इतिहास

बौद्ध ग्रंथांमध्ये महान वैद्य ‘जीवक’ यांच्या वैद्यकीय ज्ञानाची व्यापक स्तुती केली जाते

आचार्य जीवक हे बुद्धाच्या समकालीन प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य होते. बर्‍याच बौद्ध ग्रंथांमध्ये त्याच्या वैद्यकीय ज्ञानाची व्यापक स्तुती केली जाते. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जीवंत सापडले म्हणून त्यांचे नाव ‘जीवक’ ठेवण्यात आले होते. जीवक यांच्या जन्मापासून ते महान वैद्य असा प्रवास थोडक्यात जाणून घेऊ…

भगवान बुद्धांच्या काळात वैशाली एक अत्यंत संपन्न गणराज्य होते. तेथे गणिका आम्रपाली अभिरूप, परम रूपवती, नृत्य, गीत, गायन आणि वादनात प्रवीण होती. राजाला एका प्रसिद्ध श्रेष्टीने राजा बिंबीसाराला सुचविले की राजगृहात सुद्धा वैशाली सारखी एखादी गणिका असावी. शोध घेतल्यानंतर सालवती नावाची रूपवान मुलगी सापडली.

सालवती ही वैशालीतील आम्रपाली सारखीच सौंदर्यवती होती. काही दिवसात ती नृत्य कलांत निपुण होत ती राजा बिंबीसाराच्या राज्यातील राजगृहातील नृत्यांगना झाली. ती कुमारी असतांना गर्भवती राहिली. आपल्या बदनामीच्या भीतीने तीने नवजात बाळाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकून दिले. राजपुत्र अजातशत्रूला दिसल्यानंतर त्यांनी त्या बाळास राजवाड्यात आणले. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जीवंत सापडले म्हणून त्यांचे नाव ‘जीवक’ पडले. राजवाड्यातच त्याचे पालनपोषण झाले.

जीवक मोठा झाल्यावर त्याला वाटले राजवाड्यात राहण्यासाठी एखादे शिल्प असल्याशिवाय जगणे कठीण आहे. म्हणून त्याने काही तरी शिल्प शिकण्याचे ठरविले, त्याकाळी तक्षशिलात एक प्रख्यात वैद्य राहत होते. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. एकेदिवशी जीवक कोणालाही न विचारता तक्षशिला येथे पोहचला. त्यानंतर जीवक ने ७ वर्षेपर्यंत तक्षशिलेत वैद्यक शास्त्राचा अभ्यास केला.

सतत सात वर्ष अभ्यास केल्यानंतर जीवकला असे वाटले की मी खूप अभ्यास करत आहे. मी जो अभ्यास करत आहे त्याचा अंत माहित नव्हता…म्हणून जीवक आपल्या आचार्य वैद्याकडे जाऊन मी सात वर्षांपासून अभ्यास करतोय…केंव्हा या शिल्पाचा अंत माहित होईल.

आचार्य म्हणाले…’जीवक, कुदळ घेऊन जा आणि तक्षशिलाच्या सर्व सर्व दिशांनी फिरून जे (अभैषज्य) औषधासाठी उपयुक्त नसलेले ते पहा आणि त्याला घेऊन ये’ मात्र जीवकला तक्षशिलेच्या सर्व दिशेला एकही अभैषज्य काहीही मिळाले नाही. आचार्य जवळ जीवकाने तसे सांगितले, आचार्य म्हणाले जीवक आता तू आता शिकला आहेस, ते तुझ्या जीविकेसाठी पुरेसे आहे’

अभ्यास पूर्ण करुन जीवक तक्षशिलेतून राजगृहाला परत येण्यास निघाले. साकेत जवळ आले असता त्यांच्याजवळील पैसे संपले. पुढील प्रवासासाठी पैसे जमवावे या उद्देशाने त्यांनी साकेतमध्ये कोणी आजारी आहे काय याची चौकशी केली. साकेत येथील नगरश्रेष्ठीची सेठानी सात वर्षांपासून डोके दु:खीच्या आजाराने पीडीत होती. अनेक वैद्यानी उपचार करूनही तिला आराम झाला नव्हता.

जीवकने आपण तिचा आजार बरा करू शकतो असे सांगितले. मात्र कंजुष सेठानीचा त्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा जीवक म्हणाले की. “आजार बरा झाल्यावरच पैसे द्यावे. “सठानी तयार झाल्यावर जीवकने तिचा आजार ओळखून औषध दिले. ते औषध नाकातून ओढून तोंडातून बाहेर काढण्यास सांगितले. ती पूर्णत : निरोगी झाली. तेव्हा तिने जीवकास मोबदला देऊन सत्कार केला.

मगध नरेश बिंबीसार भंगदर रोगाने त्रस्त होते. जीवकाने त्यांचा आजार पूर्णपणे बरा केला, तेव्हा त्यांनी जीवकास भरपूर अलंकार दिले. परंतु ते न स्विकारता फक्त माझी शुश्रुषा तेवढी लक्षात ठेवावी एवढेच जीवकाने म्हटले. बिंबीसाराने जीवकाच्या वैद्यकीय ज्ञानाने प्रभावीत होवून तथागत बुद्धाच्या सेवेसाठी जीवकाला नियुक्त केले. जीवकांनी तथागत बुद्धांची व त्यांच्या भिक्षु संघाची आरोग्य विषय काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली व जीवकाने ती सहर्ष स्विकारली. मगधराजा बिंबीसाराने जीवकास राजवैद्य म्हणून घोषित केले होते.

जीवकाने राजगृहातील नगरश्रेष्टींचे डोकेदुखी त्याच्या डोक्याचे ऑपरेशन करून बरी केली. जीवकाने केलेल्या अनेक ऑपरेशनबद्दलची माहिती महावग्गामध्ये आहे. यावरून लक्षात येते की त्यावेळी जीवकाकडे भूल देण्याची कला अवगत केली होती.

एकदा भगवान बुद्धांचे शरीर दोषग्रस्त झाले होते. भगवान बुद्ध जुलाबाचे औषध घेऊ इच्छित होते. त्याप्रमाणे जीवकाकडे निरोप पाठवला. जीवकाने प्रथम भगवानांचे शरीर स्निग्ध करण्यास सांगितले. नंतर जीवकाने भगवानांना जुलाबाचे औषध दिले. भगवान बरे झाले.

पाली ग्रंथात अनेक वेळा जीवकाने भगवान बुद्धांच्या आजारांवर उपचार केल्याचे वर्णन केले आहे. तसेच जेव्हा देवदत्तने भगवान बुद्धांना जीवे मारण्यासाठी उंच भागावरून मोठा दगड ढकलला होता, त्यात एक छोटा तुकडा बुद्धाच्या पायावर पडून रक्तस्त्राव झाला होता. त्यावेळी जीवकाने त्यांच्यावर उपचार केले होते. याबाबत तिबेटियन ग्रंथात माहिती दिली आहे.

जीवकाने अंवती राजा प्रद्योत हा पांडुरोगाने त्रस्त होता याला सुद्धा बरे केले होते. अवंती राजा हा तापट स्वभावाचा होता परंतु जीवकाच्या उदार सेवेमुळे राजा प्रद्योतच्या तापट स्वभावात बदल झाला आणि शेवटी तथागताला शरण गेला व बौद्ध झाला. वरील जीवकाच्या वैद्यक कथावरून त्याकाळात सुद्धा हे शास्त्र किती प्रगत होते याची कल्पना करता येईल.

2 Replies to “बौद्ध ग्रंथांमध्ये महान वैद्य ‘जीवक’ यांच्या वैद्यकीय ज्ञानाची व्यापक स्तुती केली जाते

  1. A Heart full thanks to those who created such a Informative & beautiful website Dhammachakra on Lord Buddha. It Focus on Glorious history of Lord Buddha & Buddhism. I would like to suggest to add one more thing over here that if you can able to create one another small section on bibliographical references, then this website will become complete study material for all those peoples who want to study on Buddhism or who want to know more about Buddha and his Dhamma. There are many old and new rare books written by many Indian and Foreign author and Writers, if you Create new section of this Books Index with cover photos, price, and where to available that book then it will became really very help full to all the Buddhist Scholars for their studies on Buddhism.

Comments are closed.