बातम्या

भारतातील सर्वात मोठी बुद्धमूर्ती बनविण्याचे काम सुरु; येत्या बुद्ध पौर्णिमेला बुद्धमूर्ती उभारली जाईल

भारतातील सर्वात मोठा रिक्लाईन बुद्ध पुतळा बनविण्याचे काम कलकत्त्यामध्ये चालू आहे. हे काम बारानगर येथील घोषपारा मैदानात नैनान बांधभ समिती तर्फे पूर्णपणे प्रगतीपथावर आहे. हा पुतळा Buddha International Welfare Mission च्या बोधगया येथील विहारात येत्या बुद्ध पौर्णिमेला बसविला जाणार आहे.

१०० फूट लांब असलेली ही बुद्धमूर्ती अनेक छोट्या वेगवेगळ्या भागात तयार केली जात आहे. बोधगया येथे तिचे भाग नेल्यावर तिची पुन्हा जोडणी केली जाईल, असे प्रसिद्ध बंगाली शिल्पकार मिन्टू पाल यांनी सांगितले. फायबरग्लास मधील ही रिक्लाईन बुद्धमूर्ती हजारो वर्षे टिकेल असा विश्वास त्यांनी पुढे व्यक्त केला.

सद्यस्थितीत भारतातील सर्वात मोठा महापरिनिर्वाण अवस्थेतील बुद्ध पुतळा हा कुशीनगर, उत्तरप्रदेश येथील महापरिनिर्वाण स्तूपात आहे. तिची लांबी २० फूट आहे. तसेच ध्यानस्थ मुद्रेतील हैदराबाद येथील हुसेनसागर तलावात उभी असलेली बुद्धमूर्ती ५८ फूट उंच आहे. सारनाथ येथील उभी असलेली बुद्धमूर्ती ८० फूट उंच आहे. त्यामुळे बोधगयेत जेव्हा ही १०० फूट लांब असलेली महापरिनिर्वाण अवस्थेतील बुद्धमूर्ती उभारली जाईल तेंव्हा भाविकांसाठी ते मोठे आकर्षण होईल.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)