इतिहास

जगाला महान बौद्ध विद्वान देणाऱ्या तामिळनाडूतील प्राचीन ‘कांची’ भूमीचा इतिहास – भाग १

तामिळनाडूतील कांची म्हणजेच आताचे कांचिपुरम शहर होय. प्राचीन काळात दक्षिण भारतातील बौद्ध धम्म शिक्षणाचे सर्वात महत्त्वपूर्ण केंद्र होते. कांचीच्या भूमीने जगाला बोधीधर्म, धर्मपाल, बुद्धघोष, दिनाग हे नामांकित विद्वान दिले. गुरु पद्मसंभव यांनीही द्रविडच्या भूमीला भेट दिली होती. कांचिपुरम मध्ये आजही प्राचीन बौद्ध मुर्त्यांची अवशेष सापडतात. पुरात्तव अभ्यासकांनी बौद्ध धम्मासंबंधी अनेक प्राचीन पुरावे शोधून काढले आहेत. कांचीच्या भूमीतून बहरलेल्या बुद्ध धम्माचा इतिहास wayofbodhi.org या वेबसाईटच्या सौजन्याने ३ भागामध्ये आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

तामिळनाडूमधील पोम्पुहार हे कांचीचे दुसऱ्या शतकातील प्रसिद्ध बौद्ध केंद्र होते. आता ते सुमद्राच्या पाण्याखाली गेले आहे. कांचीमध्ये प्राचीन काळात बौद्ध धम्माचा प्रभाव असल्याचा संदर्भ मनिमेकालाई, सिलापतिकरम आणि मदुरैकांछी अशा अनेक तमिळ संगम ग्रंथांमध्ये आढळतो.

तमिळ महाकाव्य मनिमेकलाच्या म्हणण्यानुसार बौद्ध धम्मगुरु अरावण आदिगल यांनी कांची येथे मुक्काम केला होता. महाकाव्य मनिमेकलाच्या प्रमुखास बौद्ध धम्माचा मार्गावर जाण्यासाठी मार्गदर्शन केले होते. मणिमेकलाई महाकाव्यानुसार कांची येथे एक बोधिसत्व भिक्षुणी होती जी अनेकांच्या दु: खाची आणि उपासमारी घालवण्यासाठी काम करत होती. कांची येथेच बोधिसत्व भिक्षुणीला निर्वाण प्राप्त झाले होते.

चीनचा बौद्ध भिक्षु-प्रवासी (इ.स. ७ व्या शतक) ह्युएन-त्सांगने कांचीला भेट दिली तो पर्यंत कांचीमध्ये बौद्ध धम्म वैभवाच्या शिखरावर होते. ह्युएन-त्सांगने आपल्या प्रवास नोंदीत कांची येथे सुमारे शेकडो महायान बुद्ध विहार आणि तेथील १०,००० भिक्षुंची नोंद केली. तसेच अशोकाने बांधलेल्या सुमारे १०० फूट उंच स्तूपांचा उल्लेख केला आहे. कांचीच्या लोकांबद्दल ह्युएन-त्सांगने लिहिले आहे की, “तिथले लोक धैर्यवान आहेत. ते प्रामाणिकपणाची आणि सत्याच्या तत्वांचा उच्च आदर ठेवतात.

इतर विश्वासू नोंदीनुसार बौद्ध महायान मठ इसवीसन १४ व्या शतकापर्यंत कांचीमध्ये सक्रिय होते. कांचीच्या अनेक बौद्ध विद्वान आणि तत्त्वज्ञ तयार केले आहेत. झेन बौद्ध धम्माचा संस्थापक बोधिधर्म हा कांचीच्या राजाचा (बहुधा पल्लव राजा) मुलगा असल्याचे म्हटले जाते. जगप्रसिद्ध बौद्ध तर्कशास्त्रज्ञ दिनाग हे देखील कांचीचे होते. तसेच त्यांची शिष्य धर्मकीर्ती ही जवळच असलेल्या त्रिमला (तिरुमाला,तिरुपती) येथे राहत होती.

आचार्य नागार्जुनचे प्रख्यात शिष्य आर्यदेव देखील शेवटच्या दिवसांत कांची येथे राहत होते असे म्हटले जाते. नालंदा विद्यापीठाचे प्रमुख धर्मपाल हे सुद्धा कांचीचे होते. कांचीच्या भूमीने जगाला बुद्धघोष यांच्यासारखा विद्वान दिला. पाली सुत्तांचे आणखी एक प्रसिद्ध भाष्यकार धम्मपाल आणि अभिधम्मसंगाचे लेखक अनुरुद्धा थेरा हे देखील कांचीचे होते. वज्रयान परंपरेनुसार ८४ नागांपैकी एक असलेले सिद्ध नागार्जुन सुद्धा कांचीचे होते.

तिब्बती बौद्ध गुरु जेत्सुन तरानाथाच्या मते, गुरु पद्मसंभव (गुरु रिनपोचे) यांनी आठव्या शतकात द्रविड भूमीला (तामिळनाडूला) भेट दिली होती. तेथे १२ वर्षे सुत्र आणि वज्रयान बौद्ध धम्म शिकविला. ८ व्या शतकात कांची द्रविडच्या भूमीतील सर्वात महत्वाच्या बौद्ध केंद्रांपैकी एक असल्यामुळे पद्मसंभवने कांचीला आले होते.

बिहार येथील बोधगया (जवळजवळ ९ व्या ते ११ व्या शतक) जवळ कुर्किहार येथे प्रख्यात बौद्ध विहारच्या उत्खननात सापडलेल्या शिलालेखांनुसार तेथे आढळलेल्या बुद्ध मुर्त्या कांचीच्या लोकांनी दान केल्या होत्या. यामुळे हे लक्षात येते की त्या काळात कांचीची भूमी बुद्ध धम्माने बहरली होती. १३ व्या शतकात मार्को पोलो या युरोपियन प्रवाशाने कांचीजवळील महाबलीपुरमच्या समुद्राच्या किनाऱ्याजवळ सात पॅगोडे (चैत्य) पाहिले असल्याचे नोंदी केल्या आहेत. चौदाव्या शतकात जावाच्या प्रख्यात कवीने कांचीमध्ये तेरा बौद्ध मठांच्या अस्तित्वाबद्दल आपल्या लेखनात उल्लेख केला आहे.

कोरियामधील चौदाव्या शतकातील शिलालेखानुसार कांची येथून ध्यानभद्र हे इसवीसन १३७० मध्ये कोरियात जाऊन तेथे एक महायान मठ स्थापन केले होते. त्या शिलालेखात असेही नमूद केले आहे की, त्यांनी कांची येथे अवतंसक सुत्राचे शिक्षण घेतले. या सर्व नोंदीवरून असे दिसून येते की १४ व्या शतकापर्यंत बुद्ध धम्म कांचीमध्ये जिवंत होता. वज्रयानानुसार कांची हे बौद्ध धम्माच्या चोवीस पवित्र स्थळांपैकी एक होते.

Credits:  Yogi Prabodha Jnana & Yogini Abhaya Devi

 

9 Replies to “जगाला महान बौद्ध विद्वान देणाऱ्या तामिळनाडूतील प्राचीन ‘कांची’ भूमीचा इतिहास – भाग १

  1. अप्रतिम माहिती दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार नमो बुध्दाय !!! जय भीम !!!

  2. आभारी आहे.इस धम्म सन्तानो.????????????

Comments are closed.