इतिहास

सांचीचा स्तुप आणि परिसर सुंदर करणारा जॉन मार्शल

ब्रिटीश अधिकारी जनरल टेलरने १८१८ मध्ये सांची स्तूप शोधल्यावर अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तेथे काही मिळेल या अनुषंगाने उत्खनन केले. सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी सुद्धा तेथे उत्खनन १८५१ मध्ये सुरू केले. मुख्य भव्य स्तूप क्र १ मध्ये काय सापडले हे अज्ञात आहे. जो स्तूप टेकडी पासून खाली आहे तो स्तुप क्र. २ असून तेथे मात्र सारीपुत्त आणि महामोग्गलान यांचे अस्थिकलश सापडले.

सदर अस्थिकलश समुद्रमार्गे ज्या जहाजाद्वारे लंडनला पाठवण्यात आले ते जहाज समुद्रामध्येच बुडाले. मात्र त्याच वेळी सतधारा येथील एका स्तुपामध्ये ब्रिटिश अधिकारी मायसे यांना सारीपुत्त आणि महामोग्गलान यांचे सांची स्तुप क्र.२ प्रमाणे अस्थिकलश सापडले ते त्यांनी जहाजा द्वारे लंडनला पाठवले ते सुखरूप पोहचले. ( तेच अस्थिकलश महाबोधी सोसायटीला प्राप्त झाले असून ते आता चेतीयागिरी विहारात ठेवण्यात आले आहेत )

पुढे १९१२ नंतर भारतीय पुरातत्त्व खात्याचे संचालक जनरल सर जॉन मार्शल यांच्या देखरेखित या ठिकाणाची दुरुस्ती करण्यात आली. तेथील पडझड झालेल्या अनेक वास्तू यांची व्यवस्थित वर्गवारी करण्यात आली व भग्नावशेष तिथे व्यवस्थित रचून ठेवण्यात आले. सर जॉन मार्शल १९१२ ते १९२८ पर्यंत ASI चे संचालक होते. त्यांच्या काळात त्यांनी स्तुपाच्या बाजूचा संरक्षक कठडा दुरुस्त केला. तसेच पायऱ्या आणि हर्मिका यांचे दुरुस्ती केली.

त्याशिवाय सातवाहन शासकांच्या काळात स्तूपांसमोर जे नक्षीदार प्रवेशद्वार (तोरण) तयार करण्यात आले होते त्याची सुद्धा पडझड झाली होती, तीसुद्धा दुरुस्त करण्यात आली. अशा तऱ्हेने सर जॉन मार्शल यांचा कार्यकाल येथे बराच गेला असल्यामुळे त्यांना स्तुपाबद्दल आत्मीयता तयार झाली होती. ते आपली पत्नी, मुलगी आणि मेडन यांचे बरोबर तेथे अनेकदा फिरायला येत असत.

थोडंक्यात सगळेच ब्रिटिश अधिकारी अभ्यासू नव्हते. अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी उत्खनन करताना स्तुपामधील सापडलेल्या अनेक मौल्यवान वस्तू पळविल्या. काही खाजगी संग्रहालयास विकल्या. जॉन मार्शल सारखा एखादा असा विरळा अधिकारी असतो ज्याने प्राचीन स्थळांच्या दुरुस्तीचे भरपूर काम मन लावून केले.

-संजय सावंत, नवी मुंबई, (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)