आंबेडकर Live

संसद भवनाच्या आवारात उभारलेल्या डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याचा इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात इ.स. १९६७ मध्ये उभारलेला पंचधातूचा पुतळा आहे. बी.व्ही. वाघ यांनी हा पुतळा बनवलेला असून आंबेडकरी समाजाने लोकवर्गणीतून हा पुतळा उभारला. आंबेडकरांचे हे स्मारकशिल्प चौथऱ्याशिवाय एकूण १२.५ फूट उंचीचे आहे.

बाबासाहेबांच्या पुतळ्याची रचना
हा पुतळा पायथ्यापासून/चौथऱ्यापासून एकूण १२.५ फूट उंचीचा असून त्यात आंबेडकरांचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या चौथऱ्यावर थोडा पुढे सरकवून ठेवलेला आहे. आधारासह किंवा चौथऱ्यासह या पुतळ्याची उंची सुमारे २५ फूट आहे. हा पुतळा साधारण मनुष्याच्या चार पट लाईफ साईज आकाराचा आहे. पंचधातूच्या या पुतळ्याचे वजन दीड टन आहे. बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या डाव्या बगलेत भारतीय संविधान हे पुस्तक आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे वर उचललेला असून तर्जनी भारतीय संसद भवनाकडे अंगुलिनिर्देशन करताना दर्शवते.

शिल्पकार ब्रह्मेश विनायक वाघ आणि पुतळा
हा पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने संसद परिसरासाठी भेट दिला होता आणि यासाठी आंबेडकरवादी समाजाने या पुतळ्यासाठी लोकवर्गणीद्वारे पैसा गोळा केला होता. डॉ. आंबेडकरांचा हा पुतळा मुंबईचे शिल्पकार ब्रह्मेश विनायक वाघ यांनी बनवलेला होता. ब्रह्मेश वाघ यांना हा पुतळा बनवण्यासाठी आंबेडकरांच्या पत्नी सविता आंबेडकर यांनी सर्वतोपरी मदत केली. बाबासाहेबांचे पायापासून ते डोक्यापर्यंतचे सर्व साहित्य त्यांना पुरवले. हा पुतळा दोन वर्षाच्या परिश्रमानंतर तयार झाला आहे. यापूर्वीही ब्रह्मेश वाघ यांनी इ.स. १९५९ साली मुंबईतील कूपरेज मार्गावर असलेला डॉ. आंबेडकरांचा सर्वप्रथम पुतळा तयार केला होता.

१४ एप्रिल म्हणजेच डॉ. आंबेडकर जयंती दिनी व ६ डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा व राज्यसभा सदस्य, केंद्रीय मंत्री, राज्यपाल इत्यादी नेते व जनता डॉ. आंबेडकरांना स्मरून या पुतळ्याला अभिवादन करत असतात.

राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण
२ एप्रिल १९६७ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते त्याचे अनावरण झाले. संसद भवनाच्या आवारात उभारला जाणारा हा दुसरा पुतळा आहे. यापूर्वी पंडित नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू यांचा पुतळा या आवारात उभारण्यात आला.

“ज्ञानार्जन चालू ठेवा, सत्याचा शोध घ्या व ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीयांना संदेश आहे” असे उद्गार भारताचे महामहिम तत्कालीन राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी संसदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या डॉ.आंबेडकरांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी काढले.

राष्ट्रपती पुढे म्हणाले, ‘लोकशाही पद्धतीवर डॉ. आंबेडकरांची नितांत श्रद्धा होती. रक्तपात होऊ न देता समाजात क्रांतिकारक परिवर्तन घडविता येणे शक्य आहे, असा त्यांचा विश्वास होता. त्यांचा हा विश्वास अनाठायी नव्हता, हे भारतातील अनेक स्थित्यंतरांवरून सिद्ध झाले आहे. राष्ट्रीय ऐक्यावर त्यांचा भर होता. भारतात जोपर्यंत हिंदू, मुस्लिम, सिंधी, तमिळी असे भेदभाव राहतील तोपर्यंत भारताती प्रगती होणार नाही, असे त्यांचे विचार होते.’

आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष व भारताचे गृहमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले,“ लोकशाही मूल्यांवर बाबासाहेबांची श्रद्धा होती. खऱ्या अर्थाने ते समाजसुधारक होते.”

“लोकसभेचे सभापती नीलम संजीव रेड्डी म्हणाले, “भारतीय घटनेचे डॉ. आंबेडकर प्रमुख शिल्पकार होते. पिढ्यान्पिढ्या त्यांच्या या भव्य पुतळ्यापासून स्फूर्ती घेतील.”

अनावरणापूर्वी श्रीलंकेच्या बौद्ध भिक्खूंनी आणि मध्यप्रदेश सांची येथील भिक्खूंनी यशवंतराव आंबेडकर, दादासाहेब गायकवाड व इतर नवबौद्धांना’ पंचशील दीक्षा दिली. या ऐतिहासिक सोहळ्याला भारताचे उपराष्ट्रपती डॉ. जाकीर हुसेन, उपपंतप्रधान मोरारजीभाई देसाई आणि इतर गणमान्य नेते आवर्जून उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महत्त्वपूर्ण लेखांचे उतारे महाराष्ट्र माहिती केंद्रातर्फे प्रसिद्ध करण्यात आले होते. मा. बर्वे यांनी लिहिलेला एक गौरवपर लेखही या स्मरणिकेत समाविष्ट करण्यात आला होता.