बुद्ध तत्वज्ञान

जातक कथा : हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये

अपण्णक जातक नं .१

प्राचीन काळी वाराणसीनगरांत ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता. त्या वेळी आमचा बोधिसत्त्व एका मोठ्या सावकाराच्या कुळात जन्माला येऊन वयात आल्यावर पाचशे गाड्या बरोबर घेऊन परदेशी व्यापाराला जात असे. तो कधी पूर्वदिशेला जाई, आणि कधी की पश्चिमदिशेला जाई.

एका वर्षी पावसाळा संपल्यावर आमच्या बोधिसत्वाने परदेशी जाण्याची सर्व सिद्धता केली. त्याच वेळी दुसरा एक व्यापारी आपल्या पाचशे गाड्या घेऊन त्याच रस्त्याने जाण्यास तयार झाला होता. त्याला बोधिसत्त्व म्हणाला, “मित्रा, आम्ही दोघे जर एकदम एकाच मार्गाने गेलों, तर आमच्या बैलांना वैरण मिळण्यास अडचण पडेल. आमच्या माणसांनाहि शाकभाजी बरोबर मिळणार नाही तेव्हा आमच्यापैकी एकाने पुढे जावें, व दुसऱ्याने आठ पंधरा दिवसांनी मागाहून जावे हे बरे.

“तो दुसरा व्यापारी म्हणाला, “मित्रा, असे जर आहे, तर मीच पुढे जातो. का की माझी सर्व सिद्धता झाली आहे. आता येथे वाट पहात बसणे मला योग्य वाटत नाही.”

बोधिसत्त्वाला ही गोष्ट पसंत पडली. त्या व्यापाऱ्याने पुढे जावे व बोधिसत्त्वाने पंधरा दिवसांनी त्याच्या मागाहून जावे असा बेत ठरला. तेव्हा तो व्यापारी आपल्या नोकरास म्हणाला, “गडे हो, आजच्या आज आम्ही प्रवासाला निघू. पुढे जाण्यामुळे आम्हाला पुष्कळ फायदा होणार आहे. आमच्या बैलांना चारापाणी यथेच्छ मिळेल, व आमच्या मालाला दामदुप्पट किंमत येईल.”

पण बोधिसत्त्वाच्या अनुयायांना हा बेत आवडला नाही. ते आपल्या मालकाला म्हणाले, “तुम्ही हे भलतेच काय केले! आमची सर्व तयारी आगाऊ झाली असता तुम्ही त्या गृहस्थाला पुढे जाण्यास अनुमति दिली हे काय? आम्ही जर त्याला न कळविता मुकट्याने पुढे गेलो असतो तर आमच्या मालाचा चांगला खप होऊन आपल्या पदरात पुष्कळ नफा पडला असता.”

बोधिसत्त्व म्हणाला, “तुम्ही म्हणता अशी गोष्ट घडून आली नसती. मी जर त्याला न कळत पुढे जाण्यासनिघालो असतो, तर त्याला माझा फार राग आला असता, व त्यामुळे आम्हां दोघांमध्ये भयंकर स्पर्धा जुंपली असती. आता पुढे जाण्यात विशेष फायदा आहे, असे तुम्हांस वाटते; परंतु हेदेखील ठीक नाही. पावसाळ्यामुळे नादुरुस्त झालेले रस्ते पुढे जाताना करावे लागतील; नदीपार जाण्यासाठी उतार शोधून काढावा लागेल; व जंगलांत झरे किंवा विहिरी बुजून गेल्या असतील त्या साफ कराव्या लागतील. जर त्याच्या मालाला चांगली किंमत आली तर एकदा भाव ठरल्यामुळे आम्हालाही त्याच किंमतीने आमचा माल विकता येईल. एकंदरीत तो पुढे गेला असता आम्हाला कोणत्याहि त-हेने नुकसान नाही.”

त्या वेळी जंबुद्वीपामध्ये पाच प्रकाराची अरण्ये असत. ज्या अरण्यात चोरांची वस्ती असे त्याला चोरकांतार असे म्हणत; जेथे हिंस्त्र पशुंची वस्ती असे त्याला व्यालकांतार म्हणत असत; ज्या ठिकाणी पिण्यालादेखील पाणी मिळत नसे, त्याला निरुदककांतार म्हणत असत; यक्षराक्षसादिकांची जेथे पीडा असे, त्याला अमनुष्यकांतार असे म्हणत; आणि ज्या ठिकाणी अन्नसामग्री मिळण्याची मारामार पडे त्याला अल्पभक्ष्यकांतार असे म्हणत.

बोधिसत्त्वाच्या मार्गात जे मोठे जंगल होते, तेथे पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे आणि यक्षांची वस्ती असल्यामुळे त्याला निरुदककांतार आणि अमनुष्यकांतार असें म्हणत. बोधिसत्त्वाच्या साथीदाराने आपल्या लोकांसह ह्या जंगलाजवळ आल्यावर पाण्याची मोठमोठाली मडकी भरून गाड्यावर चढविली आणि तो जंगलांतून पार जाऊ लागला, वारा पुढच्या बाजूचा असल्यामुळे आपणाला धुळीची बाधा होऊ नये या हेतूने त्या व्यापाऱ्याने आपली गाडी सर्वांपुढे चालविली होती. एक दोन दिवसांच्या रस्त्यावर गेल्यानंतर उलट दिशेने एक व्यापारी सफेत बैलाच्या गाडीत बसून आपल्या नोकरांसह येत असलेला त्याच्या पाहण्यात आला. त्या व्यापाऱ्याने आणि त्याच्या नोकरांनी स्नान करून गळ्यात कमलांच्या माळा घातल्या होत्या. त्याला पाहून वाराणसीहून निघालेल्या व्यापाराने आपल्या गाड्या उभ्या करविल्या व आपण खाली उतरून त्याजजवळ गेला. प्रतिपथाने येणाऱ्या त्या गृहस्थानेंहि आपली गाडी उभी केली व तो खाली उतरून वाराणसीच्या सार्थवाहाला म्हणाला, “आपण कोठून आलांत व कोणीकडे चाललात?

“सार्थवाह म्हणाला, “मी वाराणसीहून निघून ह्या जंगलाच्या पलीकडील प्रदेशांत व्यापारासाठी जात आहे ”

गृहस्थ म्हणाला, “ठीक आहे; पण आपल्या ह्या मागून येणाऱ्या गाड्यांवर मोठमोठाली मडकी दिसताहेत ती कोणत्या पदार्थाने भरली आहेत? ”

सार्थवाह म्हणाला, “हे जंगल निरुदककांतार आहे असे आमच्या ऐकण्यांत आल्यामुळे आम्ही ही मडकी पाण्याने भरून बरोबर घेतली आहेत.”

तो गृहस्थ मोठ्याने हसून म्हणाला, “ वः! हे काही तरी भलतेच तुमच्या ऐकण्यात आले. पलीकडे ती हिरवी गार झाडी दिसते की नाही, तेथे तुडुंब भरलेला एक मोठा तलाव आहे. त्या भागांत बारमाही पाऊस पडत असल्यामुळे पाण्याची टंचाई अशी कधीच पडत नाही. नुकताच तेथे पाऊस पडल्यामुळे आमच्या गाड्यांची चाके चिखलाने भरून गेली आहेत ती पहा. आमचे बैल भिजून गेले आहेत आणि पावसाच्या झडीने भिजलेली आमर्ची वस्त्रे अद्यापि वाळून गेली नाहीत. आपण ही पाण्याची भांडीगाड्यावर लादून बैलांना विनाकारण त्रास देत आहात! बरे, आता उशीर झाला. सहजासहजी गाठ पडल्यामुळे आपला परिचय घडला. पुढे कधी गाठ पडली तर ओळखदेख असू द्या म्हणजे झाले.”

सार्थवाह म्हणाला, हे काय विचारता. आपण ह्या बाजूने आलात म्हणून आमचा फार फायदा झाला. दंतकथांवर विश्वास ठेवून आम्ही आमच्या गाड्यांवर हे पाण्याचे ओझें लादून नेत होतो. पण आता त्याची जरूर राहिली नाही. नमस्कार, अशीच मेहेरबानी राहू द्या.”

तो गृहस्थ आपल्या नोकरांसह तेथून निघून गेल्यावर सार्थवाहाने मडक्यांतील पाणी फेकून देण्यास लाविले, व ती मडकी तेथेच टाकविली. आता बैलांचे ओझे हलके झाल्यामुळे गाड्या त्वरेने चालल्या होत्या. परंतु सारा दिवस मार्ग आक्रमण केल्यावरदेखील पाण्याचा पत्ता लागेना! तेव्हां यक्षांनी आपणाला आणि आपल्या लोकांना फसविण्यासाठी अशी युक्ती लढविली असली पाहिजे, ही गोष्ट त्या सार्थवाहाच्या लक्ष्यात आली. पण” चौरे (चोर पळून गेल्यावर सावध सावध म्हणून ओरडण्यात काय फायदा! किंवा दिवा विझल्यावर तेल घालून काय उपयोग!! गते वा किमु सावधानं निर्वाणदीपे किमु तैलदानम् ” ह्या म्हणीप्रमाणे संग्रही असलेले पाणी कधीच जमिनीत मुरून गेले होते.

त्या सार्थवाहाच्या तांड्यांतील सर्व लोक हताश होऊन गेले, आणि बैलांना मोकळे सोडून गाड्या वर्तुळाकार रचून आपापल्या गाडीखाली शोकमग्न होऊन बसले. तेव्हां त्यांच्या अंगी त्राण राहिले नाही अशी त्या धूर्त यक्षाची पक्की खात्री झाली, तेव्हां त्या तांड्यावर तो तुटून पडला; व आपल्या अनुयायांना म्हणाला, “गडे हो, माझी युक्ति सिद्धीला जाणार नाही असे तुम्हाला वाटले होते परंतु तो सार्थवाह हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणारा असल्यामुळे माझा पाय त्यावर बिनचूक पडला. आज तुम्ही यथेच्छ भोजन करा. अशी पर्वणी पुन्हा येईल की नाही याची मला शंकाच आहे.”

गाड्यांतील सामानसुमान आणि गाड्या तेथेच टाकून देऊन यक्षांनी सर्व बैलांना आणि माणसांना खाऊन टाकिले, आणि मोठ्या हर्षानं नाचत उडत ते आपल्या निवासस्थानाला गेले.

त्या मूर्ख सार्थवाहाला वाराणसीहून निघून पंधरवडा झाल्यावर आमचा बोधिसत्त्व आपल्या नोकरांसह वाराणसीहून निघून अनुक्रमे प्रवास करीत करीत त्या जंगलाजवळ आला . तेथे आपल्या सगळ्या लोकांना एकत्र जमवून तो म्हणाला, “गडे हो हे निरुदककांतार असून अमनुष्यकांतारहि आहे. तेव्हा तेथे आम्ही मोठ्या सावधपणाने वागले पाहिजे. जर वाटेंत तुम्हाला कोणी भलतेच फळ, मूळ, दाखवील तर ते तुम्ही खाता कामा नये; अपरिचित शाकभाजीचा तुम्ही आपल्या अन्नात उपयोग करिता कामा नये; किंवा अन्य कोणतीहि विशेष गोष्ट घडून आली, तर ती ताबडतोब मला सांगितल्यावाचून राहता कामा नये.” बोधिसत्त्वाच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे त्या सर्वांनी कबूल केले. बोधिसत्त्व अत्यंत व्यवहारनिपुण असल्यामुळे आपल्या हिताहिताचे ज्ञान त्याला विशेष आहे, असे जाणून त्यांनी आपला भरिभार त्यावर सोपविला.

त्या मूर्ख सार्थवाहाला आणि त्याच्या अनुयायांना दुर्बळ करून मारून खाल्ल्यापासून यक्षांना मनुष्यमांसाची विशेष गोडी लागली होती. पूर्वीप्रमाणे त्यांनी आपले स्वरूप पालटून ते बोधिसत्त्वाच्या लोकांपुढे आले; आणि जवळ पाण्याचा तलाव आहे इत्यादि वर्तमान त्यांनी सांगितले. बोधिसत्त्व सर्वांच्या मागल्या गाडीवर बसून चालला होता. पुढे चाललेले त्याचे नोकर धावतधावत येऊन त्याला म्हणाले,” धनीसाहेब, आताच हा एक व्यापारी दुसऱ्या बाजूने आपल्या नोकरचाकरांसह येत आहे. त्या सर्व लोकांच्या गळ्यात कमलाच्या माळा आहेत. आणि त्यांच्या गाड्यांची चाके चिखलाने भरलेली आहेत. ते सांगतात की, पलीकडे जे हिरवेगार अरण्य दिसते तेथे एक तलाव आहे व त्या भागात बारमाही पाऊस पडत असतो, तेव्हा आम्ही ही पाण्याची भांडी वाहून नेण्यापेक्षा येथेच टाकून दिल्यास आमच्या बैलांचे ओझे कमी होईल, व त्या तलावाजवळ आम्ही लवकरच पोहचूं.”

बोधिसत्त्व म्हणाला, “गडे हो, तुम्ही माझ्या हुकुमाबाहेर चालू नका. पाण्याचा थेंब देखील फुकट खर्च होऊ देऊ नका. आता जवळ पाऊस पडत आहे असे तुम्ही म्हणता; पण पावसाची हवा एकाच्या तरीअंगाला लागली आहे काय? किंवा आकाशामध्ये एक तरी ढग दिसत आहे काय?”

ते म्हणाले, “आम्हाला ढग दिसत नाहीं; विजेचा कडकडाट ऐकू येत नाही; किंवा आम्हाला थंड हवाहि लागत नाही. परंतु ज्या अर्थी तो सभ्य गृहस्थ आणि त्याचे इतके नोकरचाकर मोठा तलाव असल्याचे सांगत आहेत, एवढेच नव्हे, तर त्यांपैकी पुष्कळांच्या गळ्यात कमलांच्या माळा आहेत, त्या अर्थी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही.”

बोधिसत्त्व म्हणाला, “पण विश्वास ठेवण्याची एवढी घाई का करता? आणखी एका योजनाच्या अंतरावर तलाव आहे असे जर तो गृहस्थ सांगत आहे, तर आपण तेथे हे पाणी फेकून देऊ, व पुढे जरूर वाटल्यास तलावाचे पाणी भरून घेऊ. आजचा दिवस बैलांना थोडा त्रास पडला तरी हरकत नाही.”

बोधिसत्त्वाच्या हुकुमाप्रमाणे त्याच्या लोकांनी पाणी बाहेर टाकिले नाही, त्या सभ्यपुरुषवेषधारी यक्षाने पुष्कळ आग्रह केला; परंतु त्या लोकांची बोधिसत्त्वावरील श्रद्धा ढळली नाही. तेथून दुसऱ्या मुक्कामावर गेल्यावर सामानाने लादलेल्या पाचशे गाड्या आणि इतस्ततः पडलेल्या बैलांचे व माणसांचे अस्थिपंजर त्यांना आढळले. तेव्हां बोधिसत्त्व म्हणाला, “गडे हो, पहा! हा आमचा मूर्ख सार्थवाह आपल्या लोकांसह नाश पावला! आपल्या जवळील पाणी नवीन पाणी सापडल्यावाचून याने जर फेकून दिले नसते तर हा आपल्या लोकांसह यक्षांच्या भक्ष्यस्थानी पडला नसता. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणाऱ्यांची ही अशीच गत होत असते!”

त्या गाड्यांवरील बहुमोल सामानसुमान आपल्या गाड्यांवर घालून आणि आपल्या गाड्यांवरील अल्पमोल वस्तु तेथेच टाकून देऊन बोधिसत्व आपल्या लोकांसह सुखरूपपणे त्या काताराच्या पार गेला, व तेथे मोठा फायदा मिळवून पुनःसुरक्षितपणे वाराणसीला आला.

[मूळ पाली गाथा अशी आहे
अपण्णकं ठानमेके दुतियं आहु तक्किका।
एतदाय मेधावी तं गण्हे यदपण्णकं ॥]

प्रत्यक्ष आर्य वदती स्थान दुजें तार्किकास आवडतें॥
जाणोनि तत्त्व सूझें सोडूं नये कुशलकर्मजें घडतें॥ १ ॥

संदर्भ: जातक कथा – धर्मानंद कोसंबी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *