जगभरातील बुद्ध धम्म

एका नाव्ह्याने सलूनमध्ये आलेल्या गिऱ्हाईकांनां बौद्ध तत्वज्ञान सांगून धम्माकडे वळविले

जेफर्सन वर्कमॅन हा वॉशिंग्टन शहरातील स्पोकेन भागातील एक न्हावी आहे. त्याच्या सलूनचे नाव ‘बांबू बार्बरशॉप’ आहे. आलेल्या प्रत्येक नवीन गिऱ्हाईकास दुकानातील एकमेव खुर्चीत बसवून तो तन्मयतेने, प्रेमळपणे त्यांचे केस कापतो, दाढी करतो. त्याचबरोबर बौद्ध तत्वज्ञान त्यांच्या कर्णसंपुष्टात ओततो. वीस वर्षापूर्वी त्याला एका मित्राने बुद्धिझम वरील पुस्तक वाचायला दिले. ते वाचून तो शहरातील एका बौद्ध विहारात जाऊ लागला. धम्माचे आचरण करु लागला. मनुष्य ग्रामीण भागातील असो किंवा शहरातील असो त्याची सुखदुःखे ही सर्वत्र सारखीच असतात. त्यात भेदभाव नसतो. जेफर्सनने आपला व्यवसाय सांभाळताना याच गोष्टीचे भान ठेवले. त्याची मधाळ भाषा आणि मानवी जीवनाबाबतचे सत्य ऐकून अनेकांना बुद्धांबाबत कुतूहल जागे झाले. यामुळे पुढे अनेकांचा ओढा बौद्ध तत्त्वज्ञानाकडे झुकला. इथे कुठली जोर जबरदस्ती नव्हती. भय नव्हते. आक्रस्ताळेपणा नव्हता. धाक नव्हता. पटले तरच स्विकारा हे सूत्र असल्याने विज्ञानवादी बुद्ध अनेकांना भावला.

जेफर्सनची हसतमुख मुद्रा वॉशिंग्टन मधील स्पोकेन भागात बुद्धिझमची ओळख दाखविते.

पुढे व्यवसाय करताकरता वयाच्या पन्नासाव्या वर्षी जेफर्सन याने केशकर्तनालय संस्थेची स्थापना केली. तो म्हणतो “केस कापताना गिऱ्हाईक शांत चित्ताने बसलेला असतो. त्याचे तोंड बंद असते. मात्र कान उघडे असतात. अशावेळी मानवी जीवनाविषयी केलेले बुद्धांचे भाष्य गिऱ्हाईकांच्या काळजात कुठेतरी घुसते आणि हळूहळू त्याची बोधी जागृत होते. मनुष्य काळा असो वा गोरा असो श्रीमंत असो वा गरीब असो त्याच्या कौटुंबिक आणि सामाजिक समस्या सारख्याच असतात”. जेफर्सन पुढे म्हणतो “कोरी पाटी असलेल्या गिऱ्हाईकांनां बुद्ध तत्त्वज्ञान आणि त्याच्या ध्यानसाधनेबाबत सांगताना मेत्त भावनेचा आनंददायी अनुभव प्राप्त होतो. दिवसेंदिवस माझी बुद्धिझमची प्रॅक्टिस वाढत आहे याचा मला आनंद होत आहे”.

जेफर्सन वर्कमॅन यांची ही कथा वाचून मला बौद्ध साहित्यातील उपालि भिक्षू यांची गोष्ट आठवली. ते बुद्धांचे समकालीन भिक्षु होते. पूर्वायुष्यात ते नाभिक होते व शक्यगणांची सेवा करत. बुद्धांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी भिक्षुची उपसंपदा घेतली. ध्यानमार्गाचा अभ्यास करून अर्हत पद प्राप्त केले. त्यानंतर आयुष्यभर संघाबरोबर जीवन व्यतीत करताना विनयात पारंगत झाले. संघामधील अनेक नियम ठरविताना उपालि भिक्षु साक्षी राहिलेले आहेत. त्यामुळे संघातील विनयाच्या नियमांबाबत त्यांना पूर्ण माहिती झाली होती. त्यांची स्मरणशक्ती आणि पाठांतर क्षमता उल्लेखनीय होती. बुद्धांचा शिष्य आनंद यास देखील संघातील नियमांबाबत त्यांनी अवगत केले होते. अनेकांना त्याने संघातील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारले देखील होते. कारण ते स्वतः विनयधर होते. बुद्धांनी आखून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही याबाबत देखील त्यांचा करडा कटाक्ष असे.

शास्त्याचे शासन जपणाऱ्या म्यानमार देशात उपाली भन्ते यांच्या नावाची प्राचीन धम्मदिक्षेची वास्तू आहे.

भिक्षु संघात कधीही गोत्र वा जातीला थारा नव्हता. उपसंपदे प्रमाणे वरिष्ठ असलेल्या भिक्षूंचा नेहमी मान राखला जात असे. अनेक नवीन भिक्षू संघातील नियमांचा अभ्यास करण्यासाठी उपालि यांचेकडे येत. म्हणूनच नाभिक असून देखील बुद्धांच्या पहिल्या दहा अग्रश्रावकांत त्यांचे नाव येते. त्यांच्या विनयाच्या गुणांमुळेच बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिल्या धम्मसंगितीत त्यांच्यावर विनय सुत्तांची मोठी जबाबदारी सोपविली गेली. त्यांच्यामुळेच त्रिपिटकातील विनयपिटक अस्तित्वात आले, हे लक्षात ठेवले पाहिजे. विनयाची परंपरा कायम पुढे चालू राहण्यासाठी उपालि भिक्षु यांनी दासक स्थविरांना शिष्य केले. दासकांनी त्यांच्या काळात सोण स्थविरांना शिष्य केले. अशा प्रकारे संघामधील विनय परंपरा उत्तरोत्तर मजबूत होत गेली. म्हणून आजही जगात विनयधारी बौद्ध भिक्षु संघ हा धम्माचा शिस्तबद्ध संघ म्हणून सर्वत्र मान मिळवून आहे. जेफर्सन वर्कमॅन यांनी उपसंपदा घेतली नसली तरी अनेक लोकांना धम्माकडे वळविले ही सोपी गोष्ट नव्हती. आपल्या भारतातील नाभिक समाजाला उपालि अर्हतांच्या गोष्टीतून बोध प्राप्त होवो अशी मी प्रार्थना करतो.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

One Reply to “एका नाव्ह्याने सलूनमध्ये आलेल्या गिऱ्हाईकांनां बौद्ध तत्वज्ञान सांगून धम्माकडे वळविले

  1. जय भीम नमो बुद्धाय ????????????????

Comments are closed.