आंबेडकर Live

माणूस हा जन्मत: मोठा नसतो, मोठेपण प्राप्त करावे लागते

माणसाचा जन्म त्याच्या हाती नसतो. कूळ, वंश, जात, धर्म हे त्याला जन्मतः चिकटतात. यातून त्याची सुटका नसते. परंतु कर्तृत्व मात्र त्याच्या हातात असते. हे कर्तृत्व माणसाला एकतर अपयशाच्या गर्तेत लोटते अथवा कीर्तिमंदिराच्या कळसाचे भाग्य प्रदान करते. जगातील महापुरुषांची चरित्रे वाचताना ही बाब आपल्या लक्षात येते की कोणीही माणूस हा जन्मत: मोठा नसतो. मोठेपण प्राप्त करावे लागते, तेही जीवनातील त्याग व श्रमाचे फार मोल देऊन.

जगातील दोन बलाढ्य देश-अमेरिका व रशिया या दोन्ही देशांचे प्रमुख शिल्पकार म्हणून अनुक्रमे प्रेसिडेंट अब्राहम लिंकन व स्टालिन यांचा नामोल्लेख करावा लागेल. हे दोन्ही महापुरुष सामान्य कुटुंबात जन्माला आले. स्टालिन तर एका गरीब चांभार कुटुंबात जन्मास आलेला. लिंकनदेखील मळ्यात काम करणा-या एका अनौरस मातेचा वारसा घेऊन आलेला. परंतु या दोन्ही व्यक्तींच्या विकासात सामाजिक गुलामगिरीचा अडसर आलेला नव्हता.

बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य समजल्या गेलेल्या महार जातीत जन्मास आले. लिंकन आणि स्टालिनप्रमाणे त्यांना सामाजिक वातावरण अनुकूल नव्हते. तरीही त्यांनी या देशाच्या जनजीवनात जी क्रांती घडवून आणली ती अद्वितीय म्हणावी लागेल, अब्राहम लिंकनने उत्तर व दक्षिण राज्यांना एकत्र आणून अमेरिकेतील काळ्या- गो-यांचा भेद प्रथमत: नष्ट केला व अमेरिकेत लोकशाही स्वरूपाच्या राजवटीचा पाया घातला.

स्टालिनने या उलट व्यक्ति स्वातंत्र्याचा संकोच करून संपूर्ण राज्य समाजसत्तावादी अर्थव्यवस्थेच्या कक्षेत आणले. डॉ.आंबेडकरांनी लोकशाही आणि समाजवाद यांचा समन्वय साधण्याचे स्वप्न पाहिले, हजारो वर्षे धर्माने मान्य केलेली अस्पृश्यता कायद्याने नष्ट करविली, या देशातील माणसामाणसात निर्माण झालेले भेद नष्ट करणाच्या संविधानाची या देशाला देणगी देऊन अडीच हजार वर्षांनंतर प्रथमच लोकशाही मूल्यांचा पाया घातला. अशा अभूतपूर्व व्यक्तिमत्त्वाच्या डॉ आंबेडकरांचे जीवन जितके रोमहर्षक व संघर्षमय तितकेच उद्बोधक आहे.

संदर्भ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर (लेखक- वसंत मुन)