बातम्या

नोव्हेंबरमध्ये भारतात जागतिक बौद्ध परिषद; पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार

-संजय सावंत, नवी मुंबई
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने ( Indian Council for Cultural Relation — ICCR ) मंगळवारी जाहीर केले की जागतिक बौद्ध परिषद १९-२० नोव्हेंबरच्या दरम्यान बिहारमध्ये नवं नालंदा महाविहारच्या प्रांगणात भरविली जाणार असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील सहभाग असणार आहे. या परिषदेत बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल चर्चा तसेच प्रचार-प्रसार करण्याबाबत ऊहापोह होईल. तसेच आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत बुद्धिस्ट स्टडीजसाठी ज्यांनी योगदान दिलेले आहे त्यांना पुरस्कार देखील पंतप्रधानांच्या हस्ते दिले जाणार आहेत. या परिषदेमध्ये जागतिक बौद्ध साहित्याबाबत चर्चासत्रे आणि शोधनिबंध सादरीकरण यांचे संयुक्तरित्या आयोजन नवनालंदा महाविहार आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध कॉन्फेडरेशन यांच्या विद्यमाने होणार आहे.

ICCR चे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले की भारतात नोव्हेंबरमध्ये (२०२१) जागतिक बौद्ध परिषद आयोजित केली आहे.

या परिषदेच्या दरम्यान देशांतर्गत धरमशाला, गंगटोक, सारनाथ, तेलंगणा आणि परदेशात कंबोडिया, जपान, साऊथ कोरिया आणि थायलंडमध्ये देखील बौद्ध साहित्यावर चर्चासत्रे होणार आहेत. त्यामुळे अनेकांना त्यात भाग घेता येईल. भारतीय संस्कृती परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले की ‘भारताचा मूळ गाभा हा बौद्ध तत्वज्ञानावर आधारित आहे. म्हणूनच भारतातील बौद्ध तत्वाज्ञानाचे प्राबल्य आणि त्याचा भारतावर आणि इतर देशांवर असलेला पगडा हा शैक्षणिक पद्धतीने या परिषदेत आखला जाणार आहे’.

भारताने ही परिषद आयोजित करून अनेक बौद्ध राष्ट्रांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसते. यामुळे चीन साम्राज्याला शह देण्याचा सरकारचा विचार दिसून येतो. तसेच या परिषदेमुळे बौद्ध पर्यटन वाढून परकीय चलन गंगाजळीत भर पडेल. हेतू चांगला असेल तर परिषद नक्कीच यशस्वी होईल व भारताची प्रतिमा सुधारेल.