बुद्ध तत्वज्ञान

बौद्ध संस्कृतीतील व्यक्तीचे आचरण कसे असावे?

मुलांचे कर्तव्य – बौद्ध संस्कृतीत मुलाने आई वडिलांशी कसे वागावे याबद्दल सिगालोवाद सुत्तात भगवान बुद्धांनी सांगितले आहे की, (मुलाने असे समजणे की,) मला त्यांनी पोसले आहे तर मी त्यांचे पोषण करीन. त्यांचे काम करीन, कुळाचार चालू ठेवीन, त्यांच्या संपत्तीचा वाटेकरी होईन व ते मरण पावल्यावर जलदान विधी करेन’.

आई वडीलांचे मुलांवरील प्रेम – सिगालोवाद सुत्तात आईवडील पाच प्रकारांनी पुत्रावर अनुग्रह करतात असे म्हटले आहे. ते त्याला पाप कर्मापासून निवृत्त करतात; कल्याणकारक मार्गास लावतात; कला शिकवितात; योग्य स्त्रीशी विवाह करून देतात व योग्य वेळी अपली मालमत्ता त्याच्या स्वाधीन करतात. अशा त-हेने ढोबळ मानाने मुलांची जन्मदात्यांच्या विषयीची कर्तव्ये आणि जन्मदात्यांचे मुलाविषयीचे प्रेम आणि कर्तव्ये या सुत्तात थोडक्यात सांगितली आहेत.

गुरू -शिष्य – शिष्याने गुरूंचा आदर सत्कार करावा; त्यांची सेवा करावी; त्यांचे म्हणणे श्रद्धापूर्वक ऐकून घ्यावे; त्यांची कामे करावीत आणि आदरपूर्वक शिकून घ्यावे. अशा त-हेने शिष्याने गुरूशी वर्तन करावे. गुरू पाच प्रकारांनी शिष्यावर अनुग्रह करतात. ते शिष्याला चांगले आचरण शिकवितात; चांगल्या रीतीने कलाकौशल्य शिकवितात; सर्व ज्ञान उत्तम रीतीने देतात; आपल्या आप्तमित्रात त्याची स्तुती करतात व तो कोठेही गेला तरी त्याचे रक्षण करतात.

पती -पत्नी- पतीने पत्नीला मान दिला पाहिजे; तिचा अपमान नाही केला पाहिजे; व्यभिचार नाही केला पाहिजे; ऐश्वर्य देऊन व अलंकार देऊन तिला सुखाने ठेवले पाहिजे. पत्नीने आपली कामे चांगल्या प्रकारे करावीत; नोकर चाकरांना संभाळावे; पतिव्रता राहणे; संपत्तीचे रक्षण करणे; सर्व कृत्यात उद्योगी आणि दक्ष राहणे, या गोष्टी थोडक्यात पती पत्नी विषयी सिगालोवाद सुत्तात सांगितल्या आहेत.

आप्त मित्र – कुलपुत्राने आप्तमित्रांना दान ( भेट ) द्यावे; त्यांच्याशी गोड बोलावे; त्यांचे काम करावे; आपणासारखेच त्यांना मानावे व त्यांच्याशी भांडू नये. अशा प्रकारे कुलपुत्राने आपल्या आप्तमित्रांशी वागावे. त्याचे आप्तमित्र सुद्धा तो बेसावध असता, त्याच्यावर एकाएकी जर काही संकट आले तर त्यावेळी ते त्याचे रक्षण करतात. अशा प्रसंगी ते त्याच्या संपत्तीचेही रक्षण करतात; संकटामुळे तो घाबरून गेला असल्यास ते त्याला धीर देतात; संकट आले तरी ते त्याला सोडत नाहीत आणि त्याच्या संततीवर सुद्धा ते उपकार करतात.

मालक – सेवक– मालकाने सेवकाचे सामर्थ्य पाहून त्याला काम द्यावे; त्याला योग्य वेतन द्यावे; आजारी पडला तर त्याची देखभाल करावी; त्याला वारंवार उत्तम भोजन द्यावे; आणि चांगल्या कामाकरिता त्यांना बक्षीस द्यावे. सेवक मालक उठण्यापूर्वी उठत असतो; मालक निजल्यानंतर निजत असतो; मालकाच्या मालाची चोरी करीत नाही; चांगल्या त-हेने काम करीत असतो आणि मालकाची सर्वत्र कीर्ती पसरवीत असतो.