आंबेडकर Live

आम्ही महार असतो तर – आचार्य प्र.के.अत्रे

हा प्रश्न गेले कित्येक दिवस आम्ही आमच्या मनाला विचारीत आहोत. गेल्या महिन्यात नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दोन लाख महार यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. पुढल्या महिन्याच्या सोळा तारखेला मुंबई येथे दोन-चार लाख महारांना बाबासाहेब बुद्धधर्माची दीक्षा देणार आहेत. भगवान बुद्धाचा धर्म स्वीकारण्याची प्रचंड लाट या देशातील अस्पृश्य समाजामध्ये उटलेली आहे. बुद्धधर्मी झालेल्या महारांच्या अभिनंदनाच्या दोन-तीन सभांमध्ये आम्ही हजर होतो. तेथले चैतन्याचे आणि हर्षाचे वातावरण आम्ही डोळ्यांनी पाहिले आहे. त्यांच्या भावनांचा आवेग आम्ही बघितला आहे. त्याच वेळी आमच्या मनात हा प्रश्न उद्भवला की, आम्ही स्वतः महार असतो तर काय केले असते?

भारतामधील लक्षावधी लोक बुद्धधर्माचा स्वीकार आज करीत आहेत ही काय सामान्य घटना आहे? शतकाशतकांत न घडलेली ही एक महान ऐतिहासिक घटना आहे, पण एवढी क्रांतिकारक गोष्ट घडत असताना त्याची पाहून देशातल्या हिंदू समाजाला काय वाटते आहे? काही नाही. अक्षरशः काही लक्षावधी अस्पृश्य बौद्ध झाले ह्याचा हिंदू समाजाला केवढा धक्का बसायला हवा होता. काश्मिरापासून तो कन्याकुमारीपर्यंत निषेधाच्या वा शोकाच्या म्हणा, प्रचंड सभा भरवायला हव्या होत्या. हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी देशात ठिकठिकाणी मठ स्थापून बसलेल्या शंकराचार्यांनी भराभर पत्रके काढून ह्या घटनेबाबत समाजाचे मार्गदर्शन करावयाला हवे होते.

हिंदू समाजाच्या पुढाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे शिष्ट मंडळे घेऊन जावयाला हवे होते, पण असे काहीही घडलेले नाही. ह्याचा अर्थ हाच नव्हे काय की, हिंदू धर्मातून कोणी केवढ्याही संख्येने बाहेर पडले तरी बाकीच्या हिंदू समाजाला त्याबद्दल काहीही वाटत नाही. तो जणू काही असे म्हणत असतो ह्या लोकांना की, ‘जा, हवे तितके जा, आमच्या धर्मातून जा, आमच्या धर्माचे आणि समाजाचे तुमच्या जाण्याने काडीइतके सुद्धा नुकसान होणार नाही. ‘गेली पाच हजार वर्षे परधर्मात जाणाऱ्या सहस्त्रावधी हिंदूंच्याबद्दल बाकीच्या हिंदू समाजाची हीच बेफिकीरीची आणि बेपर्वाईची वृत्ती आहे. हिंदू धर्मात बाहेरून कोणी येण्याचा मुळी प्रश्नच उत्पन्न होत नाही. जो उठतो तो या धर्मांतून बाहेर पडतो. ह्या गोष्टीचा विचार करणे जरूर आहे, त्यावर उपाय शोधून काढणे आवश्यक आहे असे हिंदूधर्मीयांना किंवा हिंदू समाजाला मुळी वाटतच नाही.

आंबेडकरांनी आणि त्यांच्या लक्षावधी अनुयायांनी बुद्धर्धमाचा स्वीकार केला ह्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत नाही आणि वाईटही वाटत नाही. उलट, आनंद वाटतो. कोणी म्हणेल की तुम्ही हिंदू धर्माचे शत्रू आहात. त्याला आम्ही उत्तर देऊ की, आजचा प्रत्येक हिंदू हा हिंदू धर्माचा शत्रूच आहे. आंबेडकरांनी आणि त्यांच्या लक्षावधी महारांनी ‘धर्मातर’ केले हा शब्दप्रयोग आम्हाला पसंत नाही. त्यांनी ‘धर्मस्वीकार केला असेच आम्ही म्हणू , पाच हजार वर्षांत ह्या दुर्दैवी लोकांना कोणी धर्मच मुळी दिलेला किंवा शिकवलेला नाही. अस्पृश्य समाज हा हिंदूधर्मीय आहे ही गोष्टच मुळी आम्हाला मान्य नाही.

आम्ही त्यांना धर्मापासून नेहमीच दूर ठेवले आहे. म्हणून त्यांनी बुद्धधर्म स्वीकारला. ह्याबद्दल शोक करण्याचा हिंदूमात्राला अधिकार नाही. बुद्धधर्म हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे अशी मखलाशी आमच्यातले काही दीडशहाणे करतात. तो त्यांचा मत्सर आणि घमेंडखोरपणा आहे. कोणी म्हणतात, बुद्ध होऊन ह्यांची अस्पृश्यता जाणार नाही . कोणी म्हणतात, बुद्ध होऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार नाही. असे म्हणणाऱ्या लोकांना बुद्धधर्म स्वीकारू पाहणाऱ्या अस्पृश्यांची भावना मुळी कळलीच नाही. बौद्ध झाल्याने हिंदू लोक आपल्याला अस्पृश्य मानणार नाहीत किंवा आपली आर्थिक स्थिती सुधारणार नाही ही गोष्ट काय आंबेडकरांना समजत नाही? आंबेडकरांना त्याची बिलकूल पर्वा नाही. उलट, झगडून मिळविलेल्या आपल्या राजकीय हक्कांवर पाणी सोडायलासुद्धा ते तयार झाले आहेत.

ह्याचे कारण धर्माला आणि संस्कृतीला हजारो वर्षे आचवलेल्या कोट्यावधी अस्पृश्यांना न्यायावर आणि समतेवर आधारलेल्या एका महान धर्माची, तत्त्वज्ञानाची आणि संस्कृतीची दीक्षा देण्याची आंबेडकरांना तळमळ लागलेली आहे. बुद्धधर्माच्या दीक्षेतील आचारांचे जर स्पृश्य समाज काटेकोरपणे पालन करील तर एका पिढीच्या आत ह्या सर्व समाजाची बौद्धिक आणि नैतिक उंची सर्वसामान्य हिंदू समाजापेक्षाही वाढल्यावाचून राहणार नाही. बुद्धधर्माचा स्वीकार हा अस्पृश्य समाजाचा महान प्रयत्न आहे. त्यांना नावे ठेवण्याचा हिंदूंना अधिकार नाही. आम्ही महार असतो तर हेच केले असते!

संदर्भ: दलितांचे बाबा डॉ.बाबासाहेब आंबेडकर (पृष्ठ क्र.३१ ते ३३)
आचार्य प्र.के.अत्रे.
मराठा दि.२२/११/१९५६

4 Replies to “आम्ही महार असतो तर – आचार्य प्र.के.अत्रे

  1. But today no-one think like Achrya Attare.Hindu brother should come out from this mentality and know Mr. Ambedkar and what he have done for this country.

  2. कोणीही जन्म जात धर्म आणि पंथ बघुन अवतरत नाही़, त्याला परंपरागत शिकवन आपल्या अनूयायी
    वर्गा कडुन मिळाली असते, त्यामुळे माणूस मानुसकीचे सर्व काही स्रोत विसरून जाते आणि उद्धभवतो तो तिरस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *