं था। पुरानी रंजिश में हमारे बेटों को फंसाया गया है।

ज्या “पुरानी रंजिश’चा उल्लेख ही लोकं करत होती ती घटना म्हणजे, मुख्य आरोपी संदीपच्या वडिलांनी २० वर्षांपूर्वी पिडीत तरुणीच्या आत्येचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पिडीतेच्या आजोबांनी त्याला तीव्र विरोध केला म्हणून संदीपच्या वडिलांनी आजोबांच्या हातांची बोट कापली होती. त्या जुन्या घटनेचा बदला आता ही लोकं घेत असल्याचा आरोपीच्या कुटुंबाचा दावा आहे.

प्रतिमा जोशी यांच्या फेसबुक वॉलवरून