जगभरातील बुद्ध धम्म

कठीण चिवरदान समारंभ; ‘या’ देशात मोठ्या प्रमाणात साजरा करतात

थेरवादी बौद्ध परंपरेमध्ये ‘कठीण चिवरदान समारंभ’ पावसाळा झाल्यावर साधारणता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये साजरा करतात. विशेष करून हा सण बांगलादेश, म्यानमार, थायलंड, कंबोडिया व लाओस येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बांगलादेशात त्याला ‘कथिन चिवरदान’ म्हणतात. तीन महिन्याचा वर्षावास संपल्यावर भिक्खूं धर्मप्रसार करण्यासाठी बाहेर पडतात. तेव्हा त्यांना नवीन चिवराची गरज भासू लागते. कारण वर्षभर चिवर वापरून ते जीर्ण झालेले असते. यास्तव त्यांना नवीन चिवर दान करण्याची प्रथा बुद्धांच्या काळातच पडली व बुद्धांनी सुद्धा त्यास अनुमती दिली.

कठीण चिवरदान समारंभ

कठीण चिवर म्हटल्यावर मराठीत त्याचा अर्थ चांगले, नवे, मजबूत धागा असलेले चिवर असा घेतला तर योग्य होईल. त्याच्या मजबूत सूतामुळे त्यास उत्तर भारतात कठीण चिवर म्हटले गेले आहे. आणि तोच शब्द वरील पूर्वेकडील सर्व देशात गेला आहे. भिक्खूंना चिवर दान करणे हे पुण्य अर्जित करण्याचे मोठे कृत्य आहे, असे सर्व पूर्वेकडील देशात समजले जाते.

बुद्धांचा उपदेश विशद करणे, त्रिपिटकाची शुद्धता राखणे, तसेच बौद्ध परंपरा यांची जपणूक करण्याचे काम भिक्खू करीत असतात. आणि भिक्खू संघ हा तर समाजाने केलेल्या दाना वरती अवलंबून असतो. आणि म्हणून त्यांना दैनंदिन आवश्यक वस्तू पुरविणे तसेच त्यांच्या तब्येतीची व वस्त्रप्रावरणांची काळजी घेणे हे समान्यजनांचे कर्तव्य आहे.

दान करण्यात आपण भारतीय लोक खूपच कंजूष आहोत. काही दानशूर दानधर्म करतात परंतु ते अधर्मी दान म्हटले पाहिजे कारण त्यांचे दान हे अंधश्रद्धेला बळकटी देणारे असते. काही दान करतात ते स्वतःचे नावाचा गौरव व्हावा यासाठी करतात. पण कुठलीही इच्छा मनात न बाळगता, सर्वांच्या कल्याणाकरिता निस्वार्थीपणे केलेले दान महापुण्य अर्जित करते.

धम्म अजून बहरावा आणि त्याचा सर्वांना लाभ व्हावा या भावनेने केलेले दान हे महाफलदायिनी असते. आपल्या मासिक मिळकतीतील ठराविक रक्कम धम्मकार्यास दान केल्यास धम्माचे पाठबळ मिळून मनुष्याची उत्तरोत्तर प्रगती होत जाते याचे दाखले बौद्ध साहित्यात मिळतात.

-संजय सावंत (नवी मुंबई)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *