इतिहास

त्रिरत्न चिन्हाचे महत्व; बुद्ध, धम्म व संघ यांची ही प्रतीके आता जगभर माहिती झाली

बुद्धांच्या शिकवणुकीचे भंडार त्रिपिटकमध्ये ओतप्रोत भरलेले आहे. त्रिपिटक मध्ये बुद्धांच्या उपदेशा शिवाय दुसरे काहीही नाही. दुःख मुक्त जीवन, आदर्श जीवन कसे जगावे याची इत्यंभूत माहिती त्यामध्ये आहे. ज्यांनी या त्रिपिटकाचा अभ्यास केला तो मोठा ज्ञानी झाला. पण त्या त्रिपिटकातील बुद्ध तत्वज्ञानाची चिन्हे-रूपके त्याला आकलन झाली नाहीत तर त्याचे पांडित्य हे पोकळ आहे असे समजावे. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्ध तत्त्वज्ञान विविध चिन्हाद्वारे अंकित करण्यात आले. धम्माचा प्रसार करण्यासाठी या चिन्हांची खूप मदत झाली. जेथे-जेथे ही धम्माची रूपके आढळून आली तेथे तेथे बुद्धिझम बहरला होता, हे ध्यानी ठेवावे.

इ.स. पूर्व चौथ्या शतकापासून बुद्ध तत्वज्ञान चिन्हांच्या स्वरूपात दर्शविण्याची कला निर्माण झाली. आणि मग बोधिवृक्ष, धम्मचक्र, बुद्धपदकमल आणि त्रिरत्न या चिन्हांद्वारे हीनयान पंथाचा धम्मप्रसार होऊ लागला. त्यानंतर इ.स. पहिल्या शतकापासून मानवी आकृतीत बुद्धांना साकारणे सुरू झाले. महायान पंथाची मथुरा आणि गांधार कलासंस्कृती ही त्याची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रमात ही चिन्हे रेखाटली जाऊ लागली. कोरली जाऊ लागली. घडविली जाऊ लागली. कमलपुष्प, धम्मचक्र ही जशी बौद्ध संस्कृतीची महत्त्वाची रूपके आहेत तसेच बुद्ध, धम्म आणि संघ यांचे प्रतीक म्हणून त्रिरत्न चिन्ह ही महत्वाचे आहे.

त्रिरत्न बुद्धपदकमल

या त्रिरत्न चिन्हांबाबतची माहिती बौद्ध साहित्यात नसली तरी अनेक शिल्पात ती दृग्गोचर झाली आहे. अशिया खंडात त्रिरत्न चिन्ह वेगवेगळ्या आकारात व प्रतीकात तेथील संस्कृती प्रमाणे दाखविले गेले आहे. महाराष्ट्रातील लेण्यांमध्ये, चैत्यगृहात त्रिरत्न क्वचितच कोरलेले आढळून येते. धम्मचक्र मात्र अनेक ठिकाणी दृष्टीस पडते. गांधार कलासंस्कृतीची जी शिल्पे आहेत त्याठिकाणी त्रिरत्न चिन्हे भरपूर आढळून येतात. तसेच सांची व इतर स्तूपावर अनेक ठिकाणी त्रिरत्न चिन्हे दिसून येतात. पाली भाषेत त्रिरत्नाला ति-रतना असे म्हटले आहे. बुद्ध, धम्म व संघ यांची ही प्रतीके आता जगभर माहिती झाली आहेत. बहुतेक ठिकाणी धम्मचक्रावर ‘अ’ आकाराच्या कमल पाकळ्या दाखवून वरती त्रिरत्न चिन्ह दर्शविण्यात आले आहे.

सांची स्तुप त्रिरत्न नक्षीकाम आणि त्रिरत्न धम्मचक्र

त्रिरत्न चिन्हे कमलपुष्पा प्रमाणेच अत्यंत महत्त्वाचे भाष्य करतात. बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांना शरण जाणे हेच मानव जातीचे उद्दिष्ट असले पाहिजे. हाच बोध त्यातून होतो. गांधार शैलीत काही ठिकाणी बुद्ध-धम्म-संघ ही त्रिरत्ने धम्मचक्र स्वरूपात दाखविण्यात आली आहेत. ही तीन धम्मचक्रे देखील त्रिपिटकांचे ( सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक ) महत्त्व अधोरेखित करतात. त्रिरत्न चिन्हाचे खालील मुख्य भाग पडतात.

१) कमलपुष्प चक्र
२) वज्र
३) ‘अ ‘ आकाराच्या कमलपुष्प पाकळ्या.

तळाचे कमलपुष्प चक्र हे धम्मचक्र दर्शविते. त्यावरील दोन्ही बाजूस तुळवीप्रमाणे असलेला भाग हा वज्रासन दर्शवितो. आणि मग त्यावर असलेल्या तीन कमल पाकळ्या तीन रत्नांचे स्थान दर्शवितात. काही ठिकाणी यावर धम्मचक्र दाखविली गेली आहेत.

स्तंभावर त्रिरत्न

तक्षशीलेच्या नाण्यावर सुद्धा त्रिरत्न चिन्ह अंकित केले आहे. सांची स्तुपाच्या तोरणामध्ये असलेले देखणे त्रिरत्न चिन्ह आजही स्पष्टपणे दिसून येते.बुद्धांच्या पदकमल शिल्पावर देखील त्रिरत्न चिन्हे स्पष्ट दिसतात. राजा अझेस-२ च्या काळातील नाण्यांवर देखील त्रिरत्न चिन्हे दिसतात. इ.स. पूर्व तिसर्‍या शतकातील राजा कुन्नीदास यांच्या नाण्यांवर देखील त्रिरत्न चिन्ह आढळून येते. अमरावती स्तूप येथे देखील त्रिरत्न चिन्ह दिसते. धम्माचा प्रसार या त्रिरत्न चिन्हांद्वारे खूप झाला. व अजूनही होत आहे. जगन्नाथपुरी यात्रा ही मूळ त्रिरत्नाचे प्रतीक आहे हे अनेकांना ज्ञात असेल.

त्रिरत्न शिल्प- गांधार कला

ख्रिस्ती धर्मात त्रिरत्नचे Trinity झाले. हिंदू धर्मातील ‘ओम’ शब्दाचा उगम या त्रिरत्न चिन्हांवरून झालेला आहे, हे सांगितले तर आश्चर्य वाटेल. त्रिरत्न चिन्ह आडवे केले की ते स्पष्ट दिसून येते. बौद्ध संस्कृतीची अनेक चिन्हे-रूपके आज इतर धर्मात काल्पनिक पौराणिक कथेच्या आड व धार्मिक व्यवहारात सामावून गेली आहेत.( उदा. स्वस्तिक चिन्ह, श्रीपाद म्हणजेच सिरिपाद-बुद्ध पदकमल, मंगळसूत्र म्हणजेच मंगलसू्त्त इ.) आणि त्यांचा अभ्यास करायला जावे तर शेवटी सगळी बौद्ध संस्कृतीच ठासून भरलेली दिसून येते.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *