इतिहास

‘मोहोंजो-दरो’ सिंधू संस्कृती म्हणून ढोल बडविण्यात आले, पण इथे प्राचीन बौद्धस्थळे

सिंधू संस्कृतीचे शहर म्हणून ‘मोहों-न्जो-दरो’ या पुरातन स्थळाचा अभ्यास लहानपणी आपण सर्वांनी शाळेत असताना केला. तेथील वास्तुरचना, नगररचना, सांडपाण्याची यंत्रणा आणि सापडलेल्या छोट्यामोठ्या टेराकोटा शिल्पाकृती (नर्तकी, अलंकारित स्त्री, मणी-माळा, आभूषणे, प्राणी इत्यादी) हे सर्व अप्रतिम होते. इ.स.पूर्व हजारो वर्षापासून अस्तित्वात असलेल्या या सुनियोजित शहराचा जगभर गवगवा करण्यात आला. इथली प्राचीन संस्कृती ही सिंधू संस्कृती म्हणून ढोल बडविण्यात आले. पण इथे दिसत असलेल्या मातीच्या उंचवट्याबाबत कधीच कोणी भाष्य केले नाही.

‘मोहो-न्जो-दरो’ याचाच अर्थ तथागतांचा स्तूप ( Mound of Buddha ) असे आता दिसून आले आहे. प्रत्यक्षदर्शी येथे स्तूप आहे हे कधीच सांगितले गेले नाही. फक्त सिंधू संस्कृतीचे ढोल बडविण्यात आले.

हा उंचवटा म्हणजे स्तूप होता हे कायम गुलदस्त्यात ठेवले गेले. त्यामुळे शालेय शिक्षणात देखील त्याचा आपण कधीच अभ्यास केला नाही. सत्य झाकण्यासाठी ही केलेली मोठी धूळफेक होती. अनेक विद्वानांनी स्वतःच्या संस्कृतीला अनुकूल असलेल्या गोष्टी जगापुढे मांडल्या. त्याचीच री आंधळेपणाने सर्वांनी ओढली. वास्तविक ‘मोहो-न्जो-दरो’ याचा अर्थ ‘तथागतांचा स्तूप’ असा होतो असे आता स्पष्ट झाले आहे. ( Mound of Buddha)

शंभर वर्षांपूर्वी झालेल्या उत्खननानंतर काहू-न्जो-दरो स्तूपाचे काढलेले छायाचित्र.

दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तानातील याच सिंध प्रांतात ‘काहु-न्जो-दरो’ नावाचे दुसरे एक स्थळ असून तेथे देखील सन १९०९-१० च्या दरम्यान उत्खनन झाले होते. याची माहिती टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात वाचल्यावर मला देखील आश्चर्य वाटले. त्याबाबतची माहिती गोळा केली तेव्हा हे सुद्धा मोठे बौद्ध संस्कृतीचे स्थळ असल्याचे दिसून आले. इ.स. ४-५ व्या शतकात भरभराटीला असलेले हे ३५ एकराचे स्थळ म्हणजे बौद्ध संस्कृतीची एकेकाळी खाण होती. येथील उत्खननात संपूर्ण विटांनी बांधलेला स्तूप मिळाला. या स्तूपात जे रक्षापात्र मिळाले त्यात बुद्धधातु, स्फटिक, निलम आणि मौल्यवान रत्ने मिळाली. सातव्या ते दहाव्या शतकातल्या टेराकोटाच्या असंख्य बुद्धमूर्ती येथे मिळाल्या.

काहू-न्जो-दरो स्तुपाची भव्यता आणि तेथील सुंदर कोरीवकाम अप्रतिम होते.

‘काहु-न्जो-दरो’ या स्थळाला ‘मिरपूर-खास-स्तूप’ असे देखील म्हणतात. बुद्धांच्या अनेक मूर्ती बरोबर येथे सातव्या शतकातील अवलोकितेश्वर पद्मपाणी यांचे टेराकोटावरील चित्र देखील प्राप्त झाले. या ठिकाणी एकेकाळी दहा हजार भिक्खुंचे वास्तव्य होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथे सापडलेल्या प्राचीन वस्तूपैकी २९७ वस्तू मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम येथे त्यावेळी आणल्या गेल्या. पण गेल्या १०० वर्षांत त्याची कधी वाच्यता करण्यात आली नाही. काही दर्शकांना व अभ्यासकांना देखील त्या पाहता आल्या नाहीत. आता पुढील वर्ष या संग्रहालयाचे शताब्दी वर्ष असल्याने या सर्व वस्तूं दर्शकांना पाहण्यासाठी खुल्या करण्यात येणार आहेत असे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयचे ( Prince of Wales Museum) संचालक मुखर्जी यांनी सांगितले.

काहू-न्जो-दरो स्तुपात प्राप्त झालेले रक्षापात्र या मूलगंधकुटी विहारात आहे.

‘काहु-न्जो-दरो’ या स्तुपात मिळालेले रक्षापात्र १९६० साली सारनाथच्या महाबोधी सोसायटीला देण्यात आले. ते सध्या मुलगंधकुटी येथे ठेवण्यात आले आहे. मात्र गेल्या शंभर वर्षात काहु-न्जो-दरो स्थळाची अवस्था तेथील स्थानिकांनी अतिशय वाईट करून ठेवली. तेथील माती, विटा चोरून नेल्या. तेथे मौल्यवान खडे मिळतात म्हणून अनेकांनी खोदाई केली. मिळालेल्या बुद्धमूर्तींची तसेच इतर शिल्पांची तस्करी केली. आता हा स्तूप कसा होता याचे फक्त जुने छायाचित्र पाहून समाधान मानावे लागते. तरी देखील या प्राचीन नगराचा आवाका पाहता येथे उत्खनन झाले तर फार मोठा बौद्ध संस्कृतीचा ठेवा मिळेल असे सर्वांचे मत आहे. पण तेथील सरकार ढिम्म आहे. स्वतःच्याच पूर्वजांच्या संस्कृतीचा विसर त्यांना पडला आहे.

काहू-न्जो-दरो स्तूपातील बुध्द शिल्प

बौद्ध संस्कृतीच्या प्राचीन स्थळांची नवनवीन माहिती दिवसेंदिवस प्राप्त होत आहे. मी त्यांना त्रिवार वंदन करतो. खरोखर बुद्ध हे अखिल जगताचे गुरू होते, गुरू आहेत आणि गुरू राहतील.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)