इतिहास

नांदेड बुद्ध धम्माचा इतिहास भाग ०२ : बावरी ब्राह्मण आणि त्याचे १६ शिष्य

पहिल्या भागात आपण ‘बौद्ध इतिहासात नांदेडचा शोध‘ वाचला असेल. नांदेड परिसर तसेच महाराष्ट्रात तथागतांच्या हयातीतच बुद्ध धम्माचा प्रवेश झाला होता. याचा पुरावा म्हणजे त्रिपिटकातील ‘सुत्तनिपात’ या ग्रंथात महाराष्ट्रातील बौद्ध इतिहासाच्या नोंदी मिळतात. बुद्धवचनात काळाच्या दृटीने सुत्तनिपाताचे महत्व अत्याधिक आहे. सुत्तनिपात मधील ‘अट्टकवग्ग’ तथा ‘पारायण वगातील ‘वत्थुगाथा’ यात बुद्धकालीन बावरी ब्राह्मण आणि त्याच्या सोळा शिष्यांचे वर्णन आले आहे.

‘वत्थुगाथा’ संगीतिकारक भिक्षूद्वारा रचलेली आहे. त्याचा प्रवक्ता आयुष्मान आनंद होता. यात बावरीचा इतिहास आहे. बावरी ब्राह्मण हा कौशल नरेश प्रसेनजीत राजाचा पुरोहिताच्या पुत्र होता. बावरी अत्यंत विद्वान ब्राह्मण होता. सांसारिक जीवनाला कंटाळून राजा प्रसेनजीतच्या अनिच्छेनेच बावरी प्रवज्जीत झाला. त्याने सन्यास ग्रहण केला. त्याच्या सोबतच त्याचे सोळा हजार अनुयायी असलेले सोळा शिष्यही प्रवज्जीत झाले. बावरीचे राजा प्रसेनजीत यांच्या राज्यात मन रमले नाही. म्हणून बावरी अन्य उपयुक्त स्थानाचा शोध घेऊ लागला.

हे पण वाचा : नांदेड बुद्ध धम्माचा इतिहास भाग ०१ : बौद्ध इतिहासात नांदेडचा शोध

प्रसेनजीत राजाने बावरीला थांबवण्याचे प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले. शेवटी बावरी आपल्या शिष्यासह जेथे राहू इच्छितो, त्या ठिकाणी आश्रम बांधून द्यावा व धनाची मदत करण्याचे ठरवले. त्यानंतर बावरी आपल्या शिष्यासह उत्तर पथातून दक्षिण पथाला निघाला. पाटलीपुत्र कडून महाराष्ट्राच्या प्रतिष्ठान (पैठण) कडे जाणारा मध्यभारतातील दक्षिण पाठ हा महत्वाच्या मार्गाने दक्षिण पथात आला.

‘सो अस्सकस्स विसये, अळकस्स समासमे, वसी गोदावरी कुठे, उच्छेनच फलेनच’

अश्मक आणि अलक (मूलक) (सध्याचे आंध्र आणि महाराष्ट्र) या दोन राज्यांच्या मध्ये गोदावरी नदी आहे. गोदावरी नदीच्या काठी भिक्षा मागून आणि फळांचे सेवन करून बावरी निवास करू लागला. अश्मक आणि अलक राज्यातील गोदावरीचा काठ म्हणजे हल्लीचे पैठण पासून बोधन पर्यंतचा गोदावरी खोऱ्याचा तो भूभाग आहे. गोदावरीच्या किनारी एक मोठे गाव होते. (म्हणजे आताचे नांदेड होय) त्या ठिकाणी बावरीने आश्रम बांधला व तेथे तो निवास करू लागला. बावरी तपस्याचे जीवन व्यतीत करू लागला.

जेव्हा त्याची वयाची १०० वर्षे पूर्ण झाली. (काही ठिकाणी ८० वर्ष म्हटले आहे.) तेव्हा त्याने आसपासच्या गावातून धनधान्य गोळा केले आणि महायज्ञ आरंभिला. ध्यान भावना, ध्यान साधनेत खंड पडू न देता, बावरी गांभीर्याने समाधीचा अभ्यास करीत होता. ध्यान करता करता त्याचे मनात आले की आता आपले वय वाढले आहे, जास्त दिवस जीवंत राहणार नाही. आपले पुण्यकर्म संचित वाढावे यासाठी त्याने या मोठ्या गावी महायज्ञ सोहळा करण्याचे आयोजन केले. आपल्या विद्वान शिष्यांना कामाला लावले. समाजातून अन्नधान्य, पैसा अडका, सोने नाणे जमा केले. बावरीचा महायज्ञ सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. यज्ञ पूर्ण झाल्यावर उरलेले धान्य पैसे, मुद्रा गोरगरिब लोकांना वाटून टाकले. बावरी विद्वान आणि महान होता तसाच तो दानशूरही होता.

धर्मानंद कोसंबी (अनुवाद : पु वि.बापट) लिखित सुत्तनिपात ग्रंथातील ‘अट्टकवग्ग’ तथा ‘पारायण वग्गातील ‘वत्थुगाथा’चा काही भाग

मोठा यज्ञ आटोपल्यावर बावरी आपल्या आश्रमात आला. एवढ्यात एक ब्राह्माण तिथे आला आणि बावरी समोर उभा राहिला. त्या ब्राह्मणाने बावरीला पाचशे कार्षापणाची (मोहरा, मुद्रा) मागणी केली बावरी ब्राह्मणाने त्याला पाहन विनम्रपणे आसनावर बसायला सांगितल. त्याचे क्षेम, कुशल, मंगल विचारले. नंतर बावरी आदराने त्या ब्राह्मणाला म्हणाला. हे ब्राह्मण! ज्या काही माझ्याजवळ दान देण्यायोग्य वस्तू हात्या, त्या सर्व वस्तू मी दान देऊन टाकल्या आहेत. हे ब्राह्मणा, मला क्षमा कर. माझ्या जवळ तुला देण्यासारखे काही नाही. माझे म्हणणे तू मान्य कर. माझ्या जवळ तुला देण्यासाठी पाचशे कार्षापण नाहीत. बावरीने विनम्रपणे आपली असमर्थता व्यक्त केली. तो असंतुष्ट ब्राह्मण (याचक) रागावला. संतापला. सामान गोळा केले आणि बनावटी हालचाल करून बावरीला शाप दिला. हे ब्राह्मणा! याचना केली असता जर मी मागितल्यावर तू दिले नाहीस तर सातव्या दिवशी तुझ्या डोक्याचे सात तकडे होवोत.

एवढा मोठा यज्ञ केला, दान केले. असे असताना ढोंगी आणि दांभिक ब्राह्मणाने बनावट क्रिया करून भयंकर शाप दिला. त्या शापाला ऐकून वृद्ध बावरी दुखी झाला. तेवढ्यात त्याला एक सन्मित्र भेटला आणि त्याने बावरील सांगितले की, धनलोभी ढोंगी असलेला माणसाला डोक्याच्या फुटण्याविषयी काहीच ज्ञान नाही. तसेच लोभी माणसाचा शाप शीलवान माणसाला लागत नाही असे सन्मित्राने बावरील समजून सांगितले. वयोवृद्ध बावरीचे समाधान झाले मात्र उत्सुकता आणि जिज्ञासा जागृत झाली. तो सन्मित्राला म्हणाला डोके आणि डोक्याचे सात तुकडे होण्याचा नेमका अर्थ काय? काही अर्थ असेल तर मला समजून सांगा.

बुद्धचर्या (हिंदी) : महापंडित राहुल सांकृत्यायन यांच्या पुस्तकातील काही भाग

तो सन्मित्र म्हणाला मी देखील या गोष्टीला जाणत नाही. त्याचे मला ज्ञान नाही. कारण डोके आणि डोके फुटणे हा सम्यक सम्बुद्धाचा विषय आहे. याविषयी तेच एकमेव जाणतात. बावरी म्हणतो या पृथ्वीतलावर मंडलावर, डोके आणि डोके फुटणे म्हणजे काय? हे जाणणारा असा कोण आहे? सन्मित्र म्हणतो शाक्यपुत्र, प्रकाशमान लोकनायक, सम्बुद्ध सर्व धर्मात पारंगत असलेले सर्वज्ञ चक्षुमान, त्यांनी दुःखाची सर्व मुळेच उखडून टाकली आहेत. ते चक्षुमान भगवान बुद्ध लोकांना धम्मोपदेश करीत आहेत. बावरी भगवान बुद्धाजवळ जाऊन त्यांना हे विचार म्हणजे ते तुला समजावून सांगतील. सम्बुद्ध हे शब्द ऐकून बावरी हर्षित झाला.

आनंदित होऊन बावरी सन्मित्राला विचारले लोकनाथ भगवान बुद्ध कोणत्या गावात, प्रदेशात आहेत, जेथे जाऊन आम्ही सम्बुद्धाला नमस्कार करू? सन्मित्र म्हणाला भगवान बुद्ध कोशाल देशातील पवित्र श्रावस्ती नगरामध्ये राहतात. वयोवृद्ध बावरीने मनुष्य जन्मात बुद्ध उत्पन्न झालेत हे ऐकताच धम्म जाणून घेण्यासाठी उत्साहीत झाला. तो वयोवृद्ध असल्याने प्रवास करू शकत नव्हता. त्याने आपल्या १६ शिष्याना बुद्धाकडे पाठवले. ते सर्व शिष्य विष्यविख्यात होते. आचार्य होते.

हे पण वाचा : नांदेड बुद्ध धम्माचा इतिहास भाग ३ : बावरीचे १६ शिष्य आणि तथागत बुद्धांची भेट

बावरी आपल्या शिष्याना भगवान बुद्धाकडे पाठवताना उपदेश करतो की, विश्वात ज्यांचे उत्पन्न होणे प्राय: दुर्लभ आहे. ते आज सम्बुद्ध नावाने या विश्वात उत्पन्न झाले आहेत. तुम्ही त्वरित श्रावस्ती येथे जाऊन त्या सर्वश्रेष्ठाचे दर्शन घ्या आणि डोके आणि डोके फुटणे म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यावे असे सांगितले. बावरीचा उपदेश ऐकून १६ शिष्य प्रथम मुल्लकाची राजधानी प्रतिष्टान (पैठण) ला गेले तिथून ते पुढे भगवान बुद्धाकडे गेले.

बावरीच्या १६ शिष्यांचे नाव

१) जित २) तिस्समेत्तेय्य ३) पुण्णक ४) मेत्तगू ५) धोत्तक ६) उपसीव ७) नन्द ८) हेमक ९) तोदेय्यकप्प १०) दूभय ११) पंडित जातुकण्णी १२) भद्रायुध १३) उदय १४) पोसाल ब्राह्मण १५) मेधावी मोघराजा १६) महाऋषी पिंगिय

संदर्भ : संदर्भ : १) सुत्तनिपात ; धर्मानंद कोसंबी (अनुवाद : पु वि.बापट)
२) बुद्धचर्या (हिंदी) : महापंडित राहुल सांकृत्यायन
३) बुद्धकालीन बावरी ब्राह्मण आणि बावरीनगरच्या ऐतिहासिक धम्म परिषदा – डॉ व्ही के भालेराव

जयपाल गायकवाड, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *