इतिहास

महायान पंथाच्या जपमाळेचे महत्व; या जपमाळेत १०८ मणी का असतात?

भगवान बुद्धांच्या काळानंतर तर्कशास्त्र व वास्तवता यांचा उदय झाला. प्रज्ञेच्या दृष्टीने विकास होत गेला. नैतिक विचारांना स्थान मिळू लागले. भगवान बुद्धांच्या शिकवणुकीमुळे दुःख मुक्तीच्या मार्गाचे, सत्यमार्गाचे आणि विज्ञानमार्गाचे आकलन लोकांना झाले. आंतरिक शांती ही मन विकारमुक्त केल्यानेच लाभते आणि ती ध्यानसाधनेमुळेच प्राप्त होते हे उमगले. मात्र ही स्थिती कायम राहिली नाही. संघामध्ये फूट पडली. सम्राट अशोक यांनी भरविलेल्या धम्मसंगिती नंतर दोनशे वर्षांनी ध्यानमार्गाची शुद्धता लोप पावू लागली.

मन एकाग्र करण्याचे विविध मार्ग भारतात शोधले जाऊ लागले. यातूनच महायान पंथात मनाचे १०८ क्लेश दूर करून एकाग्रता साधण्यासाठी १०८ मण्यांची माळ जपणे चालू झाले. अवलोकितेश्वरांचे ध्यान करणे हा देखील उद्देश त्यामागे होता. ही पध्दत एवढी लोकप्रिय झाली की हिंदू, जैन यांच्या बरोबर मुसलमान, रोमन कॅथलिक आणि जगातील इतर संप्रदायात देखील ध्यानासाठी व ईश्वरनामासाठी जपमाळ ओढणे कालांतराने चालू झाले.

या जपमाळेत १०८ मणी का असतात? याचे उत्तर बौद्ध संस्कृतीत आहे. बुद्धांनी सांगितले की चक्षू, श्रोत, घ्राण, जिव्हा, काया आणि मन हे सहा स्पर्शायतन ( इंद्रिये) आहेत. त्या कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णामध्ये मोडतात.( ६ × ३ = १८) महायान पंथात त्या लौकिक आणि आध्यात्मिक प्रकारामुळे (१८×२) ३६ झाल्या. भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळामूळे त्यांची एकूण संख्या ३६×३=१०८ आली. अशा या तृष्णांमुळे दुःख उत्पन्न होत असते. या दुःखाचा प्रतित्यसमुत्पाद या तत्वाने निरोध करता येतो. हेच तत्व वापरून एकएक मणी ओढली जाणारी जपमाळ महायान पंथात २-३ ऱ्या शतकात उदयास आली.

कालांतराने त्यास मंत्रांचा उच्चार जोडण्यात आला. त्याचा पुढे अफाट प्रसार झाल्यावर अनेक संप्रदायानीं त्यास स्वतःच्या ईश्वराचे नाम जोडले. अशा तर्हेने १०८ मण्यांची जपमाळ जपत मन एकाग्र करण्यावर व ईश्वराचे नामस्मरण करण्यावर अनेक योगी, तपस्वी, धर्मगुरू यांनी भर दिला.

सुरुवातीला जपमाळ ही लाकडी मण्यांची असे. कालांतराने ती रुद्राक्षाची, तुळशीमाळेची, स्फटिकांची, मोत्यांची बनविण्यात येऊ लागली. तरी त्यातील मण्यांची संख्या १०८च राहिली. हिंदू संप्रदायात रुद्राक्षाची जपमाळ शिवशक्तीचे प्रतीक झाल्याने सर्वश्रेष्ठ मानली गेली. १०८ मणी पार केले की एक मेरुमणी जपमाळेत असतो. तो १०८ वेळा जप पूर्ण झाल्याची सूचना हाताला देतो. इस्लामी जपमाळेत ९९ मणी असतात तर कॅथलिक जपमाळेत १५० मणी असतात. अशा या जपमाळेचा उपयोग विविध पंथात ईश्वराच्या नामस्मरणासाठी होत असला तरी ध्यानधारणेसाठी ती योग्य परिणामकारक दिसून येत नाही. शेवटी मन एकाग्रतेसाठी शरीराच्या श्वासाचेच आलंबन योग्य ठरते.

अशा या १०८ तृष्ण संख्येला जगात जादुई नंबर समजला जातो. तिबेटियन बौद्ध संस्कृतीमध्ये १०८ पवित्र ग्रंथ आहेत. भारतीय ज्योतिष शास्त्रातील ९ ग्रह आणि १२ राशी यांचा गुणाकार १०८ येतो. काठमांडूत एकूण १०८ बुद्ध प्रतिमा आढळून येतात. लिप वर्षात ३६६ दिवस असतात. त्यांच्या संख्येचा गुणाकार १०८ येतो. चीनच्या ज्योतिष शास्त्रात १०८ तारे आहेत. Fibonacci sequence या गणितीय सूत्रात १०८ संख्येला महत्व आहे. १०८ मधील संख्येची बेरीज ९ येते व तो लकी नंबर मानला जातो. चंद्र आणि पृथ्वी यांच्या मधील अंतर चंद्राच्या व्यासाच्या १०८ पट आहे. तसेच सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधील अंतर सूर्याच्या व्यासाच्या १०८ पट आहे. अशा बऱ्याच गोष्टी १०८ संख्येशी निगडीत आहेत. तरी आपण जपमाळ घेऊन साधना करीत असाल तर ती मूळ बौद्ध महायान पंथाची देण आहे हे ध्यानी असू द्यावे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)