इतिहास

ईशान्य प्रदेशातील ताई-खामती बौद्ध समाज; ‘संगकेन’ हा त्यांचा सर्वात मोठा सण

भारताच्या ईशान्य दिशेस असलेल्या आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशला एप्रिल २०२१ मध्ये भेट देण्याचे ठरविले होते. तेथील बौद्ध मॉनेस्ट्री आणि अल्पसंख्याक असलेल्या ताई-खामती या बौद्ध समाजाची संस्कृती बघावयाची होती. परंतु वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अभ्यास दौरा रद्द करावा लागला. तरी त्यासंबंधी काढलेली माहिती वाचकांच्या माहितीसाठी संक्षिप्त स्वरूपात येथे देत आहे.
भारतात आसाममध्ये ताई-खामती जमातींची संख्या ६० हजार असून अरुणाचल प्रदेश मध्ये ४० हजार आहे.

१४ एप्रिलला येणारा ताई खामती या ईशान्येकडील बौद्ध कम्युनिटीचा संगकेन उत्सव.

म्यानमार देशात त्यांची लोकसंख्या दोन लाखाच्यावर आहे. इरावती नदीच्या पर्वतीय क्षेत्रांमधून त्यांचे पूर्वज स्थलांतरित झाले असे म्हटले जाते. आश्‍चर्य म्हणजे त्यांच्या भाषेची स्वतंत्र लिपी असून तिला लीकताई असे म्हटले जाते. त्यांच्या मातृभाषेला खामती भाषा असे म्हटले जाते व ती थाई आणि लाओस देशातल्या भाषेशी मिळतीजुळती आहे. त्यांच्या भाषेत ३५ अक्षरे असून १७ व्यंजने आणि १४ स्वर आहेत. परंपरेनुसार त्यांची भाषा ही मॉनेस्ट्रीमध्ये त्रिपिटक, जातककथा, तत्वज्ञान, मार्गदर्शक तत्वे, इतिहास शिकविण्यासाठी वापरली जाते. यांच्या भाषेचे पाहिले पुस्तक १९६० साली प्रसिद्ध झाले.

ताई खामती या ईशान्येकडील राज्यातील बौद्ध समाजाचे मयूर नृत्य.

ताई-खामती जमात थेरवादी बौद्ध परंपरा पाळते व ते शांतताप्रिय आणि शेतीप्रधान लोक आहेत. भात, मासे, निरनिराळ्या पालेभाज्या हे त्यांचे मुख्य अन्न आहे. भारतात चहा पिणारे ते आद्य लोक आहेत. व त्याचे पीक ते १२ व्या शतकापासून घेत असल्याचे दिसून येते. ताई-खामती लोकांची वेशभूषा साधीच असते. त्यांची लाकडापासून मूर्ती बनविण्याची कारागिरी विख्यात आहे. त्यांच्या तलवारीला फा-नप म्हणतात आणि ती छातीवरील म्यानात ठेवली जाते. त्यांच्या लोकनृत्य आणि नाटिका मधून बौद्ध संस्कृती दिसून येते.

एकमेकांना जलाभिषेक करणे हा संगकेन महोत्सवात मोठा सोहळा असतो.

‘संगकेन’ हा त्यांचा सर्वात मोठा सण आणि तो दरवर्षी १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी साजरा केला जातो हा मोठा योगायोग आहे. या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे स्वछ, शीतल जलाचा एकमेकांवर शिडकावा करणे. स्वच्छ आणि शीतल जल हे शुद्धता आणि शांततेचे प्रतीक मानले जाते. या दिवशी विहारातून बुद्धप्रतिमा बाहेर काढल्या जातात. त्यांच्यावर जल वर्षांव केला जातो आणि मग वाद्यांच्या गजरामध्ये भव्य मिरवणूक काढली जाते. यावेळी प्रत्येक घरातून बनविलेल्या गोड पदार्थांचे एकमेकांना आदानप्रदान केले जाते.

ईशान्येकडील राज्यातील ताई खामती कम्युनिटीच्या नृत्य स्पर्धेत भाग घेतलेल्या युवती

सन १८७२ मध्ये इंग्रज अधिकारी इ.टी. डाल्टन यांनी नोंद केली आहे की ही खामती बौद्ध कम्युनिटी पुढारलेली असून ज्ञान, कला आणि सामाजिक सुधारणामध्ये अग्रेसर आहे. यांच्या समाजात नियमितपणे अभ्यासू आणि ध्यानधारणेत उच्च पायरी गाठलेल्या भिक्खुंची प्रमुख भन्तेजी म्हणून निवड केली जाते. यांच्या विहारांना क्योन्ग ( Kyong) म्हणतात आणि प्रत्येक विहार हे वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण असते.

ताई खामती समाजाचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या गोल्डन पॅगोडा समोर होतात, अरुणाचल प्रदेश राज्यातील नामसाई जिल्ह्यातील हा गोल्डन पॅगोडा.

येथील प्रत्येक विहारात भिक्खुंच्या कुटी पासून विहारापर्यंत भिक्खुंच्या पायांना चिखल, माती लागू नये म्हणून पायवाटेवर वाळू पसरलेली असते. ताई-खामतीचें दैनंदिन जीवन हे सकाळी विहारात जाऊन बुद्ध पूजा करणे, त्यानंतर दिवसभर शेतीकाम, व्यवसाय करणे आणि संध्याकाळी पुन्हा विहाराला भेट देऊन भिक्खुंची धम्मदेसना ऐकणे असे असते. विहारांची देखभाल सर्व गावकरी मिळून करतात. अनेक विहारांच्या आवारात भव्य स्तूप दिसून येतात.

अरुणाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पेमा खंडू आणि मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कोनरेड संगमा यांनी ताई खामती या बौद्ध कम्युनिटीच्या महोत्सवात हजेरी लावली.

तर असा हा प्रगतिशील आणि थेरवादी परंपरा पाळणारा ईशान्य भारतातील ताई-खामती बौद्ध समाज एकजुटीने राहतो. एकमेकांना मदत करतो. नियमांचे पालन करतो. सोबत युट्यूब वरील एका गाण्याची चित्रफीत लिंक देण्यात येत आहे. ज्याची अरूणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री चौना में यांनी खास निर्मिती केली आहे. त्यावरून त्यांच्या संस्कृतीची झलक पाहता येईल. तसेच एका शोध निबंधाची लिंक देण्यात येत आहे.

– संजय सावंत, नवी मुंबई, ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *