ब्लॉग

भीमजयंतीवर कोरोना व्हायरसचे सावट….आता जयंती साजरी कशी करायची?

सर्वांना जयभीम, नमो बुध्दाय…

जगभरात कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. आता राज्यात सुद्धा काही कोरोनाचे संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र सर्वांनी काळजी घ्यावी. राज्य सरकार सुद्धा कोरोना संसर्ग झालेल्या लोकांची आवश्यक ती काळजी घेत आहे. अफवांना बळी पडू नका!

भीमजयंती साजरी कशी करणार?

बाबासाहेबांनी आपल्याला सर्वात मोठा संदेश दिलाय तो म्हणजे ‘प्रथम भारतीय आणि नंतरही भारतीय’ या संदेशानुसार प्रत्येकाने सर्वात प्रथम आपल्या देशाचा विचार करणे गरजेचे आहे. आज कोरोनामुळे सर्वजण चिंतेत आहेत..या संकटावर आपण लवकरच मात करूच…पण त्यासाठी खाली दिलेला संदेश महत्वाचा आहे.

दरवर्षी प्रमाणे देशभरासह राज्यात महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची तयारी जोरात सुरु झाली आहे. माणसाला माणूस जगण्याचा अधिकार दिला..त्यासोबतच इथल्याच मातीतला विज्ञानवादी बुद्धधम्म देणाऱ्या महामानवाची जयंती उत्सव म्हणजे महाराष्ट्रातील बौद्धांसाठी (१४ एप्रिल) भीमजयंती सर्वात मोठा सण/आनंदोत्सव असतो.

एप्रिल महिना जसजसा जवळ येतो बौद्धांच्या घराघरात भीम जयंतीची चर्चा सुरु असते. दरवर्षी मार्चपासून जयंतीची तयारी मोठ्या उत्साहात सुरु होते. यंदा मात्र कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातल्याने त्याचे सावट जयंतीवर दिसत आहे. त्यात महाराष्ट्र कोरोनाने संसर्ग झालेले रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सर्वत्र यावर्षी जयंती कशी साजरी करायची? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

१४ एप्रिलला जयंती असून अजून महिनाभर आपल्याकडे आहे. त्यात सरकार हा कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व पातळीवर कार्यरत आहे. तर तिकडे चीनमध्ये कोरोना आटोक्यात आला आहे. विशेष काळजी घेतली तर आपण सर्वजण कोरोनावर मात करू…भारतातूनही लवकरच कोरोना हद्दपार होईल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी गर्दीच्या ठिकाणी न जाणे किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजन न करणे सर्वांच्या हिताचे असणार आहे.

१४ एप्रिलनंतर असेही महिनाभर भीमजयंतीचे कार्यक्रम राज्यभरात होत असतात. सोलापूरला १४ एप्रिलला जयंती न होता आठवड्यानंतर येणाऱ्या रविवारी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तसेच ग्रामीण भागात वेगवेगळ्या तारखेला भीमजयंती साजरी केली जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून आणि प्रशासनाची परवानगी घेऊन आपण मोठ्या उत्साहात जयंती साजरी करू शकतो. १४ एप्रिललाच जयंती साजरी हा अट्टहास नको…परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा तसेच प्रशासनाला सहकार्य करावे.

आपलं आणि समाजाच्या आरोग्याची काळजी घेणं भीम जयंती मंडळाचे कर्तव्य आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी सर्व जयंती मंडळांनी वर दिलेल्या संकल्पनेवर योग्य विचार करून जयंती करण्याचा विचार करावा.

-धम्मचक्र टीम
जय भीम..नमो बुध्दाय..जय संविधान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *