ब्लॉग

ज्येष्ठ पौर्णिमा विशेष : भारत-श्रीलंका बौद्धधम्म संबंधांमध्ये आगरी कोळी समाज एक ऐतिहासिक दुवा

आज ऐतिहासिक ज्येष्ठ पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला बुद्धीस्ट देशांमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की सम्राट अशोकाची मुलं संघमित्रा आणि महेंद्रा हे नालासोपारा ज्याचं पहिलं नाव सोपारक होतं ते सम्राट अशोकाच्या काळात खूप नावाजलेलं बंदर होतं आणि इथूनच आगरी, कोळी, भंडारी, हे बोट, जहाज चालवणारी लोकं ह्या बंदरावर खूप मोठा व्यापार करीत. याच बंदरातून भारताचा परदेशाशी व्यापार होत असे. याच बंदरातून आगरी, कोळी, भंडारी या मुंबईच्या मूळ निवासी भूमीपुत्रांच्या सहाय्याने बोटी मध्ये बसून महेंद्रा आणि संघमित्रा हे श्रीलंकेत आले.

थेरो महेंद्रा हे मेहेंतळे या पर्वतावर जाऊन इसवी सन पूर्व २३६ या वर्षी त्यांनी तेथील देवनामपिय्य तिस्स या राजाला धम्मदीक्षा दिली आणि त्या राजाने बुद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यानंतर तिथे बुद्ध धम्माचा खूप प्रचार व प्रसार होऊन ते सर्व बुद्धीस्ट बनले.

या घटनेचे महत्व म्हणून पोसन किंवा ज्येष्ठ पौर्णिमा ही श्रीलंके मध्ये अतिशय मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बुद्ध पोर्णिमेनंतरचा सर्वात मोठा सण म्हणून या पोसन किंवा ज्येष्ठ पोर्णिमेचं श्रीलंकेत महत्व आहे. सम्राट अशोक यांनी घेतलेल्या ऐतिहासिक धम्मसंगितीचाही संदर्भ याच पोर्णिमेला आहे. सोबत जाताना संघमित्रा आणि महेंद्रा यांनी बोधिवृक्षाची एक शाखा बुद्ध धम्माचं प्रतीक म्हणून अनुराधापुर येथे लावली होती जी आजही बोधी वृक्षाच्या रूपाने तिथे पहायला मिळते.

औरंगाबाद येथे लोकोत्तरा भिक्खु केंद्र डाॅ हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोजाना कांबळे यांच्या दान पारिमेतेतून बांधून भिक्खु संघाला अर्पण करण्यात आलं त्या सोहळ्याला मी विशेष आमंत्रित होतो तेथे यांच बोधी वृक्षाची शाखा लावून धम्माच्या विचारांचं एक वर्तुळ पूर्ण झालं. अनुराधापूर हे शहर सगळ्यात आधी बुद्धिस्ट झालं आणि त्यानंतर पूर्ण देशाने बौद्ध धम्माचा स्वीकार केला.

हे सर्व यासाठी महत्वाचं आहे की, आगरी,कोळी, भंडारी हा इथला मूळरहिवासी भूमिपुत्र जो मातृसत्ताक आई एकविरेला खूप मानतो आणि कार्ल्याची आई एकविरा येथे ज्यावेळेस लहान मुलांचं जावळ काढलं जातं त्यावेळेस ते त्या स्तुपाला फेरी मारतात. जावळ काढणं, केस काढणं किंवा श्रामणेर करणं ही कोळी, आगरी, भंडारी अँग्लो इंडियन या समाजाची प्रथा तसेच बुद्ध धम्माची ही एक प्रथा आहे. त्याचप्रमाणे आई एकविरा जी एका विराची आई म्हणजे भगवान बुद्धाची आई आहे असे काही अभ्यासकाने सप्रमाण म्हटलं आहे. स्रियांना मानसन्मान देणारी, अधिकार देणारी ही मातृसत्ताक पद्धती आहे.

कार्ला लेणी आणि एकविरा आईचे मंदिर

भगवान बुद्धांचा कोळीय वंश आहे, आईच्या बाजूने ते कोळी होते आणि म्हणून कोळीय वंश असं म्हंटल जात आहे. आजही आगरी, कोळी, भंडारी आपल्या घरात चार सिंहाची अशोक मुद्रा ठेवतात तेंव्हा त्याकडे आपण या थोर परंपरेचा सांस्कृतिक वारसा म्हणून पाहिले पाहिजे. याच भुमिकेतून सिडकोने जेव्हा या लेण्यांना उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोठं आंदोलन करून त्याला मी निकराचा विरोध केला. हा बुद्धाचा जागतिक सांस्कृतिक ठेवा जपणं हे आपलं कर्तव्य आहे.

मुंबई शहराचे सोपारकचे मूळ सागरपुत्र, भूमिपुत्र हे आगरी,कोळी,भंडारी, कऱ्हाडी यांनी बुद्धाचा धम्म बाहेरच्या देशात जाण्यासाठी संघमित्रा आणि महेंद्रा यांना मदत केली. त्यांना सुखरूप पोहचवलं. त्यामुळे हा धम्म श्रीलंकेत गेला जो आज तिथला राष्ट्रीय धर्म आहे आणि ते पूर्ण राष्ट्र बुद्धिस्ट राष्ट्र आहे. एक प्रकारे हा खूप मोठा दुवा, हे खूप मोठं नातं, सांस्कृतिक वारसा आगरी, कोळी, भंडारी त्याचप्रमाणे श्रीलंकन राष्ट्र आणि भारत, भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सर्व भारतियांचं आहे. असं या ज्येष्ठ पौर्णिमेचं महत्त्व आहे. या ऐतिहासिक घटनेचं स्मरण करून हा विश्व बंधुभाव जोपासावा व याचा प्रचार प्रसार करावा.

राजाराम पाटील, अध्यक्ष, आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी

One Reply to “ज्येष्ठ पौर्णिमा विशेष : भारत-श्रीलंका बौद्धधम्म संबंधांमध्ये आगरी कोळी समाज एक ऐतिहासिक दुवा

  1. धन्यवाद खूप छान माहिती मिळाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *