जगभरातील बुद्ध धम्म

आश्चर्य! जागा अपुरी पडत असल्याने अख्ख बुद्ध विहार तीस मीटर सरकविले

चीनमध्ये शांघाय शहराच्या मध्यभागी ‘जेड बुद्ध विहार’ अतिशय प्रसिद्ध असून तेथे दर दिवशी जवळजवळ पाच-सहा हजार लोक दर्शनार्थ येतात. त्यामुळे नेहमी ते गजबजलेले असते. मूळ घर असलेली ही वास्तू विहारासाठी मालकाने १८८२ साली दान दिलीे होती. त्यानंतर तेथे म्यानमार मधून मौल्यवान संगमरवरी सफेद-पिवळसर पाषाणातील ध्यानस्थ बुद्धमूर्ती व दुसरी महापरिनिर्वाण स्थितीतील बुद्धमूर्ती स्थापित करण्यात आली.

चीन मधील जेड बुद्ध विहारातील महापरिनिर्वाण स्थितीतील बुद्धमूर्ती

वाढत असलेल्या गर्दीमुळे तेथील जागा अपुरी पडत असल्याने स्थानिक प्रशासनाने व विहारातील कमिटीने बुद्धमूर्ती व मांडणीसह विहार तीस मिटर उत्तरेकडे सरकविण्याचे ठरविले. त्यानुसार मंजुरी प्राप्त होताच ३ सप्टेंबर २०१७ रोजी ‘महावीर’ हॉलसकट विहार पुरेपूर काळजी घेऊन लाकडी पट्टयावरून सरकवीण्यात आले. यासाठी खास शांघाय म्युझियमचे अधिकारी आणि एक्सपर्ट देखरेखीसाठी आले होते. विहाराचे मुख्य भन्तेजी ‘जिंग’ असून ते चायना बुद्धिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत.त्यांनी सांगितले की या विहाराला जवळजवळ वीस लाख लोक दरवर्षी इथे भेट देतात. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव काही बदल करणे अपरिहार्य होते.

सदर विहार सरकवीताना तेथे वेल्डिंग करण्यास प्रतिबंध करण्यात आला. धूळ उडणार नाही याची काळजी घेण्यात आली. तसेच तिथे कामगारांना काम करताना बुद्धाप्रती आदरभाव ठेवून कसे काम करावे यांचे धडे देण्यात आले. मांसाहार व धूम्रपान न करणे बाबत सक्त सूचना देण्यात आल्या. अशातर्हेनें शहरातील महत्त्वाच्या या सांस्कृतिक वारसाला धक्का न लावता संपूर्ण विहाराची इमारत स्थलांतरीत करण्याचे काम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

One Reply to “आश्चर्य! जागा अपुरी पडत असल्याने अख्ख बुद्ध विहार तीस मीटर सरकविले

Comments are closed.