इतिहास

नालंदा बौद्ध विश्वविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अशी कठीण परीक्षा द्यावी लागत होती

नालंदा विश्वविद्यालयाची प्रवेश परीक्षा अत्यंत कडक होती. ह्यु-एन-त्सँग म्हणतो, “प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने जुन्या आणि नव्या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला असला पाहिजे. “या ठिकाणी काही विद्वानांचे म्हणणे आहे की जुन्या आणि नव्या ग्रंथांचा म्हणजे सांख्य, वैशेषिक, न्याय, इत्यादी निरनिराळ्या जुन्या ग्रंथांचा आणि महायानाच्या आणि स्थविरवादाच्या ग्रंथांचा म्हणजे नव्या ग्रंथांचा. अशा प्रकारे नालंदा बौद्ध विश्वविद्यालयात प्रवेश घेण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना या विषयाचे ज्ञान असणे आवश्यक होते.

पण ह्यु-एन-त्सँगचा चरित्रकार ढू-लि म्हणतो, ‘नालंदा येथील विद्यार्थी महायानाचा आणि स्थविरवादाच्या १८ पंथांतील ग्रंथांचा सुद्धा अभ्यास करीत असत. सांकलियाच्या म्हणण्याप्रमाणे जे परदेशी विद्यार्थी नालंदा विश्वविद्यालयात आपला अभ्यास पूर्ण करण्याच्या इच्छेने येत असत त्यांच्यासाठी तेथील प्रवेश परीक्षा अत्यंत कडक होती. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की नालंदा हे बौद्ध शिक्षणाचे विश्वविद्यालय होते.

त्याठिकाणी हू-लि याने म्हटल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना निरनिराळ्या बौद्धपंथांचे शिक्षण दिले जात असे. ‘नालंदा येथील प्रवेश परीक्षा ही मौखिक स्वरूपाची असावी. तिचे स्वरूप अलिकडच्या ‘इन्टरव्ह्यू’ प्रमाणे असावे. प्रवेश परीक्षा घेणाऱ्यांना ‘द्वारपंडित’ असे म्हटले जाई. प्रवेश परीक्षा घेणारे हे द्वारपंडित स्वत: विद्वान होते. वादविवादात विशेष ज्ञान असलेले , धर्मातील वादग्रस्त मुद्यांचा विशेष अभ्यास केलेले हे द्वारपंडित प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याची पात्रता तपासून पाहण्यासाठी नेहमीच अवघड प्रश्न विचारण्यास तयार असत. हे पंडित विश्वविद्यालयाचे दार प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी सहजा सहजी उघडत नसत.

ह्यु-एन-त्सँगच्या म्हणण्याप्रमाणे प्रवेश परीक्षा देणाऱ्या दहापैकी फक्त दोन किंवा तीनच त्या प्रवेशपरीक्षेत उत्तीर्ण होत असत. नालंदा विश्वविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांपैकी प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण न झाल्यामुळे बऱ्याच जणांना विश्वविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. ज्यांना जुन्या आणि नव्या शिक्षणाचे चांगले ज्ञान होते. ते प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांना प्रवेश मिळत असे. विश्वविद्यालयाचा शिक्षणाचा दर्जा ( स्टँडर्ड ) टिकविण्यासाठी अशी कडक प्रवेश परीक्षा असणे आवश्यक होते.

संदर्भ: बौद्ध शिक्षण पद्धती
मा.श.मोरे(पृष्ठ क्रमांक१४०-१४१)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *