जगभरातील बुद्ध धम्म

ठिकऱ्या उडालेल्या बुद्ध शिल्पाची केली जुळवाजुळव

तालिबान या अतिरेकी संघटनेने २००१ मध्ये काबूल म्युझियम मधील गांधार शैलीचे मोठे बुद्ध शिल्प उध्वस्त केले होते. त्यामुळे ठिकऱ्या उडालेल्या या शिल्पाचे ७५० तुकडे गोळा करून म्युझियम मधील तळघरात ठेवले होते. शिकागो विद्यापीठ संशोधकांनी ते तुकडे पुन्हा जोडण्याचे ठरविले. या कामासाठी काबूल येथील अमेरिकन राजदूत यांनी निधी उपलब्ध करून दिला.

त्यानुसार कोडे सोडविल्या प्रमाणे शिल्पाचा जुना फोटो पाहून तुकडे जुळविण्यात आले. काबूल संग्रहालयात अफगाणिस्तान मधील ‘हड्डा’ या पुरातन बौद्ध स्थळावर अनेक शिल्पे होती. बुद्धअस्थि असलेले हे ठिकाण १९८० साली अतिरेक्यांनी उध्वस्त केल्याने तेथील बौद्ध संस्कृतीचा प्राचीन ठेवा काबूल म्युझियम मध्ये आणण्यात आला होता. म्युझियमचे संचालक मोहम्मद फाहिम रहीमी यांनी सांगितले की पुरातन बौद्ध शिल्पे हा आमचा राष्ट्रीय ठेवा आहे. बौद्ध संस्कृती हा आमचा इतिहास आहे. आणि तो गमावणे म्हणजे सर्व शून्य आहे.

प्रोफेसर जिल स्टेल म्हणाले की भारत-चीन-ग्रीक व पार्शियन देशांना जोडणाऱ्या सिल्क रूट वरील अनेक गांधार शिल्पांचा साठा गोळा करून येथे आता सुरक्षित ठेवण्यात आला आहे. प्रस्तुत बुद्ध शिल्प हे सहाव्या शतकातील असावे असा कयास आहे. या शिल्पांमध्ये दाखविलेला बुद्धांचा पेहराव हा गांधार शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

सन २०१२ पासून अफगाण राष्ट्रीय संग्रहालय हे उध्वस्त झालेल्या जुन्या शिल्पांचे अवशेष गोळा करून त्यांना पुन्हा मूळ रूपात आणीत आहे. या कामी अनेक राष्ट्रे मदतीचा हात पुढे करीत आहेत. अनेक बुद्ध अभ्यासक मार्गदर्शन करीत आहेत. म्हणूनच आता अफगाणिस्तानात बुद्ध पुन्हा उठून उभा रहात आहे. बहरत आहे.

संजय सावंत,नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)
Photo : news.uchicago.edu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *