इतिहास

नांदेड बुद्ध धम्माचा इतिहास भाग ०१ : बौद्ध इतिहासात नांदेडचा शोध!

नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक बौद्ध धम्माचा वारसा लाभलेला आहे. नांदेड जिल्ह्याचा सर्वात प्राचीन इतिहास सुत्तनिपात या पाली बौद्ध ग्रंथात आढळतो. सुत्तनिपात हा पाली ग्रंथ सम्राट अशोकाच्या काळापूर्वी म्हणजेच इसवीसन पूर्व चवथ्या शतकातला आहे.

इसवीसन पूर्व सहाव्या शतकात भगवान बुद्धांच्या तत्व चिंतनाच्या रूपाने या विश्वाच्या अस्तित्वातल्या अंतिम सत्याचा शोध सुरु झाला. आत्मवादी आणि अनात्मवादी तत्त्वचिंतन प्रतिपादिले गेले. या साऱ्या तत्वचिंतनाचे भौगोलिक क्षेत्र होते, मुख्यतः गंगा यमुना खोरे. असे असले तरी महाराष्ट्रातून जिज्ञासू बावरी ब्राह्मणाचे शिष्य उत्तरेत गेले होते. ते अस्मक जनपदात गोदावरीच्या काठी (नांदेड येथे) राहत होते. बावरीचे शिष्य उत्तरेत जाऊन भगवान बुद्धांना प्रत्यक्ष भेटले होते. भगवान बुद्धांच्या तत्वचिंतनाने बावरीचे शिष्य आणि बावरी प्रभावित झाले. भगवान बुद्धाच्या काळातच बावरीच्या रूपाने बौद्ध तत्वचिंतन नांदेड तसेच मराठवाड्यात पोहचले होते. (पुढच्या भागात बावरीचा इतिहास पाहणार आहोत)

हे पण वाचा : नांदेड बुद्ध धम्माचा इतिहास भाग ०२ : बावरी ब्राह्मण आणि त्याचे १६ शिष्य 

सांची येथील स्तुपावरील दानलेखात एका नन्दिनगराचा उल्लेख आला आहे. हे नन्दिनगर म्हणजेच नांदेड असे काही संशोधकांचे मत आहे. सांची स्तुपावरील दानलेखात नन्दिनगर येथील अनेक बौद्ध भिक्षु – भिक्षुणी तसेच इतर नागरिकांची नावे आली आहेत. यावरून नांदेड हे दक्षिणेतील एक बौद्धपीठ असल्याचे दिसते. अमरावतीहून विदीशेकडे जाणाऱ्या राजमार्गावरील ते एक प्रमुख स्थान होते. सांची येथील दानलेखावरून तसेच नांदेड परिसरात सापडलेल्या पुरावशेषांवरून नांदेडचे प्राचीनत्व सातवाहन काळापर्यंत मागे नेता येते. (सांची स्तुपावरील दानलेख आणि नांदेडचा संबंध याचा विशेष भाग पुढे येणार आहे)

महाराष्ट्र्रात सर्वात जास्त नदी प्रणालीचे क्षेत्र गोदावरी खोरे आहे. गोदावरी खोऱ्याचा महाराष्ट्रात ५० टक्के भाग आहे त्यात मराठवाड्याचा ९० टक्के भाग येतो. एकूणच गोदावरीचे खोरे हे महाराष्ट्राचे प्राचीन वस्तीस्थान मानले जाते. प्रागैतिहासिक काळातील मध्यपुराश्मयुगीन हत्यारे नांदेड परिसरातील किवळा येथे मिळाली आहेत.

ऐतिहासिक काळाच्या प्रारंभी भारतात एकूण सोळा जनपदे अस्तित्वात होती. त्यापैकी अश्मक व मूलक ही दक्षिण भारतात होती. अश्मक जनपद हे दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन जनपद. प्राचीन वाङ्मयात या जनपदाचा उल्लेख आढळतो. या अश्मक जनपदाची राजधानी पोटन म्हणजे आताच्या आंध्र प्रदेशातील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन होय. बोधन नांदेड जिल्ह्याच्या सरहद्दीपासून अगदी जवळ आहे. यावरून नांदेड त्या काळी अश्मक जनपदाचा भाग असल्याचे सिद्ध होते.

नंदवंशीयांनीही येथे सत्ता स्थापन केली. पैठण हे शहर नंद वंशीयांची दक्षिणेतील राजधानी होते तर ‘नंद आहार’ किंवा “नवनंद डेरा’ नावाने ओळखले जाणारे नांदेड हे उपराजधानीचे ठिकाण होते. नांदेड हे नाव नवनंद डेरा या नावाचे अपभ्रंश रुप आहे. पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक व लेखक रा.श्री.मोरवंचीकर यांच्या मते नांदेड ही उत्तरेकडील नंदांच्या साम्राज्याची दक्षिणेतील सीमा होती.

इसवीसन ६३० मध्ये भारतामध्ये आलेला बौद्ध भिक्खू ह्वेन त्सांग या चिनी प्रवाशाने आपल्या प्रवास वर्णनात असे नोंदविले आहे की, नंद घराण्यातील धनानंदची गोदावरी काठावरील नंदेडरा ही उपराजधानी होती. आजही लोकस्मृतीता नांदेड ही नंद व नवनंदाची राजधानी असल्याचे सांगितले जाते.

हे पण वाचा : नांदेड बुद्ध धम्माचा इतिहास भाग ३ : बावरीचे १६ शिष्य आणि तथागत बुद्धांची भेट

प्रसिद्ध इतिहासतज्ञ डॉ. प्रभाकर देव यांच्या मते नंदगिरी ही सातवाहनांची पहिली राजधानी होती. नांदेडपासून केवळ पाच कि.मी. अंतरावर असणाऱ्या असरजंग/असर्जन या खेड्याजवळ सातवाहनकालीन अवशेष मिळाले आहेत . वाकाटकांच्या वात्सगुल्म या शाखेच्या काळात (इ.स.३३०-५१०) नांदेड हे मुख्यालय झाले. त्यामुळे नांदेडला राजकीय महत्त्व प्राप्त झाले. वाकाटक नृपती विंध्यशक्ती द्वितीय याच्या वाशीम ताम्रपटात “ वाकाटकानां श्री विंध्यशक्तेखचेनात नान्दीकडस उत्तरमग्ये ” असा नांदेडचा उल्लेख केला

या सर्व ऐतिहासिक पुराव्यावरून नांदेड हे बुद्धकाळापासून दक्षिणेतील बौद्ध धम्माचे प्रसिद्ध स्थळ असल्याचे सिद्ध होते. नांदेड जिल्ह्यातील कंधार शहर आणि परिसरात अनेक प्राचीन बौद्ध अवशेष सापडले आहेत. मला इथे मुखेड तालुक्याबद्दल विशेष माहिती द्यावी असे वाटते. मुखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये बौद्ध अवशेष सापडले असूनही एकाही अभ्यासकांचे आणि संशोधकाचे याकडे लक्ष दिसत नाही. त्यासोबतच सर्वांना आश्चर्य वाटणारे असे एक अवशेष १९७० सापडले…चक्क सम्राट अशोकाचा एक छोटा स्तंभ मुखेड तालुक्यातील एका गावात घराचे काम करताना सापडले होते. पुढे यावर काहीच संशोधन झाले नाही. ह्या सर्व अवशेषांवरून नांदेड जिल्हा बुद्ध धम्माच्या प्रभावाखाली असल्याचे स्पष्ट दिसून येते.

-जयपाल गायकवाड, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *