ब्लॉग

डॉ.आंबेडकरांऐवजी ‘संविधान’ कुठल्याही पुढारलेल्या सवर्ण नेत्याने ड्राफ्ट केला असता तर…

अमेरिकेचं पाहुयात. जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतल्या तेरा वसाहतींनी ब्रिटिशांचं अधिपत्या उलथवून टाकलं. थॉमस जेफरसननं ह्या नव्या स्वतंत्र राष्ट्राचा जाहीरनामा लिहला. त्यात म्हटलं की ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल. ईश्वरानं सर्व माणसांना समान बनवलं. संविधान लिहल्या गेलं. जगाच्या पटलावर एक नवा देश म्हणून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका नावानं अस्तित्वात आला.

पण ह्यात खूप मोठा पॅराडॉक्स होता. फाऊंडिंग फादर्सच्या ‘ऑल मेन’ मध्ये पिढ्यांपिढ्या गुलामगिरी करणारे ‘निग्रो’ (शब्द वापरण्याबद्दल क्षमस्व!) नव्हते. ‘ऑल मेन’ म्हणजे फक्त आणी फक्त व्हाईट मेन. बाकी शोषणकरी व्यवस्थेमधून गुलागिरीच्या साखळदंडात अडकून पावभर ब्रेडवर आपल्या कुटुंबासह कापसाच्या मळ्यात राबणाऱ्या ब्लॅक समूहानं ह्या स्वतंत्र राष्ट्रात देखील गुलाम म्हणूनचं राहावं हीच सगळ्यांची इच्छा होती. अर्थात लिबर्टीच्या गप्पा झोडणारे फाउंडिंग फादर्स पण अपवाद नव्हते. दस्तुरखुद्द जॉर्ज वॉशिंग्टनच्या कापसाच्या मळ्यात ब्लॅक समूह गुलाम म्हणुन राबत होता ह्याचे पुरावे आहेत.

तिथून मग सुरू झालं ब्लॅक रिक्स्ट्रंक्शनचं युग. ब्लॅक समूहाने आपल्या न्याय हक्कासाठी, माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासाठी तीव्र लढे उभारले. गुलामीच्या साखळ्या तोडण्यापासून ते फर्स्ट ब्लॅक प्रेसिडेंट बराक ओबामा पर्यंतचा त्यांचा सामूहिक स्ट्रगल हा अडीचशे वर्षांचा आहे. ज्या देशाचा पायाचं इन्स्टिट्यूशन्लाइज्ड रेसिझम आणी व्हाईट प्रिव्हलेजवर उभा आहे तिथं पदोपदी ब्लॅक समूहाला लढा द्यावा लागतोय.

जेंव्हा जेंव्हा मी व्हाईट प्रिव्हलेज, सवर्ण प्रिव्हलेज, कास्ट, रेस ह्या विषयी कंम्पेरेटिव्ह स्टडी करायला जातो तेंव्हा बाबासाहेबांच्या संविधानाचं महत्व तितक्याचं तीव्रतेनं जाणवतं. हजारो वर्षांपासून शिक्षण, रोजगार, संसाधनं सोडाचं पाण्यासारख्या बेसिक गोष्टींपासून दूर ठेवत, काही विशिष्ट जात समूहांना गावकुसाबाहेर लोटून जातव्यवस्थेनं त्यांच्यावर अन्नवित अत्याचार करत आपल्या संस्कृतीचे गोडवे गायलेत. जिथं कुत्रे मांजरं खुशाल पाणी पीत असतं त्या नद्या,नाले, पाणवठ्यांवर ह्या अस्पृश्य जातींना मज्जाव होता. ह्या अघोरी व्यवस्थेचे विळखे इतके तीव्र होते.

स्वतंत्र भारतात बाबासाहेबांच्या संविधानं ह्या अस्पृश्य आणी शूद्रातीशूद्र घटकांना गावकुसाबाहेरच्या अंधारातून काढत ‘माणूस’ म्हणून मान्यता मिळवून दिली. संधीची समानता मिळवून दिली. स्वतंत्र, समता, बंधुत्व आणी न्यायाचे बाळकडू दिले. आपल्याला ना 13 अमेंडमेंट, सेग्रीगेशन, वूमन व्होटिंग तिकडच्या सारखं कधी संघर्ष करावा लागला. ही डीग्नीटी बाबासाहेबांनी इथल्या अस्पृश्य, शुद्रतिशूद्र व महिलांना मिळवून दिलीय.

मी फार जबाबदारीने म्हणतोय की डॉ. आंबेडकरांऐवजी जर घटना कुठल्याही पुढारलेल्या सवर्ण नेत्याने ड्राफ्ट केली असती तर आपला सामुहिक संघर्ष अजूनही भयंकर राहिला असता. ज्यांनी भोगलयं त्यांनाचं शोषितांचं दुःख कळतं. मग ते जॉर्ज वॉशिंग्टन असोत का गांधी असतो त्यांची फक्त वरवरची माया असेल. शोषणकारी व्यवस्था मोडीत काढून दलितशोषित जातसमूह आणी महिलांना पण संधीच्या समानते बद्दलचा हट्ट फक्त आंबेडकरचाचं होता.

संविधान देशाला अर्पण करणं ही दलित हिस्ट्रीमधलाचं नव्हे तर समग्र मानव मुक्तीच्या इतिहासातला एक प्रचंड क्रांतिकारी क्षण होता. हा क्षण तितक्याचं ताकदीनं सेलिब्रेट करायचायं. विशेषतः जेंव्हा देशात धर्मांध शक्तींची निरंकुश सत्ता फोफावत असतानाचं तर जास्तचं.

जय भीम!

गुणवंत सरपाते, चेन्नई

One Reply to “डॉ.आंबेडकरांऐवजी ‘संविधान’ कुठल्याही पुढारलेल्या सवर्ण नेत्याने ड्राफ्ट केला असता तर…

Comments are closed.