आंबेडकर Live

जागतिक संगीत दिवस विशेष: संगीत प्रेमी डॉ बाबासाहेब आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी परिवर्तन आणि बदलाची आमूलाग्र क्रांती केली. त्यासोबतच त्यांचं व्यक्तिमत्व हे विविधांगी आणि संपन्न व्यक्तिमत्त्व रसिक वृत्तीचं होतं. आज जागतिक संगीत दिवस असल्यामुळे बाबासाहेबांच्या संगीत प्रेमाविषयी आपण जाणून घेऊया…

संगीतामुळे जीवनात नवजीवन निर्माण होते असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. भोवतालच्या व्यापातापाच्या गर्दीतून बाहेर निघून संगीत ऐकावे असे त्यांना वाटायचे. केवळ संगीत ऐकावे एवढीच त्यांची संगीताची आवड मर्यादित नव्हती तर आपल्याला गाता आले पाहिजे, वाजविता आले पाहिजे या साठी एक संगीत शिक्षकही ठेवला होता. परंतु इच्छा असूनही ते वेळेअभावी संगीत शिकू शकले नाहीत. आपला कामाचा व्याप आणि ध्येय सांभाळताना त्यांनी आपल्या कामातही रसिकता जपली.

बाबासाहेबांना सानेगुरूजींनी संगीत शिकवले, मात्र व्होयोलिनच्या इतिहासाबाबत बाबासाहेबांनी साने गुरूजींना विचारले असता, ते उत्तर देऊ न शकल्याने बाबासाहेबांनी त्यांना व्होयोलिनचा सर्व इतिहास सांगितलं असल्याची पुस्तकात नोंद मिळते.

बाबासाहेबांना आपणास चांगले गायन वादन यावे असे त्यांना वाटे. १९३७ – ३८ च्या दरम्यान बाबासाहेबांनी गायनकला व वाद्यकला अवगत केली होती. वैद्य नावाचे गृहस्थ दादर येथील निवासस्थानी शिकविण्यासाठी येत असत. सकाळी ऑफिसला जाण्यापुर्वी बाबासाहेब वैद्य यांच्याकडून फिडल वाजवण्याचे धडे घेत असत. बाबासाहेबांनी स्वतःचे फिडल विकत घेतले होते. फिडल वादनात ते एवढे गुंग होत असत की त्यांना भेटण्यास आलेल्यांचेही त्यांना भान नसे.

बाबासाहेबांनी मुंबईत नाना व बाळ साठे या बंधूद्वयांकडून व्हायोलिनचे धडे (१९५१ ते १९५३ १९५४) घेतले होते. तेंव्हा ते पहिल्या भारतीय मंत्रीमंडळात होते. उतारवयात या महामानवाला व्हायोलिन तंतुवाद्य का शिकावे वाटले असेल? या विषयी मानसिकता अभ्यासली तर असे कळते की तंतुवाद्यातून निघालेले सूर मनुष्याला ताणतणाव कमी करण्यास मदत करतात. बाबासाहेबांना संगीताची खूप आवड होती. त्यांच्याकडे संगीताच्या एलपी रेकॉर्डचा संच होता. परदेशात नेहमी येणे जाणे असल्याने त्यांनी हा छंद जोपासला होता. बाबासाहेबांच्या अखेरच्या क्षणापर्यंत असणारा एलपी रेकॉर्डचा संच नागपुरातील शांतीवन स्मृती संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.

दरवर्षी ६ डिसेंबरला ‘भीमांजली’च्या माध्यमातून ‘महामानवाला’ आदरांजली

राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक डॉ हर्षदीप कांबळे (आयएएस) यांच्या संकल्पनेतून मागील चार वर्षांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कर्यक्रमात प्रतिभावंत जगप्रसिद्ध कलाकार आपल्या शास्त्रीय संगीताच्या सुरमय स्वप्त स्वरांतून महामानवाला आदरांजली अर्पण करतात.

डॉ.हर्षदीप कांबळे (आयएएस) यांची संकल्पना :

भारतीय शास्त्रीय संगीताद्वारे बाबासाहेबांना आदरांजली हा कार्यक्रम पहिल्यांदाच जगप्रसिद्ध कलाकारांना सोबत घेऊन डॉ. हर्षदीप कांबळे सर यांनी घडवून आणला आहे. संगीतामुळे जीवनात नवजीवन निर्माण होते असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. संगीताला जात धर्म नसतो.. तर ते लोकांच्या आंतर मनात जाऊन एक खूप चांगल्या लहरी, विचार निर्माण करतात. आणि म्हणूनच ही आदरांजली शास्त्रीय संगीताद्वारे देण्याचे डॉ. कांबळे सरांनी सुरु केले आहे. ‘भीमांजली’च्या निमित्ताने ह्या जगप्रसिद्ध कलाकारांना सुद्धा बाबासाहेब कळायला लागलेत हेही काही कमी नाही. हरिप्रसादजी चौरासिया, विश्वमोहन भट्ट ह्या सारख्या खूप नाव असलेल्या कलाकारांना एकत्रित आणून त्यांच्याकडून बाबासाहेबांना आदरांजली फक्त डॉ.हर्षदीप कांबळेच करू शकतात.