इतिहास

विविध युगांची व नावांची बौद्ध साहित्यातील माहिती

नावात काय आहे असे शेक्सपियर म्हणून गेला. ते बरोबरच आहे. एक पिढी लयास गेली, दुसरी आली की अगोदरच्या पिढीतले गाजलेले नाव टिकूनच राहील याची खात्री कोण देऊ शकत नाही. नावाचा हा इतिहास पिढ्या बदलल्या की बदलतो हे काही उदाहरणांवरून दिसून येते. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी ‘कोळीवाडा’ या नावाचे स्टेशन हार्बर लाईन वर होते. आता त्याचे नाव ‘गुरु तेग बहादूर नगर’ झाले आहे. म्हणजे आताच्या नव्या पिढीला GTB हेच नाव माहित आहे. मद्रासचे चेन्नई झाले. एलफिस्टन रोड या स्टेशनचे नाव सुद्धा बदलून ‘प्रभादेवी’ केले आहे. म्हणजे आता इथून पुढची पिढी नवीन नावालाच ओळखणार.

इतिहासात डोकावून बघितले तर कितीतरी जुन्या शहरांची नावे बदलून गेली आहेत, हे ध्यानात येते. ‘पाटलीपुत्र’ या मगध राज्याच्या राजधानीचे नाव ‘पटणा’ झाले आहे. सिरीनगरचे श्रीनगर झाले आहे. गुलबर्गाचे ‘कलबुर्गी’ झाले आहे. कोचीनचे ‘कोची’ झाले तसेच मुंबादेवीचे ‘मुंबई’ झाले आहे. दोन हजार वर्षांपूर्वीची स्थळांची नावे आता पूर्ण बदलली आहेत. तसेच नावात बदल होण्याचा कालावधी काही ठिकाणी दोन हजार वर्षे तर काही ठिकाणी दोनशे वर्षे तर काही ठिकाणी वीस-पन्नास वर्षे इतका आहे.

‘संयुक्त निकाय’ या पाली ग्रंथात ‘वेपूल्ल पब्बत सुत्त’ मध्ये सुद्धा भगवान बुद्ध यांनी विविध युगांमध्ये पर्वताचे नाव काय होते, तसेच माणसाचे आयुष्यमान किती होते याचा उल्लेख केलेला आहे. एकदा ग्रधकूट पर्वतावर विहार करताना बुद्ध म्हणाले “खूप पूर्वीच्या काळी या पर्वताचे नाव पाचिनवंश होते. त्या समयी मनुष्यांना तिवर म्हणत. त्यासमयी मनुष्यांचे आयुष्यमान ४० हजार वर्षापर्यंत होते. व पर्वत चढण्यास त्यांना चार दिवस व उतरण्यास चार दिवस लागत होते. त्या समयी सम्यक सम्बुद्ध भगवान ‘कक्कूसंध’ होते व त्यांचे विधूर व सांजिक नावाचे दोन अग्रश्रावक होते. भिक्खूंनो पहा, काळाच्या ओघात पर्वताचे ते नाव लुप्त झाले. सर्व माणसे नष्ट झाली. त्या काळातील बुद्ध सुद्धा परिनिर्वाणास प्राप्त झाले. म्हणून सर्व संस्कार अनित्य आहेत, परिवर्तनशील आहेत, अध्रुव आहेत. म्हणून सर्व संस्कारापासून विरक्त राहिले पाहिजे, विमुक्त झाले पाहिजे”.

“भिक्खुंनो, त्यानंतर खूप काळाने पर्वताचे नाव वंकक होते. त्या समयी माणसांना ‘रोहितस्स’ म्हटले जात असे. त्याचे आयुष्यमान ३० हजार वर्षांचे होते. त्यासमयी मनुष्य हा पर्वत तीन दिवसात चढत व तीन दिवसात उतरत. त्याकाळी सम्यक संबुद्ध ‘कोणागमन’ हे उत्पन्न झाले होते व ‘भीय्यो’ आणि ‘सुत्तर’ नावाचे त्यांचे दोन अग्रश्रावक होते. पहा भिक्खुंनो, हे ही पर्वताचे नाव लुप्त झाले. ती सर्वच्या सर्व माणसे नष्ट झाली. ते भगवान सुद्धा परिनिर्वाणास प्राप्त झाले. म्हणून संस्कार अनित्य आहेत, अध्रुव आहेत, परिवर्तनशील आहेत. म्हणून सर्व संस्कारा पासून विरक्त राहिले पाहिजे, विमुक्त झाले पाहिजे”.

“त्यानंतर खूप काळाने पर्वताचे नाव सुपस्स होते. त्या समयी माणसांनाही सुपस्सी म्हटले जात असे. त्यांचे आयुष्यमान २० हजार वर्षाचे होते. त्याकाळी मनुष्य दोन दिवसात सुपस्स पर्वत चढत होते व दोन दिवसात उतरत होते. त्याकाळी सम्यक संबुद्ध काश्यप उत्पन्न झाले होते व तिस्स आणि भारद्वाज नावाचे दोन त्यांचे अग्रश्रावक होते. पहा भिक्खुंनो, हे ही पर्वताचे नाव लुप्त झाले. ती सर्वच्या सर्व माणसे नष्ट झाली. ते भगवान सुद्धा परिनिर्वाणास प्राप्त झालेे. म्हणून भिक्खुंनो, सर्व संस्कार अनित्य आहेत, अध्रुव आहेत. परिवर्तनशील आहेत. म्हणून सर्व संसारापासून विरक्त राहिले पाहिजे. विमुक्त झाले पाहिजे”.

“भिक्खुंनो, या समयी पर्वताचे नाव वेपुल्ल पडले आहे. ही माणसे मगधी म्हटली जात आहेत. त्यांच्या आयुष्याचे प्रमाण घटून कमी झाले आहे. १०० वर्षापेक्षा कमी तो जगत असतो. वेपुल्ल पर्वतावर तो थोड्याच वेळात चढून जातो व थोड्याच वेळात उतरतो. या समयी मीच सम्यक संबुद्ध या जगात उत्पन्न झालो आहे. आणि सारिपुत्त व मोग्गलायन हे दोन माझे अग्रश्रावक आहेत. भिक्खुंनो, एक समय असा येईल की या पर्वताचे हे ही नाव लुप्त होईल. ही माणसे सुद्धा निजधामास जातील. मीसुद्धा परिनिर्वाणाला प्राप्त होईन. म्हणून भिक्खुंनो, संस्कार अनित्य आहेत. अध्रुव आहेत. परिवर्तनशील आहेत. म्हणून सर्व संस्कारांपासून विरक्त राहिले पाहिजे. विमुक्त झाले पाहिजे”.

अशा तऱ्हेने या सुत्तात भगवान बुध्दांनी पर्वताच्या नावाचा विविध युगांमध्ये कसा बदल झाला हे सांगितले. तसेच त्या त्या युगांमधील मनुष्य जातीची माहिती दिली. त्या त्या कालावधीमधील सम्यक संबुद्धांची माहिती दिली. त्यांच्या अग्रश्रावकांची नावे सांगितली. त्यामुळे हे सुत्त विशेष वाटते.

-संजय सावंत (नवी मुंबई)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *