ब्लॉग

पाश्चिमात्य देशांत भगवान बुद्धांच्या थेअरी आणि प्रॅक्टिकलचा वापर शालेय अभ्यासक्रमात

पाश्चात्य देशातील शाळेमध्ये ध्यानधारणेचा विषय शिकविण्यात येत असून अर्धा एक तास श्वासोच्छ्वासावर आधारीत ध्यानधारणा कशी करावी याचे धडे दिले जातात. याचा मुलांवर खूपच चांगला परिणाम होत असून मुलामधली आक्रमकता, चचंलपणा, हटवादीपणा निश्चितच कमी होत आहे.

कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने या बाबतीत संशोधन केले असून त्यांनी अहवालात म्हटले आहे की ध्यानधारणेमुळे मुलांमधील काम करण्याचा उत्साह वाढला असून अभ्यास लक्षपूर्वक करणे, वर्गातील विविध स्पर्धेत भाग घेणे या मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मायकेल ब्राऊन बरगेट ( शाळा मानसोपचार तज्ञ) यांनी सांगितले की मुलांमधील आत्मविश्वास वाढला आहे. मुलांमधील नैराश्य, दुःख यामध्ये लक्षणीय घट झाली आहे. अमेरिकेत बाल्टिमोर, मेरीलॅण्ड येथे गुन्ह्याचे प्रमाण खूप आहे. तेथील शाळेतील मुलांमध्ये असुरक्षितता, कौटुंबिक भांडणे यामुळे ताण वाढत होता. तो ध्यानधारणेंने बराच कमी झाला आहे. एकाग्रता व ध्यानधारणेंमूळे मुलांमध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे.

बुद्धाने शिलतत्वे पाळून समाधी व प्रज्ञा क्षेत्रात कसे परिपूर्ण व्हावे हे सांगितले. पाश्चिमात्य देशांनी भगवान बुद्धांच्या थेअरी आणि प्रॅक्टिकल यांचा अंतर्भाव शालेय अभ्यासक्रमात लगेच केला. कारण त्याचे परिणाम तात्काळ मिळू लागले. मात्र भारतात त्याच्या उलट परिस्थिती आहे. आजच्या पिढीला नक्की कशाची आवश्यकता आहे याचा सारासार विचारच कुणी करत नाहीय.