इतिहास

बोधिवृक्षाचा इतिहास; वृक्षाचे उच्छादन व पुनर्जीवन

बोधिवृक्ष जगात सर्वात प्राचीन आणि ऐतिहासिक वृक्ष मानला जातो. त्याचा इतिहासही विचित्र घटनांनी भरलेला आहे. अडीच हजार वर्षापूर्वीच्या या पुरातन वृक्षाचे अस्तित्व नि पावित्र्य पूर्वीइतकेच आजही जसेच्या तसे आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी त्याच्या फांद्या तोडून नेऊन अनेक स्थळी त्याचा विस्तारही केला आहे.

भगवान गौतमाच्या वेळेस या वृक्षाची एक फांदी श्रावस्तीच्या जेतवन बागेत महास्थविर आनंद याच्या हस्ते लावली गेली होती. म्हणून त्या स्थळी त्या वृक्षाला “आनंद बोधिवृक्ष” असे नाव तेथे ठेवण्यात आले आहे. तो वृक्ष अद्याप त्या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे सम्राट अशोकाची कन्या भिक्षुणी संघमित्रा हिने या वृक्षाची एक फांदी श्रीलंकेला नेली व तेथे अनुराधापुरात लावली. सदर फांदीपासून लावलेला वृक्ष अद्याप त्या स्थळी आहे.

बोधगया येथील बोधिवृक्ष

वृक्षाचे उच्छादन व पुनर्जीवन
सम्राट अशोकाने कलिंगदेश पादाक्रांत केल्यानंतर त्याने बुध्दधर्माची दीक्षा घेतली आणि आपल्या ठायी वास करीत असलेल्या दुर्वासना नि दुर्भावना नष्ट व्हाव्यात या समजुतीने तो दररोज नियमितपणे त्या वृक्षाखाली येऊन बसत असे, हा त्याचा रोजचा उद्योग त्याची पत्नी तिश्यरक्षिता हिस पसंत न पडल्याने तिने मत्सराने प्रेरित होऊन त्या वृक्षाचे मूळासह उच्चाटन करून टाकले. या प्रकारामुळे सम्राट अशोकास अतिशय दुःख झाले व त्याने त्याचवेळी घोर प्रतिज्ञा केली की, या वृक्षाला पूर्ववत पाने फुटेपर्यंत या जागेवरून मी हलणार नाही. असे सांगतात की, काही दिवसानंतर लवकरच त्या ठिकाणी जमिनीत असलेल्या मुळांना कोंब फुटून पाने दिसू लागली. आणि अशोकाला आपली प्रतिज्ञा सफल झाल्याचा आनंद उपभोगण्याचा प्रसंग निर्माण झाला.

इ.स.च्या ६ व्या शतकात जनपदाचा कर्ण सुवर्ण नावाचा बुध्द धर्माचा एक हितशत्रु होता. त्याने मत्सराने प्रेरित होऊन या वृक्षाचे मूलोछेदन केले. परंतु मगध देशाचा राजा पूर्ववर्मा याने अनेक प्रयत्न करून नि त्या वृक्षाच्या मूळाचे संरक्षण करून, परत ती मुळे जमिनीत पुरली व जोपासना केली. या अपराधाबद्दल त्या कर्णसुवर्णास हद्दपारीची शिक्षा दिली गेली.

इ.स. १८७० साली एक महाभयंकर वादळ व पाऊस झाला. त्यात हा वृक्ष मूळासह उखडला गेला. परंतु हरेक प्रयत्न करून परत त्याच जागी तो लावला गेला व पुन्हा तो पूर्ववत् झाला. इ.स. १८८० मध्ये मंदीराच्या जीर्णोध्दाराच्या वेळी हा वृक्ष पुन्हां पडला त्यावेळी त्याची एक फांदी त्याजागी लावली गेली व अशा रीतीने हल्ली अस्तित्वात असलेला वृक्ष हा त्या फांदीचाच पुनजिवीत झालेला भाग होय.

दुसरी एक फांदी बोधिमंदिरापासून उत्तरेस ८० फुटांवर लावली गेली. ती ही पुनर्जीवीत होऊन हल्ली तेथे तिचा मोठा वृक्ष झाला आहे. त्या वृक्षाखाली हिंदू महंतांनी अनेक देवतांच्या मूर्ति ठेवल्या आहेत. त्यामुळे ते स्थान आपल्या पूर्वजांचे पिंडदान देण्याचा विधि करण्यासाठी आजपावेतो उपयोगात आणतात. बौध्दवाङमयाप्रमाणेच हिंदू धर्मग्रंथांत विशेषतः अग्निपुराण नि वायुपुराण यांत बोधिवृक्ष आणि बौद्धगया यांचे महात्म्य यथार्थ वर्णन केलेले आहे.

माझे बौद्ध तीर्थाटन (वर्ष -१९६३) – ल.ना.अंकुश गुरुजी