बुद्ध तत्वज्ञान

दुष्ट मनुष्य कसा ओळखावयाचा? भगवंतांनी भिक्खूना दिलेले प्रवचन वाचा!

एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूना खालील प्रमाणे प्रवचन दिले.

‘भिक्खूनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखावयाचा हे तुम्हांस माहीत आहे काय? ‘भिक्खूनी’ नाही’, म्हणताच भगवंत बोलले, ‘तर मग मीच तुम्हांला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो. ‘दुष्ट मनुष्य न विचारताच दुस-याचे दोष दाखविता आणि त्याला दुसऱ्या बद्दल विचारले तर मग बघायलाच नको, तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो.

जो मनुष्य विचारले असता दुस-याचे सद्गुण दाखवीत नाही, पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुस-याचे गुण सांगतो. ‘तो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघड करीत नाही, न विचारता तर बोलायलाच नको. वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो परंतु त्याचा तपशील लपवितो असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय.

‘भिक्खूहो, असाही मनुष्य असतो की, जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो. विचारल्यावर तर सांगायलाच नको. तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाट वर्णन करीत असतो. भिक्खूनो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा.’

संदर्भ: भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
लेखक:डॉ.भीमराव रामजी आंबेडकर