इतिहास

इतिहासाचे नवीन पुराव्यांच्या आधारे पुनर्लेखन होणे गरजेचे

वाकाटक नृपती ‘द्वितीय पृथ्वीसेन’ याची राजमुद्रा. ही राजमुद्रा ‘नंदिवर्धन’ अर्थात आताचे नगरधन, येथील शेवटचा मुख्य वाकाटकवंशीय नरेश ‘पृथ्वीसेन द्वितीय’ याची असून, या तांब्याच्या राजमुद्रेवर कमलपुष्पात अधिष्ठित असलेल्या ‘तारा’ या बौद्धधर्मातील रक्षकदेवतेची ‘उलटप्रतिमा'(Mirror Image) कोरलेली असून, तिने मस्तकी मुकूट धारण केलेला असून, गळ्यात मौल्यवान अलंकार आहेत. तसेच, तिच्या डाव्या हातात देठासह पूर्ण उमललेले कमळ धारण केलेले असून, तिचा उजवा हात उजव्या मांडीवर, ‘वरदमुद्रे’त आहे.

तांब्याच्या या राजमुद्रेमध्ये ‘तारा’ देवतेच्या प्रतिमेखाली चार ओळींचा ‘मध्यप्रदेशी लिपी'(‘ब्राह्मी लिपी’ नव्हे) या लिपीमधील ‘उलट प्रतिमे'(Mirror Image) मध्ये लेख कोरलेला असून, त्यात एकूण ३३अक्षरे कोरलेली आहेत. या लेखाची भाषा ही संस्कृत असून, या राजमुद्रेची प्रतिमा सुलट करुन केलेल्या लेखाचे नागरी लिप्यंतर पुढील प्रमाणे –

“नरेन्द्रसेन-सत्सुनौ:_
भर्तुर व्व्वाकाटक श्रीय:-
प्रिथिविषेननृपते.
जिगिशौर्ज्जयशासनं- “

अर्थात् ” नरेंद्रसेन याचा पुत्र वाकाटक नृपति पृथ्वीसेन याचे सर्वसमावेशक असे शौर्यशाली जयशासन ”

वाकाटक राजवंशाची माहिती पुढीलप्रमाणे-

वाकाटक राजघराणे:-

संस्थापक
विन्ध्यशक्ति (२५०-२७०)
|
———————————-
|                                        |

(प्रवरपूर-नंदीवर्धन शाखा)            ( वत्सगुल्म शाखा)

१)प्रवरसेन प्रथम- (२७०-२३०)    १) सर्वसेन तृतीय-(३३०-३५५).

२)रुद्रसेन प्रथम- (३३०-३५५)      २)विन्ध्यसेन- (विन्ध्यशक्ती द्वितीय)(३५५-४००).

३)पृथ्वीसेन प्रथम-(३५५-३८०) –   ३)प्रवरसेन द्वितीय-(४००-(राजधानी-पद्मपूर). ४१५).

४)रुद्रसेन द्वितीय-(३८०-३८५).     ४)राजा-अज्ञात- (४१५-४५०).

५)प्रभावतीगुप्ता- (३८५-४०५).    ५) देवसेन-(४५०-४७५).

६)दिवाकरसेन- (३८५-४००).      ६)हरिषेण-(४७५-५००).

७)दामोदरसेन -(प्रवरसेन द्वितीय)
(४००-४४०).

८)नरेन्द्रसेन (४४०-४६०).

९)पृथ्वीसेन द्वितीय (४६०-४८०).

पृथ्वीसेन द्वितीय ( राज्यकाल इ.स.४६० -४८०)हा मुख्य वाकाटक शाखेचा (नंदिवर्धन) ज्ञात असलेला अंतिम शासक होता. नर्मदेतीरी असलेल्या ‘बालाघाट'(मध्यप्रदेश) येथील अभिलेखात पृथ्वीसेन यास ‘आपल्या वंशाचे लयास गेलेले भाग्य व गौरव त्याने पुन्हा प्राप्त करुन दिले’ असल्याचे म्हटले आहे. या अभिलेखातील माहितीनुसार त्यास आपल्या राज्यारोहनाच्या प्रारंभीच्या काळात त्याचे वडिल नरेंद्रसेन याच्या काळापासून असलेल्या विदर्भातील ‘नल’ व दक्षिण गुजरात मधील ‘त्रैकूटक’ वंशीय शत्रूंचा सामना सतत करावा लागला व त्रैकूटक नरेश ‘धारसेन’ याचा पराभव करून आपल्या वाकाटक वंशाचे लयास गेलेले महत्त्व व किर्ती यांची पुनर्प्रस्थापना ‘पृथ्वीसेन द्वितीय’ याने केली. ‘पृथ्वीसेन द्वितीय’ यास पुत्र नसल्याने त्याच्या नंतर वाकाटकांच्या या मुख्य शाखेचे विलीनीकरण ‘वत्सगुल्म’ या त्यांच्याच दुसऱ्या शाखेत होऊन वाकाटक नरेश ‘हरिषेण’ हा त्याचाही ‘उत्तराधिकारी’ म्हणून करु लागला. त्याच्याच काळात, त्याने दिलेल्या विपुल दानातून अजिंठा येथील चित्र व शिल्पकृतींनी युक्त अशा जगद्विख्यात बौद्धलेणींचे निर्माण झाले असल्याची माहिती अजिंठा लेणींमधील शिलालेखांमधून मिळते.

या राजमुद्रेच्या अभ्यासातून मिळणारी विशेष माहिती अशी, की या मुद्रेवर अंकित असलेली प्रतिमा ही महायान बौद्ध धर्मातील एक संरक्षक देवता तथा स्त्री बोधीसत्व ‘तारा’ हीची असून, हिलाच बहुतांश अभ्यासक ‘राज्यलक्ष्मी’च समजतात, आणि त्यावरून वाकाटकांचा संबंध ते ‘वैष्णव’ असल्याशी जोडतात. इतिहास अभ्यासक आणि संशोधकांकडून अनेकदा काही गोष्टींचा चुकीचा ‘अन्वयार्थ’ लावला गेला असल्याने इतिहासात अनेकदा अनेक त्रुटी दिसून येतात. ही ‘राज्यमुद्रा’ महत्त्वाच्या पत्रव्यवहारांवर ‘मोहोर’म्हणून शिक्कामोर्तब करण्यासाठी, तसेच परवानापत्र म्हणून अति महत्वाच्या कारणांसाठीच उपयोगात आणली जात असावी, असे तिच्या आकारमानावरुन व ‘उलट प्रतिमे’ (Mirror Image) वरुन स्पष्ट होते.आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की वाकाटक नरेश ‘प्रवरसेन द्वितीय’ हा महायानी बौद्ध धर्माचा अनुयायी असावा. कारण, त्याच्या नंतर राज्यावर आलेल्या वाकाटक नृपती ‘हरिषेण’ याने अजिंठा येथील महायान बौद्ध धर्माच्या सर्वांगसुंदर व चित्र-शिल्पकृतीं अलंकरणाने युक्त असलेल्या जगद्विख्यात अशा अजिंठा लेणींच्या निर्माणासाठी दिलेले विपुल दान याची साक्षच देते. ”

( ‘मध्यप्रदेशी लिपी’ ही मध्यप्रदेश, बुंदेलखंड व पूर्वीच्या हैद्राबाद संस्थानाचा उत्तरेकडील भाग आणि जुन्या म्हैसूर संस्थानाचा काही भाग येथे इ.स. च्या पाचव्या शतकापासून नवव्या शतकापर्यंत ही लिपी प्रचारात होती. गुप्त, वाकाटक वंशीय, शरभपूरचे राजे, महाकोशलचे कित्येक सोम(गुप्त)वंशीय राजे,व कदंब या सर्वांच्या दानपत्रात व शिलालेखांत ही लिपी उपयोगात आणली आहे. संदर्भ- ‘प्राचीन भारतीय लिपीमाला’, ले. रायबहादूर पं. गौरीशंकर हीराचंद ओझा. अनुवादक-डॉ. लक्ष्मीनारायण भारतीय. प्रकरण बारावे- मध्यप्रदेशी लिपी. पान क्र.६४)

-अशोक नगरे
पुराभिलेखागार संचालनालय, महाराष्ट्र शासन प्रमाणित मोडी लिप्यंतरकार, धम्मलिपी तथा प्राचीन इतिहास व पुरातत्त्व अभ्यासक. पारनेर,जि. अहमदनगर.