इतिहास

८ व्या शतकातील ‘या’ बुद्धमूर्तीच्या आसनपीठावरील शिलालेखावरून कंधार प्रसिध्द बौध्दपीठ होते

नांदेड जिल्ह्यातील कंधार आणि परिसरात राष्ट्रकूट काळातील बऱ्याच बुध्दमूर्ती मिळाल्या आहेत. कंधार हे राष्ट्रकूट काळातील प्रसिध्द बौध्दपीठ असल्याचे अनेक बौद्ध शिल्पावरून स्पष्ट होत आहे. कंधार या ठिकाणी इ.स. १९५८ मध्ये प्राप्त एक बुद्धमूर्ती अत्यंत महत्वाची ठरते. ही मूर्ती पद्मासन अवस्थेत असून तिचा चेहरा धीरगंभीर असून भूमीस्पर्श मुद्रेतील मूर्ती उल्लेखनीय आहे.

बुद्ध मूर्तीच्या आसनपीठावर प्राचीन शिलालेख असून त्याची लिपी नागरी व भाषा संस्कृत आहे.

भूमीस्पर्श मुद्रेला पृथ्वीला स्पर्श करणे (Touching The Earth) असे देखील म्हणतात. जी बुद्धांची ज्ञान प्राप्तीला दर्शवते, कारण बुद्ध म्हणायचे की पृथ्वी त्यांच्या ज्ञानाची साक्षी आहे. या मुद्रेत उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवून तळहात आतल्या बाजूला ठेऊन त्याला जमिनीच्या दिशेने नेण्यात येते. अशी वैशिष्टये असलेली एक बुध्दमूर्ती कंधार येथे मिळाली असून ती शहरातील एका विहारात ठेवण्यात आली आहे. (कंधार येथील बौद्ध बांधवानी प्राचीन बुद्ध मूर्तीला अज्ञानातून रंगरंगोटी केल्यामुळे मूर्तीचे मूळ सौंदर्य गेले आहे)

कंधार येथील बौध्द द्वार बुद्ध विहारात प्राचीन बुद्ध मूर्ती आहे.

ही बुध्दमूर्ती बौध्द द्वार विहारात प्रतिष्ठापित केली आहे. या मूर्तीची उंची ९० सें.मी. आणि जाडी ६० से.मी. आहे. ही मूर्ती इसवी सनाच्या आठव्या शतकातील असून राष्ट्रकूट सम्राट कृष्ण पहिला यांच्या काळातील आहे. बुध्दाच्या मस्तकाच्या पाठीमागे प्रभामंडळ आहे. मस्तकावरील केस कुरुळे दाखविले असून मस्तकावर केसांची गाठ आहे. प्रभामंडळाच्या दोन्ही बाजूस चवरीधारक सेवक आहेत. तसेच बुध्दाच्या दोन्ही बाजूस एक – एक अश्वप्रतिमा आणि गजमुख दाखविले आहेत. ही मूर्ती कुषाण कलापरंपरेतील आहे. केवळ मथुरेच्या कुषाण आणि कुषाणपूर्वीच्या कलाकृतीतच बुद्धाच्या मस्तकाच्या पाठीमागे प्रभामंडळ दिसते. ही बुद्धमूर्ती पद्मासन अवस्थेत असून तिचा चेहरा धीरगंभीर आहे. या मूर्तीच्या आसनपीठावर पुढील शिलालेख आहे.

ये धर्मा हेतूप्रभवा हेतुं तेषां तथागतोहावदत ।
तेषांच यो निरोधः एवं वादी महाश्रमणः।

हा शिलालेख कंघारमधील प्राचीन शिलालेख असून त्याची लिपी नागरी व भाषा संस्कृत आहे. या शिलालेखात बौध्द तत्वज्ञानाचे सार सामावलेले आहे. या शिलालेखाची लिपी इसवी सनाच्या आठव्या शतकातील आहे, हे स्पष्ट होते. प्रतित्य समुत्पादाच्या सिध्दांतानुसार सारी विश्वानुभूती हेतू प्रभवा आहे आणि तथागतांच्या उपदेशानुसार संयमानेच याही विश्वानुभूतीला निरोध करता येईल, असे या शिलालेखाचे सार आहे. हा शिलालेख इसवी सनाच्या आठव्या शतकातील कंधार, नांदेड, हिरडजुन्नी व करडखेड परिसरातील बौध्द धर्माचा प्रभाव स्पष्ट करतो.

कंधार येथील बौद्ध बांधवानी प्राचीन बुद्ध मूर्तीला अज्ञानातून रंगरंगोटी करून बुद्ध विहारात ठेवल्याने मूर्तीचे मूळ सौंदर्य गेले आहे

इ.स.१८३६ मध्ये कनिंगहॅम यांनी उत्तरप्रदेशात सारनाथ येथे उत्खनन करुन तेथील चौखंडी व धम्मेख स्तूप प्रकाशात आणला. धम्मेख स्तुपात ये धर्मा हेतूप्रभवा हा बौध्द मंत्र कोरलेला एक शिलापट त्यांना मिळाला. यावरुन सारनाथ प्रमाणेच कंधारही प्रसिध्द बौध्द स्थळ होते, हे स्पष्ट होते.

गौतम बुध्दांनी बौध्द तत्त्वज्ञानाचे सार भिक्खूना उपदेश करताना सांगितले होते. त्याची पाली भाषेतील मूळ गाथा अशी आहे.

ये धम्मा हेतुप्पभवा हेतुं तेसं तथागतो आह।
तेसं च यो निरोधे एवं वादी महासमणो।

अर्थ : उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे ‘उदेश’ असतो. तो ‘उदेश’ तथागत सांगतात; तसेच उत्पन्न झालेली प्रत्येक गोष्ट ही नाशवान आहे. असे महाश्रमण बुद्धाचे म्हणणे आहे.

– जयपाल गायकवाड, नांदेड 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *