बुद्धधम्मानुसार, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, वैश्विक (सार्वत्रिक) नियमांचे आकलन आणि अंतर्दृष्टीचा (विपश्यनेचा) विकास यावर प्रज्ञा आधारित आहे.
अंतर्दष्टी (विपश्यना) म्हणजे केवळ सत्य पाहणे (जाणणे) नव्हे, तर जीवनातील असमाधानीपणापासून पूर्णपणे मुक्त होण्याच्या मार्गाचे आकलन करून घेणे होय. म्हणून, विद्यालयीन संस्था किंवा वैज्ञानिक संशोधनाच्या प्रयोगशाळा किंवा धार्मिक प्रार्थनास्थळे, जेथे लोक जाऊन पूजा-प्रार्थना करतात आणि धार्मिक विधी व कर्मकांड पार पाडत असतात, तेथे खरी प्रज्ञा शोधता येत नाही.
प्रज्ञा आपल्या मनातच आहे. जेव्हा अनुभव, समज, जाणीव (बोध) आणि शुद्धता पूर्णत्वास येते तेव्हा ही प्रज्ञा, जी सर्वोच्च पूर्णत्वाने बनलेली आहे, उत्पन्न होते आणि पाहता सुद्धा येते. ही प्रज्ञा प्राप्त करणे हेच जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे. बाह्य विश्वात (जगात) शोध करीत बसण्यापेक्षा, माणसाने आतल्या विश्वाचा कसून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला असता तर तो त्याच्या अंतिम ध्येयापर्यंत सहज पोहचू शकला असता.
मनुष्याने त्याच्या मनाला शुद्ध आणि बलवान बनवले तर त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणा-या ऐहिक (लोकीय) शक्तींवर तो मात करू शकतो. नंतर तो सुखाच्या लोकोत्तर अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो, जेथे वाईट शक्तींना काम करण्यासाठी कसलीच शक्ती उरत नाही. (म्हणजे तेथे वाईट (अकुशल) शक्ती काम करू शकत नाहीत.)