जगभरातील बुद्ध धम्म

शुद्ध स्वरुपातील धम्म पहावयाचा असेल तर म्यानमार देशाला आवश्य भेट द्या!

बुद्ध तत्वज्ञानाचा जगभर प्रभाव वाढत असून सुशिक्षित माणसाला अंधश्रद्धा व काल्पनिक देवी-देवता आणि त्यांच्या अतिरंजित कहाण्यांपासून सुटका हवी आहे. विज्ञान व नैसर्गिक नियमांना धरून असलेला अध्यात्मिक संदेश, उपदेश त्यांना मनशांतीसाठी हवा आहे. यामुळे बुद्धांच्या तत्वज्ञानाकडे मोठ्याप्रमाणात मानवजात आकर्षिली जात असून अनेक धर्मपंडितांच्या पायाखालील वाळू सरकली आहे.

या पहा, अभ्यास करा, अनुभवा आणि पटत असेल तर स्वीकारा हे बुद्ध तत्वज्ञान सर्व प्रेषितांपेक्षा त्यांना मोलाचे वाटत आहे. यामुळे बुद्धाबद्दल कुतूहल वाढून जगभर बौद्ध धम्माची पुरातन स्थळे बघण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत आहे. पाकिस्तानसुद्धा बौद्ध पुरातन स्थळांसाठी येत असलेल्या पर्यटकांमुळे भाबांवला आहे. श्रीलंका, म्यानमार, भारत, थायलंड, कंबोडिया, लाओस, कोरिया, जपान, चीन येथे युरोपियन पर्यटक जात आहेत. महाराष्ट्रातील अनेक बौद्ध बांधव सुद्धा श्रीलंकेला भेट देत आहेत.

ऑंग सॅन सु कयी

परंतु तळागाळात रुजलेला शुद्ध स्वरुपातील धम्म पहावयाचा असेल तर म्यानमार देशाला (ब्रम्हदेश) आवश्य भेट द्यावी. अनेक वर्षे हा देश लष्करशहांच्या पडद्याआड होता. पण आता एकेकाळची राजबंदिनी ऑगं सान स्यूची यांच्या नेतृत्वाखाली हा गरीब देश विकासाकडे वाटचाल करीत आहे. इथे सर्व व्यवहारांवर धम्माचा प्रभाव आढळतो. येथील विहार, प्यागोडे, बौद्ध मठ तुम्हाला नक्कीच भुरळ घालतात. ठिकठिकाणी होणारे भिक्खूंचे दर्शन , खेड्यापाड्यात पसरलेले प्यागोडे, शांत सुंदर विहार व तेथील टापटीपपणा, इरावती नदीचे विस्तीर्ण पात्र आणि निसर्गरम्य वातावरण वेगळीच अनुभूती देतात. बगान येथील पॅगोडे आणि मंडाले येथील महामुनी विहार व कुथोडाव विहार तर कायम स्मरणात राहतील.

बगान येथील पॅगोडे

इथे प्रत्येक कुटुंबातील मुलाला धम्माचे शिक्षण घ्यावे लागते. वयाच्या १८व्या वर्षांनंतर त्याची इच्छा असेल तर परत कुटुंबात येऊन तो शेती व्यवसाय करू शकतो. अन्यथा चिवर पांघरूण कायमचा भिक्खू होतो. म्हणून हा देश आज ९५% बौद्ध म्हणून नावारूपास आहे. गुरुशिष्य परंपरेने जपणूक केलेली शुद्ध स्वरूपातील विपश्यना ध्यानसाधना सुद्धा इथे शिकविली जाते. बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यावर त्यांना तप्पसू आणि भल्लीक या म्यानमारमधील व्यापाऱ्यांनी प्रथम भोजनदान देऊन महापुण्य अर्जित केले होते. माझे त्यांना नम्र वंदन. त्यांनी उभारलेल्या श्वेडेगॉन प्यागोडयामुळेच धम्म तेथे बहरला आहे, हे नक्की.

संजय सावंत, नवी मुंबई

2 Replies to “शुद्ध स्वरुपातील धम्म पहावयाचा असेल तर म्यानमार देशाला आवश्य भेट द्या!

Comments are closed.