बुद्ध तत्वज्ञान

जातक कथा – प्रयत्नाचे फळ

वण्णुपथ जातक नं.२

आमचा बोधिसत्व काशीराष्ट्रामध्ये सार्थवाह कुळांत जन्माला येऊन वयात आल्यावर आपल्या पित्याचा धंदा करीत असे. एकदां तो व्यापारासाठी मरुमंडळातून जात असता वाटेत एका साठ योजने लांबीच्या वाळूच्या मैदानाजवळ आला. ह्या मैदानातील वाळू इतकी सूक्ष्म होती की ती मुठीत देखील रहात नसे. सकाळी पहिल्या प्रहरानंतर ह्या मैदानांतून प्रवास करण्याची सोय नव्हती. सूर्यकिरणांनी वाळू संतप्त होऊन जात असल्यामुळे तिच्यावरून माणसाला अगर जनावराला चालत जाणे शक्यच नव्हते.

बोधिसत्त्वाने ह्या मैदानाजवळ आल्यावर एक वाटाड्या घेतला. हा एक वाळूचा मोठा समुद्रच असल्यामुळे वाटाट्यावाचून तरून जातां आला नसता. तो वाटाड्या पुढच्या गाडीत एका चौरंगावर बसून आकाशातील ताऱ्यांच्या अनुरोधाने त्या लोकांना रस्ता दाखवीत असे. सर्व रात्र प्रवास करून सूर्योदयाचे वेळी सर्व गाड्या एका ठिकाणी वर्तुळाकार ठेवीत असत, व त्यावर तात्पुरता मंडप करून त्या खाली सगळी माणसे आणि जनावरे सारा दिवस विश्रांति घेत असत.

याप्रमाणे आमचा बोधिसत्त्व व त्याबरोबर असलेले लोक त्या वालुकातारातून जात असता दुसऱ्या टोकाला आले. आता जवळची गावे एका मुक्कामाच्या पल्ल्यावर राहिली होती. तेव्हा तो वाटाड्या म्हणाला, “आम्ही वाळूच्या मैदानातून गांवाच्या नजीक येऊन पोहोंचलों, आज रात्रीं ह्या मुक्कामाहून निघालों म्हणजे उद्या सकाळी आम्ही एका संपन्न गावाला जाऊन पोहचूं. आतां पाणी आणि लाकडे बरोबर घेण्याचे काही कारण राहिले नाही. “त्या वाटाड्याच्या सांगण्याप्रमाणे बोधिसत्त्वाच्या लोकांनी सर्पण आणि पाणी तेथेच टाकून देऊन ते पुढल्या प्रवासाला निघाले.

एक दोन आठवडे वाटाड्याला रात्री मुळीच झोप न मिळाल्यामुळे तो अगदी थकून गेला होता. मध्यरात्रींच्या सुमारास बसल्या ठिकाणीच त्याला नीज आली, आणि त्याची गाडी भलत्याच मार्गाने वळली हे त्याला समजले देखील नाही. अवशेष रात्र बैल चालत जाऊन पुनः मागल्या मुक्कामावर आले. वाटाड्याच्या गाडीच्या मागोमाग इतर गाड्या चालत असल्यामुळे त्या सर्व तेथे येऊन पोहोचल्या. अरुणोदयाचे सुमारास वाटाड्या जागा होऊन पाहतो तो त्याला आपण पूर्वीच्याच ठिकाणी येऊन पोचल्याचे समजून आले , आणि तो मोठ्याने ओरडला. “गाड्या मागे फिरवा. मागे फिरवा.”

त्या मंडळींत फारच गडबड उडून गेली. आपण कोठे पोंचलों, हे कोणास समजेना. वाटाड्याच्या सांगण्याप्रमाणे गाड्या माघाऱ्या वळवण्यांत आल्या. परंतु इतक्यांत सूर्योदय झाला. गाड्या वर्तुळाकार करून त्यावर मंडप घालून ते लोक आपापल्या गाडीच्या खाली शोकाकुल होऊन पडले! जो तो म्हणाला, “काय हो आम्ही पाणी फेंकून दिले आणि आतां पाण्यावांचून तळमळून मरण्याची आमच्यावर पाळी आली आहे.”

पण बोधिसत्त्वाचा धीर मात्र खचला नाही. सकाळच्याच प्रहरी त्याने आसपासची जमीन तपासून पाहिली. जवळच्या एका लहानशा झुडपाखाली त्याच्या पहाण्यांत दूर्वा आल्या. तेव्हा त्याने असे अनुमान केले की, खाली असलेल्या पाण्याच्या झऱ्याच्या ओलाव्याने त्या जिवंत राहिल्या असाव्या . तो आपल्या लोकांजवळ येऊन त्यांना म्हणाला, “गडे हो, आता निजण्यात अर्थ नाही. आपण जर हताश होऊन पडलों, तर आपणाला मरणोत्तरदेखील सद्गति मिळावयाची नाही. मृत्यु यावयाचाच असलातर तो प्रयत्नांती येऊ द्या. हताश होऊन मरणे हे शूराला शोभण्यासारखें कृत्य नाही, चला! आमच्याजवळ जेवढ्या कुदळी, खोरी आणि पाट्या असतील तेवढ्या घेऊन आपण त्या पलीकडच्या झुडुपाजवळ खणून पाहू. तेथे पाणी लागण्याचा संभव आहे.

“त्या मनुष्यांनी त्या झुडुपाजवळ एक मंडप उभारला व त्याखाली खोदण्यास आरंभ केला. पुष्कळ खोल खड्डा खणण्यांत आला; तथापि पाण्याचा पत्ता लागेना; इतक्यांत एकाची कुदळ जाऊन दगडावर आदळली! तेव्हां त्या साऱ्यांची पूर्ण निराशा झाली! परंतु बोधिसत्त्व मात्र डगमगला नाही. तो त्या खड्ड्यांत खाली उतरला आणि त्या खडकाला त्याने कान लावून पाहिला. तो खडक इतका पातळ होता की, त्याच्या खालून वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. बोधिसत्त्व आपल्या स्वतःच्या नोकरास हाक मारून म्हणाला, “गड्या पहार घेऊन इकडे ये, आणि या दगडावर चार धक्के मार पाहू कसे. आता हातपाय गाळून बसण्याची वेळ नव्हे. ऊठ चल लवकर!”

नोकराने भली मोठी पहार घेऊन त्या दगडावर जोराने चार पाच प्रहार केले. तेव्हां तो दगड दुभंग होऊन खालच्या झऱ्यात पडला. झऱ्याचा प्रवाह अडवला गेल्यामुळे पाण्याची धारा एकदम वर उडाली! सगळ्या लोकांनी स्नान केले व खाऊनपिऊन ते संतृप्त झाले. बोधिसत्त्वाच्या धीराची जो तो प्रशंसा करू लागला. पाणी आहे असे दर्शविण्यासाठी त्या ठिकाणी एक ध्वज उभारून ते लोक बोधिसत्त्वाबरोबर त्या कांतारांतून सुरक्षितपणे पार पडले.

मूळ गाथा:
अकिलासुनो वण्णुपथे खणन्ता उदंगणे तत्थ पयं अविन्दु।
एवं मुनी विरियबलूपपन्नो अकिलासु विन्दे हदयस्य सन्तिं॥]

वाळूच्या कांतारी यत्न करुनि लाभले तयां पाणी॥
साधु स्वयत्ने मिळवी शांतीची मानीं तशी खाणी ॥१॥

संदर्भ: जातक कथा – धर्मानंद कोसंबी.